Home | Maharashtra | Mumbai | Radhakrishna Vikhe-Patil is likely in bjp

राधाकृष्ण विखे-पाटील पावसाळी अधिवेशनानंतर भाजपच्या गोटात, काँग्रेसमधून निलंबन होण्याची शक्यता

चंद्रकांत शिंदे | Update - May 15, 2019, 09:38 AM IST

खरे तर गेल्या एक-दोन वर्षांपासूनच राधाकृष्ण विखेपाटील भाजपमध्ये जाणार अशा बातम्या येत होत्या.

 • Radhakrishna Vikhe-Patil is likely in bjp

  मुंबई - विधानसभेतील विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेले काही दिवस जोरात सुरू होती. परंतु आत्ताच भाजपमध्ये जाऊन काही काम करता येणार नसल्याने अधिवेनशनानंतर विधानसभेसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी किंवा लागू झाल्यावर राधाकृष्ण विखे -पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.


  लोकसभा निवडणुकीत मुलगा सुजय याच्यासाठी शिर्डीची जागा सोडावी अशी मागणी राधाकृष्ण विखेपाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत केली होती. परंतु राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार नव्हते. विखे पाटील यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडेही अशी विनंती केली होती परंतु त्यांनीही सुजय यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा सल्ला दिल्याने विखेपाटील प्रचंड नाराज झाले होते. त्यानंतर सुजय विखे- पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि नगरमधून निवडणूक लढवली. लोकसभा धुमाळीत विरोधी पक्ष नेते असतानाही राधाकृष्ण विखेपाटील यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला नव्हता. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचाही राजीनामा दिला होता. पक्षविरोधी काम केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यांना कदाचित पक्षातून निलंबित केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन आता राधाकृष्ण विखेपाटील यांनी भाजप प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.


  भाजप प्रवेशाची दाेन वर्षांपासून सुरू आहे चर्चा
  खरे तर गेल्या एक-दोन वर्षांपासूनच राधाकृष्ण विखेपाटील भाजपमध्ये जाणार अशा बातम्या येत होत्या. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी भाजपवर विधानसभेत आक्रमक टीका केली होती. मात्र, आता त्यांचे मन बदलले आहे. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राधाकृष्ण विखे पाटील लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच भाजपमध्ये प्रवेश करणार होते. परंतु भाजप नेत्यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला.


  विखेंकडून उत्तर नाही
  याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी राधाकृष्ण विखेपाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपला मोबाईल क्रमांक मुंबईतील बंगल्यावर डायव्हर्ट करून ठेवला असल्याने बोलणे होऊ शकले नाही. त्यांना मेसेजही पाठवला. मात्र, बातमी लिहिपर्यंत त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. आता विखे यावर काय बोलतात याकडे सर्वाचे लक्ष असेल.


  भाजपकडून तिकीट
  आत्ताच पक्षात येऊन तसा काही उपयोग नसल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात आल्यास खूप काम करता येईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यानुसार आता ते जूनमध्ये सुरू होणारे अधिवेशन संपल्यानंतर भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश करणार असून त्यांना विधानसभेसाठी पक्षातर्फे तिकीटही दिले जाणार आहे असेही सूत्रांनी सांगितले.

Trending