आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषयवार वृक्षबागांचा अधिकारी माणूस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात विविध ठिकाणी सामाजिक वसा जोपासत नेटानं काम करणाऱ्या मेहनती, कर्तृत्ववान व्यक्तींना या सदराच्या माध्यमातून आपण भेटत असतो. या वेळी ओळख करून घेऊ, वन लागवड हा अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षीही नेटानं पुढे नेत व्रतस्थपणे वृक्ष लागवड करणाऱ्या माधवराव बर्वे यांची. 


‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ची ‘नाशिक जिल्हा संस्कृतीवेध’ मोहीम सुरू होती. ‘थिंक’चे कार्यकर्ते निफाड तालुक्यातील गावागावांत भटकंती करत कर्तृत्ववान मंडळींच्या भेटीगाठी घेत होते. ती भटकंती कोठुरे गावापर्यंत पोहोचली अाणि तेथे गवसले ‘नक्षत्रवन’सारख्या संकल्पनांच्या अाधारे देशभरात अनेक वनांची लागवड करणारे माधवराव बर्वे!


माधवराव बर्वे हे ब्याऐंशी वर्षांचे तरुण, उत्साही अाणि संशोधक वृत्तीचे शेतकरी पंचावन्न वर्षांपासून­ शेतीचे जणू व्रत परिपालन करत आहेत. ते सायकलवरून शेतात जातात. बर्वे हे आध्यात्मिक वृत्तीचे, साधी राहणी असलेले, पण ज्ञानी, अनुभवसंपन्न असे प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी रसायनशास्त्रात पदवी मिळवली, मात्र नोकरीऐवजी घरच्या शेतीत काम करण्याचे ठरवले. ते शेतीत नवनवे प्रयोग करत आले आहेत. ते सेंद्रिय शेतीविषयी परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी फिरत असतात, मुख्यत्वे वृक्ष लागवडीच्या निमित्ताने निरनिराळ्या राज्यांत भटकंती करतात. त्यांच्या त्या कामाने त्यांना महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून दिली अाहे.


बर्वे यांची शेती १९६० पर्यंत पारंपरिक पद्धतीची, अनुभवावर आधारित होती. पुढे परिस्थिती बदलली. पिकाला ‘एनपीके’ व सूक्ष्म पोषक घटक  लागतात हे समजले. त्यात हायब्रीड सीडची भर पडली. बर्वे स्वतः विज्ञानाचे विद्यार्थी. त्यांनी तो बदल स्वीकारला. त्यांच्या शेतीत रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर सुरू झाला. पण १९७० नंतर उत्पादनात घट जाणवू लागली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, ती घट रासायनिक खतांमुळे होत आहे. त्यांनी त्यानंतर सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली अाणि त्यांच्या शेतीचे स्वरूप पालटले. सध्या ते पाच एकरांवर ऊस उत्पादन व पंधरा एकर जमिनीवर गव्हाचे उत्पादन घेतात. त्यांनी शेतात बांबूची लागवड केली असून तेथे निरनिराळ्या प्रकारच्या आंब्यांची पंचवीस झाडे आहेत.


बर्वे म्हणतात की, झाडांचा उच्छ्वास हा प्राण्यांचा श्वास व प्राण्यांचा उच्छ्वास हा वनस्पतींचा श्वास आहे. प्राण्यांनी उत्सर्जित केलेले मलपदार्थ, त्यांचे मृतदेह हे वनस्पतींचे अन्न. वनस्पतींचे देहोत्सर्ग हे प्राण्यांचे अन्न. ती देवाणघेवाणीची नैसर्गिक प्रक्रिया व्यवस्थित चालली तर अन्नचक्रात अडथळा निर्माण होणार नाही आणि कोणत्याही शेतीस रासायनिक खतांची गरज भासणार नाही. द्विदल पिकांच्या मुळाशी असलेले जीवाणू हवेतील नायट्रोजन शोषून त्याच्या गाठी बनवतात. कोणत्याही पिकाचा शेष भाग शेतात तसाच राहू द्यावा, कारण ते सूक्ष्म जिवाणूंचे अन्न असते. शेताभोवती वेगवेगळ्या प्रकारची झाडे वाढू द्यावीत. त्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे मित्रकीटक राहतात. ते पिकांवरील कीटकांना खातात. त्यामुळे आपोआप कीड नियंत्रित होते. पाणी पीक मागेल तेव्हाच द्यायचे. शेताचे चार भाग करून त्यावर रोटेशन पद्धतीने पिके घेतल्यास,जमिनीची हानी होत नाही. वृक्ष लागवड हा माधव बर्वे यांच्या जिव्हाळ्याचा विषय! त्यांनी विक्रम बोके यांचा पुण्याजवळचा डोंगर, सेण्ट्रल जेल (नाशिक रोड) या ठिकाणी वृक्ष लागवड केली. त्यांचे काम पाहून त्यांना स्कूल ऑफ आर्टिलरी (देवळाली) या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी बोलावण्यात आले. त्यांना त्यानंतर देशातील इतर राज्यांतून म्हणजे आर्मी हेडक्वार्टर्स (नवी दिल्ली), आर्मी कँटोनमेंट (जबलपूर व चंदिगड), आर्मी हेडक्वार्टर्स (बंगळुरू) व सिख रेजिमेंट व पंजाब रेजिमेंट (रामगड, रांची, झारखंड) अशा ठिकाणांहून बोलावणी येऊ लागली. त्यांनी पुण्याजवळील राजगुरुनगर येथे जे. कृष्णमूर्ती यांच्या ‘सह्याद्री हायस्कूल’च्या परिसरात वृक्ष लागवड केली आहे. तसेच, गुजरात सीमेवरील बावीस गावांत चिंचेची साडेतीन हजार झाडे व तेथील प्रत्येक झोपडीसाठी बदामाचे एक झाड अशी वृक्ष लागवड केली आहे. त्यांची एकट्याची वृक्ष लागवडीची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. त्यांनी लावलेल्या झाडांत अर्जुन, करंजी, चिंच, शेवगा, हदगा, शिकेकाई, सावरी, बांबू अशा सर्व प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.


बर्वे यांचा वने लागवड करण्यात विशेष हातखंडा आहे. ‘नक्षत्रवन संकल्पना’ हा बर्वे यांचा प्रियतम विषय आहे. त्यांनी पाडेगाव-फलटण (राहुरी कृषी विद्यापीठ) येथे नक्षत्रवन उभे केले आहे. त्यात वर्तुळाकार पद्धतीने झाडांची लागवड केली जाते. प्रत्येक नक्षत्रासाठी एक अशी सत्तावीस झाडे प्रत्येक वर्तुळात असतात. तशी तीन वर्तुळे एकात एक आखावी लागतात. पहिले वर्तुळ २९.४ मीटर, दुसरे पंचवीस व तिसरे एकवीस मीटर त्रिज्येचे असते. त्या वनाची रचना करण्यास एक एकर जागा लागते. त्या वननिर्मितीमध्ये पाच ते सहा वर्षांचा काळ जातो. त्या सत्तावीस झाडांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. बर्वे यांनी तयार केलेले नक्षत्रवन कोठुरे गावाजवळ, आर्टिलरी स्कूल नाशिकजवळ व सिन्नर या ठिकाणी पाहता येतात. औषधी वनस्पतींची लागवड, वेदांतील वनाबाबतचे विचार, पर्यावरण व त्याचे महत्त्व, नक्षत्रवन संकल्पना, सरस्वतीवन, लक्ष्मीवन, नवग्रहवन, राशिवन, पंचवटी वन, अशोकवन, वृंदावन हे बर्वे यांच्या आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधी वनांची कामे मिलिटरी परिसरामध्ये, वन खात्यात आणि इतर ठिकाणी केली आहेत. तसेच, कौटिलीय अर्थशास्त्रातील शेतीविषयक विचार हा त्यांच्या अभ्यासाचा आणखी एक विषय!


बर्वे म्हणतात की, शेतकऱ्याने त्याच्याकडील जमिनीच्या पस्तीस टक्के जमीन वृक्ष लागवडीसाठी वापरणे आवश्यक आहे, पण सध्या ते प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे.


माधवराव बर्वे यांना ऊस आणि गहू या पिकांविषयी जास्त ओढ आहे. त्यांनी तीन वेळा त्या पिकांच्या गटात उच्चांकी टनेज करून दाखवले आहे. ते सलग सहा वर्षें शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन होते. त्यांच्या नेतृत्वामुळे तो संघ फायद्यात आला. विक्रमी विक्री झाल्यामुळे त्यांना एक मोटारसायकल बक्षीस मिळाली. ते सहा वर्षें पंचायत समितीमध्ये नॉन व्होटिंग मेम्बर होते. त्यांनी त्या काळात ‘कोठुरे उपसिंचन’ ही संस्था काढून एक हजार एकराची योजना राबवली. ती संस्था सध्या कर्जमुक्त असून व्यवस्थित सुरू आहे. बर्वे ‘महाराष्ट्र ऑर्गनिक फार्मिंग फेडरेशन’ (मॉफ) साठी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी युनोच्या शेती विभागाला ‘मॉफ’तर्फे भारतात भात, गहू, सोयाबीन, ऊस इत्यादी पिकांची सेंद्रीय शेती कशा प्रकारे केली जाते याची माहिती पाठवण्याचे काम केले. बर्वेे वन खात्याच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये, एनएसएसच्या शिबिरांमध्ये व इतरत्र बोलावतील त्या ठिकाणी वृक्ष लागवड, पर्यावरण, सेंद्रिय शेती, निरनिराळ्या वन संकल्पना इत्यादी विषयांवर भाषण देण्यासाठी जात असतात. त्यांना त्यांच्या कामासंबंधात शं.ल. किर्लोस्कर यशप्राप्ती हा आदर्श शेतकऱ्याचा पुरस्कार २०११ मध्ये मिळाला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते सेंद्रिय शेतीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.


(माधव बर्वे ९४०३७०९३२४/ ८००७६०७६६३, कोठुरे (नाशिक) फोन ०२५५०२४१३१)
लेखक ‘थिंक महाराष्ट्र’चे कार्यकर्ते अाहेत.

- पुरुषोत्तम कऱ्हाडे, मुंबई
purusho1508@hotmail.com

बातम्या आणखी आहेत...