आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमधील मुलाच्या यशासाठी ‘काँग्रेसी’ विखेंचे देवींना साकडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर/काेल्हापूर - भाजपमध्ये जाऊन नगर लाेकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवणारा मुलगा डाॅ. सुजयच्या यशासाठी सध्या काँग्रेसमध्ये असलेले त्याचे वडील तथा विधानसभेचे विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील देवदेव करू लागले आहेत. बुधवारी त्यांनी श्रीक्षेत्र तुळजापूर व काेल्हापूर येथे जाऊन साडेतीन पीठांपैकी दाेन महत्त्वाच्या असलेल्या देवींचे दर्शन घेऊन मुलाच्या यशासाठी साकडे घातले. विशेष म्हणजे हेलिकाॅप्टरने केलेल्या या दाैऱ्यात त्यांच्यासाेबत काेणताही लवाजमा नव्हता. स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनाही त्यांच्या या खासगी दाैऱ्याची माहिती नव्हती.  


बुधवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान विखे पाटील माेजक्या लाेकांसाेबत तुळजापूरच्या हेलिपॅडवर  दाखल झाले. विशेष म्हणजे खासगी दाैऱ्यावर आणि देवदर्शनासाठी आलेल्या विखेंसाेबत कुटुंबातील एकही व्यक्ती नव्हती. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे त्यांनी दर्शन घेतले आणि  मातेची साडी-चोळीची पूजा बांधली. या वेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे स्थानिक आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अॅड. धीरज पाटील,  पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड,  बबन जाधव एवढी माेजकीच मंडळी उपस्थित हाेती. तुळजापूरचे दर्शन आटाेपून विखे पाटलांनी थेट काेल्हापूर गाठले. तिथेही त्यांनी माेजक्या लाेकांसाेबत जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. नंतर स्थानिक नेत्यांना न भेटताच तातडीने मंदिरातून थेट विमानतळ गाठले व हेलिकाॅप्टरने परतीचा प्रवास केला. 


दाेन दिवसांनी बाेलेन : विखे  
विखे पाटील आपल्या शहरात आल्याचे कळताच काेल्हापूर व तुळजापूरच्या काही पत्रकारांनी त्यांना गाठून त्यांना बाेलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुजयच्या पक्षांतराबाबत किंवा इतर काेणत्याही राजकीय विषयावर त्यांनी बाेलणे टाळले. ‘आपण काेणत्या पक्षात आहात?’ असा प्रश्न एका पत्रकाराने केला असता ‘अर्थात काँग्रेसमध्येच’ एवढेच उत्तर देऊन त्यांनी काढता पाय घेतला. दाेन दिवसांत पक्षश्रेष्ठींकडे बाजू मांडल्यानंतरच मी या विषयावर भाष्य करीन, एवढेच ते जाता जाता म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...