आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात नोकर भरतीसाठी रॅकेट सक्रिय; आयुक्तांनी केली बंदोबस्ताची तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महानगरपालिकेत जानेवारी महिन्यात प्रथम ते चतुर्थ श्रेणीतील १२०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याचे जाहीर होताच पैसे घेऊन नियुक्तिपत्र देण्याचे आमिष दाखवणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. हे कळताच आयुक्त डॉ. निपुण विनायकही सक्रिय झाले असून त्यांनी कडेकोट बंदोबस्तात भरती प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत एकाही उमेदवाराला मागच्या दाराने प्रवेश मिळणार नाही. प्रशासनातील बहुतांश अधिकाऱ्यांनाही भरतीपासून शंभर हात दूर ठेवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

मनपात २०११ पासून नोकर भरती झाली नसल्याने ६३८ पदे रिक्त आहेत. पुढील वर्षात किमान २०० जण निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागा पदोन्नतीने भरण्यात येतील. ७५० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जागांवरही कायम नेमणूक देण्यात येईल. एकूणात १२०० जागा जानेवारी अखेरपर्यंत भरल्या जातील. याची माहिती ४ डिसेंबर रोजी जाहीर होताच रॅकेट सक्रिय झाले. महापौर नंदकुमार घोडेले यांचे नाव घेऊन दलाल आमिष दाखवत आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांनी कंत्राटावरील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर गळ टाकला आहे. साडेतीन लाख रुपयांत थेट नियुक्तिपत्र मिळेल, असे त्यांना सांगण्यात येत आहे. ही बाब निदर्शनास आणून दिली असता दलालांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

नोकर भरतीवर लक्ष 

मनपातील नोकर भरती पारदर्शक आणि फक्त गुणवत्तेनुसार, कोणत्याही गैरव्यवहाराविनाच झाली पाहिजे, अशी दिव्य मराठीची भूमिका आहे. त्यामुळे या भरतीवर 'दिव्य मराठी'चे लक्ष राहणार आहे.

 

आता खासगी संस्था : 

आतापर्यंत भरती मनपाच्या अधिकाऱ्यांमार्फतच झाली. त्यात प्रत्येक वेळी गैरव्यवहार उघडकीस आले. त्यामुळे आता खासगी संस्था नियुक्त केली आहे. संस्थेची निवड थेट आयुक्तांमार्फत होणार असून परीक्षेवर त्यांचे नियंत्रण राहील.

 

दहा वर्षांपूर्वीच्या भरतीत फुटली होती प्रश्नपत्रिका 

२००८-२००९ मध्ये महापालिकेत सुमारे १५७ पदांसाठी भरती झाली होती. त्यात प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते उत्तरपत्रिका तपासून निकाल जाहीर करण्यापर्यंतचे काम तत्कालीन उपायुक्त अरुण आनंदकर यांच्याकडे सोपवण्यात आले होते. त्यांनी तज्ज्ञांची नियुक्ती करून प्रश्नपत्रिका तयार केली. कोणत्याही परिस्थितीत पेपर फुटणार नाही, असा दावा तत्कालीन आयुक्त असीमकुमार गुप्ता यांनी केला होता. प्रत्यक्षात आनंदकरांच्या स्वीय सहायकानेच त्याच्या भावासाठी प्रश्नपत्रिका फोडली. काही पदाधिकाऱ्यांनी हात धुऊन घेतल्याचे उघड झाले होते. अर्थात त्याचा परिणाम भरतीवर झाला नाही.

 

गुणवत्ता हाच निकष 

भरतीमध्ये केवळ गुणवत्ता हाच निकष असेल. अगदी बोटावर मोजण्याइतकेच वरिष्ठ अधिकारी प्रक्रियेत असतील. त्याशिवाय इतर कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही. त्यामुळे पूर्ण प्रक्रिया पारदर्शक होईल. गेल्या ३५ वर्षांत अनेक वेळा बोगस भरती करून शहराला फसवणाऱ्यांना या भरतीत संधी मिळणार नाही, अशी यंत्रणा राबवली जाईल. डॉ. निपुण विनायक, मनपा आयुक्त 

 

घर-जमीन विकून कोणालाही पैसे देऊ नका 

विद्यमान आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी आतापर्यंत काही कामे पारदर्शक पद्धतीने केली आहेत. त्यामुळे त्यांच्याच कार्यकाळात नोकर भरती व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. त्यात गैरव्यवहार होऊ नये, याची काळजी आम्ही घेऊ. उमेदवारांनी घर-जमीन विकून, सोने गहाण ठेवून, कर्ज काढून कोणालाही पैसे देऊ नयेत. नंदकुमार घोडेले, महापौर 
 

बातम्या आणखी आहेत...