Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Radhakrishn Vikhe said that Fist his son will become MP the I will join BJP

आधी लगीन सुजयच्या खासदारकीचं, त्यानंतरच आपल्या भाजप प्रवेशाचं! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची ‘मन की बात?’

अनिरुद्ध देवचक्के | Update - Apr 13, 2019, 09:52 AM IST

विखेंवर कारवाईचे काँग्रेसमध्येही धाडस नाही  

 • Radhakrishn Vikhe said that Fist his son will become MP the I will join BJP

  नगर - पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या शुक्रवारच्या नगरमधील सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश पक्का समजला जात हाेता, मात्र तसे काही घडले नाही. ‘माझ्या वडिलांचा संघर्ष फक्त राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे. काँग्रेसवर त्यांचा राग नाही. त्यामुळे त्यांनी भाजपत तूर्तास प्रवेश केलेला नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांचे पुत्र व भाजपचे नगर मतदारसंघातील उमेदवार डाॅ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी बाेलताना दिली. त्यामुळे विखेंच्या पक्षांतराबाबतचा सस्पेन्स अजूनच वाढला आहे.


  १२ मार्च राेजी डॉ. सुजय विखे यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांचे पिता राधाकृष्ण हेही लवकरच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील आणि काँग्रेसच्या १२ अामदारांसह भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा केवळ नगरमध्येच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हाेती. त्यासाठी माेदींच्या सभेचा ‘मुहूर्त’ही शाेधण्यात आला हाेता. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्वत: राधाकृष्ण विखे यांनीही ‘लवकरच भूकंप घडवून आणू,’ असे सूचक वक्तव्य केले हाेते. दरम्यानच्या काळात गेल्या महिनाभरात विखे यांनी आपल्या मुलाच्या प्रचारासाठी मतदारसंघात दाैरे केले, बैठका घेतल्या. माेदींच्या सभेच्या नियाेजनासाठीच्या बैठकांनाही त्यांनी हजेरी लावली. भाजपशी वाढत चाललेली त्यांची ही जवळीक पाहता माेदींच्या उपस्थितीत विखे भाजपत प्रवेश करतील, असे त्यांचे समर्थक सांगत हाेते. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनीही ‘विखे पाटील आणि भाजपतील अंतर आता कमी झालेले आहे’ असे सांगितले होते. तथापि ते पूर्णपणे मिटलेले नाही हेच मोदींच्या सभेनंतर लक्षात आले.


  दरम्यान, एकीकडे भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणे व दुसरीकडे काँग्रेसच्या पदांवर कायम राहणे या दुटप्पी भूमिकेमुळे विखेंची प्रतिमा खालावली जाईल. त्याचा काँग्रेसवर परिणाम होणार नाही, असे मानणारा एक मोठा वर्ग काँग्रेसमध्ये आहे. त्यांचे पक्षांतर्गत विरोधक बाळासाहेब थोरात चांगलेच आघाडीवर आहेत. त्यामुळे विखे यांची अधिकाधिक गोची करून गंमत पाहण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न असल्याचीही चर्चा आहे.

  कुठे अडले घाेडे ?
  मुलाच्या प्रचार सभेत अापला भाजप प्रवेश हाेणं हे कदाचित आपल्या ‘स्टेटस’ला मानवणार नाही, असे राधाकृष्ण यांना वाटले असावे. आपण किमान १० ते १२ आमदारांना घेऊन भाजपत जावे, त्या वेळी स्वतंत्र कार्यक्रम घेऊन जाेरदार शक्तिप्रदर्शन करावे, असा त्यांचा विचार असावा. मात्र लाेकसभेचा निकाल लागण्यापूर्वी एवढ्या माेठ्या संख्येने आमदार विखेंसाेबत येतील का? याबाबत शंका व्यक्त हाेत आहे. म्हणूनच विखेंनी थाेडा ब्रेक घेतला असावा, अशी चर्चा आहे. ‘आधी सुजयला खासदार करू. पुन्हा भाजपची सत्ता केंद्रात येते का ते पाहू, राज्याचा काैलही जाणून घेऊ अन् मगच निर्णय घेऊ,’ असा सावध पवित्राही त्यांनी घेतला असण्याची शक्यता आहे.

  विखेंवर कारवाईचे काँग्रेसमध्येही धाडस नाही
  भाजपचा प्रचार करत असतानाही काँग्रेसने अद्याप राधाकृष्ण विखेंवर कारवाई केलेली नाही की पदाचा राजीनामाही घेतलेला नाही. काँग्रेस त्यांना एवढं सांभाळून का घेतंय हे न उलगडलेलं कोडंच बनलं आहे. उलट ‘दोन्ही डगरीवर पाय ठेवून’ विखेच काँग्रेसची कोंडी करत असल्याचे दिसते. दुसरीकडे, भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसची मदत मिळत असल्याचे पाहून भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत.’ सुजयचा काँग्रेस प्रवेश हा एक पाॅलिटिकल सर्जिकल स्ट्राइक होता,’ असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात ते उगाचच नव्हे!

Trending