आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षश्रेष्ठींवर नाराज नसल्याचे सांगत विखेंनी साेडली काँग्रेसची आमदारकी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विराेधी पक्षनेतेपदाचा राजीनामा यापूर्वीच देणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी काँग्रेसच्या आमदारकीचाही विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला.  ‘आपण पक्षश्रेष्ठीवर नाराज नाही, केवळ परिस्थितीमुळे मला काँग्रेस सोडावी लागत आहे’, असे सांगत आपण भाजपत प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. दरम्यान, आपल्यासाेबत काँग्रेसचा एकही बंडखाेर आमदार पक्षांतर करणार नसल्याचे विखे पाटील सांगत असतानाच पक्षाचे बंडखाेर आमदार अब्दुल सत्तार यांनी मात्र विखे व आपल्यासाेबत १० आमदार भाजपत जाण्याच्या तयारीत असल्याचा पुनरुच्चार केला.


मुलगा सुजय लाेकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर राधाकृष्ण विखेही काेणत्याही क्षणी भाजपत जाण्याची शक्यता हाेती. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळपासूनच मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला. सकाळी विखेंच्या बंगल्यावर काँग्रेसमधील बंडखोर नेत्यांची बैठक झाली.  या बैठकीला माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, पंढरपूरचे आमदार भारत भालके, माण-खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे, सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार, नायगावचे आमदार कालिदास कोळंबकर उपस्थित होते. त्यानंतर विखेंनी थेट विधिमंडळ गाठून आमदारकीचा राजीनामा दिला. तसेच मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली.  त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘काँग्रेसमध्ये माझी घुसमट होत होती. मुलगा सुजयने भाजपची उमेदवारी घेतली, तेव्हाच मी कांॅग्रेस साेडायचे ठरवले हाेते.’ 


मंत्रिपदाचीही चर्चा
१७ जून रोजी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू हाेत आहे. त्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यात विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागून त्यांना पुण्याचे पालकमंत्रिपदही बहाल केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. तसे झाल्यास विखे पाटील घराण्याचे पारंपरिक विरोधक शरद पवारांची त्यांच्याच होम डिस्ट्रिक्टमध्ये भाजप कोंडी करू शकते.


आमच्या तिकिटाचे काय?
विखेंसाेबत काँग्रेसचे काही आमदार भाजपत जाण्यास तयार आहेत. मात्र त्यांच्यापैकी काही जणांचे मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे ‘आम्हाला भाजपत प्रवेश केल्यावर तिकीट मिळेल का?  नुकताच देण्यात आलेला आमदार निधी रद्द तर होणार नाही ना?’, असे प्रश्न या आमदारांनी बैठकीत उपस्थित केल्याचे समजते. या कारणामुळे बंडखाेर आमदार सावध पवित्रा घेत तूर्त भाजपत जाणार नसल्याचे समजते.


दहा आमदार संपर्कात  : सत्तार
विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे दहा आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट अब्दुल सत्तार यांनी आज केला. काँग्रेस नेतेच पक्ष संपवीत आहेत, या नेत्यांमुळे काँग्रेसमधील आमदारांना भाजपत जाण्याची वेळ आल्याचा दावा त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे नाव न घेता केला.