Home | Bollywood | Marathi Cinekatta | qutub marathi short film by vinit bhonde

'कुतुब' : शॉर्ट फिल्म - एका आशावादी माणसाच्या जिद्दीची कहाणी, महत्त्वाकांक्षेने आयुष्य जगणाऱ्यांसाठी

पुजा सोनुने | Update - Dec 27, 2018, 10:27 AM IST

'चला हवा येऊ दया' आणि 'बिग बॉस' फेम - विनीत भोंडे..

  • qutub marathi short film by vinit bhonde

    एंटरटेन्मेंट डेस्क : औरंगाबादच्या लाडक्या विनीत भोंडेने आपल्या विनोदी अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवले आहे. त्याने मराठी बिग बॉस कार्यक्रमातही तितक्याच जिद्दीने त्याने टिकून राहण्याचा प्रयत्न केला आणि उत्तम पद्धतीने त्याने तो खेळ खेळाला. आता विनीतची एक शॉर्टफिल्म रिलीज झाली आहे. या शॉर्टफिल्मसाठी त्याचे सर्वांकडूनच कौतुक होते आहे. या शॉर्टफिल्मचे नाव आहे 'कुतुब' आणि लेखन, दिग्दर्शन रोहन निकम याने केले आहे.

    'कुतुब' ही एका मध्यमवर्गीय आणि ठेंगण्या मुलाची गोष्ट आहे. जो सर्व गोष्टी सांभाळून, आपला कळत नकळत होणारा अपमान सहन करून, पण तितक्याच जिद्दीने जगतो आणि आपले स्वप्न पूर्ण करतो. याच चित्रपटसंदर्भात आम्ही विनितशी गप्पा मारल्यात. या शॉर्टफिल्मबद्दल विनितला, ती का करावीशी वाटली? असे विचारले असता तो म्हणाला, "ही एका ठेंगण्या मुलाची गोष्ट आहे. मी या गोष्टीला खूप चांगल्या प्रकारे समजू शकतो. हा विषय माझ्यासाठी महत्वाचा आणि तितकाच जवळचा आहे. हा विषय जगासमोर मांडतांना मला अत्यंत आनंद होत आहे. या चित्रपट जो मुलगा दाखवला आहे, त्याचे आयुष्य ज्यापद्धतीने दाखवले आहे, तसे आयुष्य काही प्रमाणात मीही जगलो आहे. या शॉफिल्ममधील अनेक प्रसंग माझ्यासोबतही घडले आहेत. म्हणून ही शॉर्टफिल्म करावीशी वाटली."

    या चित्रपटातील नायकाला छोटू म्हटल्यानंतर राग येतो तसा विनीतलाही येतो का? असे विचारले तर तो म्हणला, "खरे सांगायचे तर, हो. येतो. राग येणे स्वाभाविकच आहे. आपल्यातील एखाद्या कमतरतेमुळे जर लोक आपल्याला हिणवत असतील तर आपल्याला राग येतो. पण मी आता या सर्व गोष्टींना पॉझिटीव्हली घ्यायला शिकलो आहे." यापुढे त्याला फिल्ममध्ये जसे किस्से त्यामुलासोबत घडतात तसा एखादा किस्सा त्याच्यासोबत घडलेला आहे का असे विचारले. यावर त्याने सांगितले, "असे अनेक किस्से घडले आहेत. त्यातील एक सांगतो. मी ११ वीत असताना कॉलेजमध्ये एक मुलगी मला आवडली. ती ग्रॅजुएशनच्या फर्स्ट इयरला होती. मी ठरवले हिच्याशी बोलायचे. मी हिम्मत करून तिच्याकडे गेलो. तिला विचारले, आपण मैत्री करू शकतो का? तेव्हा ती म्हणाली, तू अजून लहान आहेस तुझ्याशी कशी मैत्री करणार. मला वाटले यार मी ११वीत गेलो अजूनही मी लहान कसा असेन. पण तो विषय मी तिथेच सोडला. त्यानंतर काही दिवसांनी माझे एक नाटक सर्वांसमोर सादर झाले. त्याचे सर्वानीच कौतुक केले. ती मुलगी कित्तेक दिवसांनी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, 'तू खूप छान काम केलेस, मला आवडले. तू मला ओळखले नाही का?' असे करत तिने मला परत त्या गोष्टीची आठवण करून दिली. अभिनयाने नाटकाने मला नवी ओळख बनवून दिली."

    विनीतने 'चला हवा येऊ द्या' सोडल्यानंतर मराठी 'बिग बॉस' मध्येही सहभाग घेतला होता. त्याला विचारले की बिग बॉसच्या घरातील अनुभव कसा होता आणि त्यानंतर आयुष्यात काही बदल झाले का?, विनीत म्हणाला, " बिग बॉसच्या घरात मी खूप गोष्टी नव्याने शिकलो. जबाबदाऱ्या अंगावर घेणे आणि त्या निभावणे हे यापूर्वीही मी करायचो. पण बिग बॉसच्या शोनंतर सगळ्याच गोष्टीत सहभाग वाढला, मी जास्त चांगल्या प्रकारे सर्व जाबबदाऱ्या आता पेलतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी बिग बॉसच्या घराने शिकवली ती म्हणजे वाट पाहणे. माझ्यात आता खूप पेशन्स आहे. आता सर्व गोष्टींसाठी प्रयत्न करत योग्य वेळेची वाट पाहू शकतो." विनीतचे याचवर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच लग्न झाले. त्याचे वर्ष पर्सनल आणि प्रोफेशनल बाबतीत कसे होते असे आम्ही त्याला विचारले. विनीत म्हणाला, "पर्सनल बाबतीत म्हणाल तर मी त्याबाबतीत खूप नशीबवान आहे. प्रत्येकाचे एक स्वप्न असते की माझा जोडीदार असा असावा, तसा असावा माझेही होते. पण खरे सांगायचे तर माझा जोडीदार माझ्यासाठी अत्यंत योग्य असा मला मिळाला आहे. मी त्याबाबतीत खूप आनंदी आहे. सुखी आहे आणि प्रोफेशनल बाबतीत म्हणाल तर 'कुतुब' आणि यांच्यासारखे अजून काही प्रोजेक्टशी मी केले आहेत, करतो आहे. त्यामुळे यापुढेही अजून काम तुम्हाला दिसेल. एक आगामी चित्रपट येणार आहे पण त्याचे नाव सध्या रिव्हील करता येणार नाही."

Trending