badminton / सिंधू पाच पदके जिंकणारी जगातील दुसरी महिला खेळाडू; यंदाच्या सत्रात पहिला किताब

ओकुहारावर २१-७, २१-७ ने मात,  दाेन फायनल पराभवानंतर आता चॅम्पियन

दिव्य मराठी वेब

Aug 26,2019 12:03:02 PM IST

बासेल - जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू रविवारी एेतिहासिक यशाचा पल्ला गाठला. तिने वर्ल्ड चॅम्पियनशिप पटकावली. तिने अवघ्या ३८ मिनिटांमध्ये वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याचा इतिहास रचला. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचा किताब जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. यासह तिने विक्रमी यश संपादन केले.


भारताच्या २४ वर्षीय सिंधूने महिला एकेरीच्या फायनलमध्ये २०१७ च्या किताब व विजेत्या नाओमी ओकुहारावर मात केली. तिने २१-७, २१-७ अशा फरकाने सरळ दाेन गेममध्ये अंतिम सामना जिंकला. यासह तिने गत दाेन वेळच्या फायनलमधील पराभवाची आपली मालिका खंडित केली. तसेच ओकुहाराला २०१७ च्या फायनलमधील पराभवाची परतफेड केली. जागतिक क्रमवारीत चाैथ्या स्थानावर असलेल्या ओकुहाराने दाेन वर्षांपूर्वी ११० मिनिटांत फायनलमध्ये सिंधूचा पराभव केला हाेता.

आॅलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूची करिअरमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपची ही सलग तिसरी फायनल हाेती. यापूर्वी सलग दाेन वेळा तिला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ती उपविजेती ठरली. मात्र, आता तिसऱ्या प्रयत्नात चॅम्पियन हाेण्याच्या इराद्याने ती काेर्टवर उरतली हाेती. हेच टार्गेट गाठून तिने किताब जिंकण्याचा पराक्रम गाजवला.


गत ५ सामन्यांत ओकुहाराला चाैथ्यांदा नमवले

भारताच्या सिंधूने आपल्या करिअरमध्ये आता गत पाच सामन्यांत ओकुहाराचा चाैथ्यांदा पराभव केला. या दाेघींमध्ये हा १६ वा सामना हाेता. यात नऊ विजयासह सिंधू आघाडीवर आहे. तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसऱ्यांदा ओकुहाराला पराभूत केले.यासह तिला या खेळाडूविरुद्ध आपला दबदबा कायम ठेवता आला.


पंतप्रधान माेदींकडून काैतुकाचा वर्षाव; बॅडमिंटन महासंघाकडून सिंधूला २०, प्रणीतला ५ लाख
सिंधूपाठाेपाठ प्रणीतनेही पदक जिंकले. ताे पुरुष गटात कांस्यपदकाचा मानकरी ठरला. बॅडमिंटन महासंघाच्या वतीने दाेघांनाही बक्षिसे जाहीर झाली. यात सिंधूच्या २० लाख व प्रणीतच्या ५ लाखांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सिंधूवर काैतुकाचा वर्षाव केला.

पहिला गेम १६ मिनिटांत जिंकला
सिंधूने पहिल्या गेममध्ये चांगली सुरुवात करताना ५-१ ने आघाडी घेतली. हीच लय कायम ठेवताना तिने १२-२, १६-२ ने आघाडी घेतली. त्यानंतर २१-७ ने पहिला गेम जिंकला. यासह तिने १६ मिनिटांत पहिल्या गेममध्ये बाजी मारली. त्यानंतर दुसऱ्या गेमध्येही तिने हीच खेळी कायम ठेवली. यामुळे तिला आघाडी घेत दुसरा गेम सहज जिंकता आला.

X
COMMENT