आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलवरून पुणे प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिसेंबर 1975 ची गोष्ट. मी, माझे मित्र सुरेश बारवाल, अशोक तोनगिरे आम्ही तिघांनी ठरवले की, सायकलवरून पुण्याला जायचे! एसटीने 6 तासांत पुण्याला जाऊ शकतो, तर आपणास 12 तास लागतील. आम्ही तो निर्णय लगेच अमलात आणण्याचे ठरवले. दोन दिवसांनंतर पहाटे पाच वाजता उठलो. आईला सांगून ठेवलेले असल्याने आमचे डबे तयारच होते. बरोबर सहा वाजता आमच्या सायकल प्रवासास सुरुवात झाली. आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. थंडीचे दिवस असल्याने सायकल चालवणे कठीण नसते. तसेच सकाळची वेळ असल्याने ताज्या दमाने भरभर पायडल मारत निघालो होतो. दुपारपर्यंत वडाळा गाव गाठले. सोबत आणलेले डबे तेथील हॉटेलात बसून खाल्ले. सपाटून भूक लागली होती. सगळे डबे रिकामे झाले. पुन्हा नव्या दमाने प्रवास सुरू केला. सायंकाळी 5 वाजता नगरला पोहोचलो. पुन्हा भूक लागली होती. तेथील एका हॉटेलात पोटभर जेवण केले. कसंही करून पुणं गाठायचंच असा विचार करून पुन्हा प्रवासास सुरुवात केली.

सूर्य मावळतीकडे गेला होता. त्याचबरोबर आम्ही थकलो होतो. पायडलवरील पाय थांबायला तयार नव्हते. एकेक किलोमीटरचा दगड मागे टाकत मार्गक्रमण चालू होते. संध्याकाळी बोचरी थंडी सुरू झाली. आमच्या पायडलने घाटाच्या उतारात पुन्हा वेग घेतला. अंगात उष्णता येत असली तरी शिरूर घोडनदी येईपर्यंत थांबायचे नाही, असे ठरवले होते. शिरूरला पोहोचलो तेव्हा अंधार दाटला होता. या प्रवासात अंधाराचीही सवय झाली होती. शिकरापूर जवळ आले आणि पुणे टप्प्यात आल्याच्या आनंदात मनाने उभारी घेतली. मनात विचार आला, ट्रकमध्ये सायकली टाकून पुणे गाठावे. पण इतकी मेहनत वाया गेली असती. रात्री दीडच्या सुमारास पुणे स्टेशन गाठले. तेथून मंगळवार पेठेतील नातेवाइकाच्या घरी जाण्यास दोन वाजले होते. म्हणजे सायकल प्रवासास 20 तास लागले. त्यानंतर आठ दिवस धड उभंही राहता येत नव्हतं. सायकल प्रवासाचा अनुभव कठीणच वाटला.