आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखे पाटील यांची काँग्रेसमध्ये कोंडी होण्याची चिन्हे, तूर्तास काँग्रेस नेतृत्वाचीही वेट अँड वॉचची भूमिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर विरोधी पक्षनेतेपदी असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांची काँग्रेसमध्ये कोंडी होण्याची चिन्हे आहेत. तर आपल्या मुलासाठी अहमदनगर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोडवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी आपले वजन खर्ची न घातल्याबद्दल खुद्द राधाकृष्ण विखे पाटीलही पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याचे समजते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार, अशी चर्चा सुरू असली तरीही खुद्द विखे पाटलांचा तसा कोणताही विचार नसल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. मुलगा जरी भाजपमध्ये गेला असला तरीही आपण काँग्रेसमध्येच राहणार असून पक्षनेतृत्वाचा निर्णय आपल्यासाठी शिरसावंद्य असेल, अशी भावना विखे यांनी पक्षनेतृत्वासमोरही मांडल्याचे समजते. मात्र, तरीही आतापर्यंतची विखे पाटील घराण्याची राजकीय वाटचाल पाहता त्यांचा सत्तेशिवाय जीव रमत नाही हा इतिहास आहे. त्यामुळे आगामी काळात विखे पाटील यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे.  


मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी असलेल्या सलगीमुळे विखे पाटील यांच्याबद्दल संशयाचे वातावरण होते. यापूर्वीही अनेकदा त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये दाखल होणार, अशा वावड्या उठल्या आहेत. पुत्र सुजय यांच्या भाजप प्रवेशामुळे विखे पाटलांसमोर पक्षनेतृत्वाच्या नजरेत आपली विश्वासार्हता टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. सध्या तरी विखे पाटील यांनी पक्षनेतृत्व सांगेल ती जबाबदारी पार पाडू, अशी भावना व्यक्त केल्याचे समजते. तर काँग्रेस नेतृत्वानेही विखे पाटील यांच्याबाबत वेट अँड वॉचचे धोरण स्वीकारले आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या तरी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वासमोर जागावाटप हा मुद्दा असून जागावाटप मार्गी लागल्यानंतर विखे पाटील यांच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबतच्या निर्णयावर विचार केला जाऊ शकतो, असे या नेत्याने सांगितले.   


पक्षनेतृत्वाशी मतभेद हा मुद्दा विखेंसाठी नवा नाही  
पक्षनेतृत्वाशी मतभेद हा मुद्दा विखे पाटील घराण्यासाठी नवा नाही. यापूर्वीही राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांची अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर १९९१ मध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत थेट शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत शिवसेनेत गेलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी १९९५ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवत विधानसभेत प्रवेश केला होता. या काळात त्यांनी कृषिमंत्रिपदही भूषवले होते. हा इतिहास पाहता बदलत्या राजकीय परिस्थितीत राधाकृष्ण विखे पाटीलही काँग्रेसला पुन्हा रामराम करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...