आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशनात मांडण्यासाठी लाेकांकडून मागवले प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दुष्काळ, महागाई, इंधनाचे वाढते दर, महिला सुरक्षा आणि आरक्षणासारख्या राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर सरकारला जाब विचारण्यासाठी प्रश्न पाठवण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. सर्वसामान्य जनतेद्वारे आलेले हे प्रश्न येत्या हिवाळी अधिवेशनातच सरकारला विचारणार असल्याची माहितीही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.   


राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येऊन चार वर्षे नुकतीच पूर्ण झाली आहेत. मात्र, सर्वसामान्य जनतेशी निगडित कोणताही प्रश्न अद्याप राज्य सरकार सोडवू शकले नसल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. त्याविरोधात राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने करत विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरतच आहे. मात्र, राज्य सरकारच्या कारभाराविरोधात सर्वसामान्यांच्या मनात जो रोष आहे, तो व्यक्त करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हणूनच सर्वसामान्य जनतेने आपल्या भागातील समस्या आणि जनसामान्यांना भेडसावणारे प्रश्न आमच्याकडे पाठवावेत. आम्ही ते सरकारदरबारी मांडून त्याची तड लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. विधिमंडळात जो आवाज उठणार आहे, तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा नसेल, तर त्यात सर्वसामान्य जनतेचाही आवाज असेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. 


दरम्यान, आता राष्ट्रवादीनंतर काँग्रेस याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   तसेच या अधिवेशनात सत्तेत असले तरी शिवसेना देखील भाजपवर प्रहार करेल, असेही राजकीय वर्तुळात सांगण्यात  येत आहे.

 

या ई-मेलवर करा संपर्क  
सरकारला काही प्रश्न विचारायचे असल्यास किंवा स्थानिक समस्यांबाबत सरकारकडून प्रतिसाद अपेक्षित असल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई पक्ष कार्यालयात व्यक्तिश: संपर्क केला जाऊ शकतो. तसेच ncpconnect.mumbai@gmail.com या ई-मेलवर नागरिक आपले प्रश्न पाठवू शकतात, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात  आले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...