आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंना मानसोपचारांची गरज, राधाकृष्ण विखे यांची खरमरीत टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता - सत्तेत राहून शिवसेना स्वत:ची ओळख विसरली आहे. साडेचार वर्षे सत्तेत बसल्यानंतर शिवसेनेला आता देशद्रोह वाटू लागला आहे, पण या देशद्रोहात तुम्ही सहभागी झालात त्याचे काय? असा सवाल करून उध्दव ठाकरे सध्या कुठे आहेत याचे भान त्यांना राहिलेले नाही. अस्मितेच्या मुद्याचा राजकारणासाठी सोईनुसार वापर करून मुक्ताफळे उधळणाऱ्या ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याची खरमरीत टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी केली. 


गणेश सहकारी साखर कारखान्याच्या गाळपाचा प्रारंभ करताना विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. गणेशचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, विखे कारखान्याचे उपाध्यक्ष कैलासराव तांबे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, राहाता बाजार समितीचे अध्यक्ष बापूसाहेब आहेर, राहात्याच्या सभापती हिराबाई कातोरे यांच्यासह विखे व गणेश कारखान्याचे संचालक, सभासद, कार्यकर्ते व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देत विखे यांनी त्यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. शिवसेना भाजपबरोबर सत्तेत आहेत. त्यांच्या खोट्या अाश्वासनावर शिवसेनेची चार वर्षांची वाटचाल सुरू आहे. चार वर्षांनंतर भाजप त्यांना देशद्रोही वाटायला लागला. ठाकरेंवर खऱ्याअर्थांने परिणाम झालेला दिसतो. देशद्रोह्याबरोबर सत्तेत बसलात ना? त्याचा तुम्ही खुलासा करा, असे जाहीर आव्हान विखे यांनी दिले. सत्तेत राहून तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका करता, तो तुमचा जुमलाच आहे ना. ठाकरे यांनी २३५ वेळा सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा केली, पण ते अजून बाहेर पडलेले नाही. आता म्हणतात अयोध्येला चाललो. महाराष्ट्रात शिवसेनेची पत संपल्यामुळेच त्यांना रामाची गरज वाटू लागली, असा टोला विखे यांनी मारला. 


राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. २०० तालुक्यांत दुष्काळ असताना केंद्राकडून राज्याला मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्री जलशिवार योजनेचे तुणतुणे वाजवत आहेत. राज्यात १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याची माहिती ते सांगतात. त्या १६ हजार गावांची आम्ही माहिती काढली आहे. त्यात फक्त काॅन्ट्रॅक्टरचे भले झाले आहे. हे तालुके तहानलेले आहेत. आठ हजार कोटी त्यावर खर्च केले ते कुठे गेले, असा प्रश्न विखे यांनी केला. 


गोदावरी जलआराखड्यालाही अाक्षेप, चुकीचे आकडे 
गोदावरी जलआराखड्यालाही आपला अाक्षेप आहे. चुकीची आकडेवारी अधिकाऱ्यांनी सरकारला दिली. यावर कुणीच बोलत नाही, आपणच बोलतो. काही गोष्टी जाहीरपणे बोलता येत नाहीत. पाण्यावरून प्रादेशिक वाद निर्माण होण्यापेक्षा नगर, नाशिक आणि मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना एकत्रित करून राज्य सरकारने या जटिल झालेल्या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी विखे यांनी केली. 

बातम्या आणखी आहेत...