आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस अडचणीत : सहा सक्षम उमेदवारांचे काँग्रेस पक्षाकडे शाॅर्टेज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर बदललेली राजकीय परिस्थिती, राष्ट्रवादीबरोबरील मतदारसंघांची अदलाबदल, कमी पडत असलेल्या सहा सक्षम उमेदवारांचा शोध, घटक पक्षांना सोडावयाच्या जागा यासंदर्भातले निर्णय घेऊन तसा प्रस्ताव दिल्लीला हायकमांडला पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारी काँग्रेसच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक होणार आहे.  


काँग्रेसच्या वाट्यास लोकसभेच्या २६ जागा आल्या. माकप  आणि स्वाभिमानीला किती जागा सोडायच्या याचा निर्णय या बैठकीत अपेक्षित आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी भाजपत प्रवेश केला आहे. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राधाकृष्ण या बैठकीत विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांचा राजीनामा पक्ष स्वीकारण्याची शक्यता नाही.  


काँग्रेसच्या २० उमेदवारांची नावे निश्चित झाली असून उर्वरित सहा उमेदवारांचा निर्णय या बैठकीत होणे अपेक्षित आहे. हे निर्णय दिल्लीत पाठवले जातील. काँग्रेसच्या केंद्रीय समितीत ते संमत केल्यानंतर महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली जाईल. यात मुकुल वासनिक (रामटेक), प्रिया दत्त (उत्तर मध्य मुंबई), एकनाथ  किंवा सुप्रिया गायकवाड (दक्षिण मध्य मुंबई), संजय निरुपम (उत्तर पश्चिम मुंबई), अमिता चव्हाण (नांदेड), चारुलता टोकस (वर्धा), माणिकराव ठाकरे (यवतमाळ), राजीव सातव (हिंगाेली) यांची नावे निश्चित मानली जातात. मात्र उत्तर मुंबई , पालघर, शिर्डी, भिवंडी, सांगली, रत्नागिरी मतदारसंघात काँग्रेसला निवडून येऊ शकेल असा सक्षम उमेदवार मिळालेला नाही. त्यामुळे काँग्रेस सक्षम उमदेवाराच्या  शोधात आहे.


विखेंवर कारवाईबाबत  अशाेक चव्हाणांनाच विचारा : थोरात 
काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्याच्या घरातूनच प्रतिस्पर्धी पक्षात घरोबा झाल्याने काँग्रेसमध्ये अंतर्गत दुफळी तीव्र झाली आहे. सुजय यांच्या प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात पक्षाने कोणतीही कडक कारवाई केलेली नाही त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत.  विखेंच्याच जिल्ह्यातील त्यांचे विरोधक माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखेंवर कारवाई करण्याची मागणी केली. यावर “दिव्य मराठी’ने त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे बोट दाखवले आहे.

बातम्या आणखी आहेत...