Home | Maharashtra | Mumbai | Radhakrishna Vikhe-Patil Says Sujay did not consult me before joining BJP

सुजय यांनी मला विचारून भाजपमध्ये गेले नाही, शरद पवारांच्या 'त्या' विधानाने दु:खी झालो- राधाकृष्ण विखे पाटील

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 14, 2019, 04:36 PM IST

शरद पवार यांनी माझे वडील बाळाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे प्रचंड दु:ख झाले

 • Radhakrishna Vikhe-Patil Says Sujay did not consult me before joining BJP

  मुंबई- मुलगा सुजय विखे पाटील यांनी मला विचारुन भाजपमध्ये प्रवेश केला नाही. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. त्यामुळे मुलासाठी संघर्ष उभा राहील, असे म्हणणे चुकीचे आहे. विरोधी पक्षनेता म्हणून माझी जबाबदारी होती, गालबोट लागेल असे विधान माझ्याकडून होणार नाही, याची मी काळजी घेतली. आघाडी धर्म पाळला. परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर मतदारसंघात प्रचाराला जाणार नाही अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे.

  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केलेल्या त्या विधानामुळे दु:खी झाल्याचे राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. विखे पाटील म्हणाले, माझे वडील हयात नाहीत. परंतु शरद पवार यांनी माझे वडील बाळाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे प्रचंड दु:ख झाले. ज्येष्ठ नेत्याने अशी टिप्पणी करावी, हे दुर्दैवी आहे. पवारांच्या वक्तव्याने वेदना झाल्या. पवारांना आमच्याविषयी शंका आहे, मग त्यांचा प्रचार कशाला करायचा? त्यामुळे नगरमध्ये कोणाचाही प्रचार करणार नाही, असे विखे पाटील यांनी जाहीर केले.

  अहमदनगरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत निर्माण झालेला तिढा सुटत नसल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर विखे पाटील यांच्यावर राष्ट्रवादीसह स्वपक्षीयांकडूनच टीका करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. त्यात राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

  बाळासाहेब थोरात हायकमांडपेक्षा मोठे आहेत का?
  बाळासाहेब थोरात यांच्याकडे कपबशी, नारळ, रोलर कुठून आले, हे मला चांगले माहीत आहे. त्यांनी मला पक्ष निष्ठा सांगू नये, अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील थोराताना प्रत्युत्तर दिले आहे.बाळासाहेब थोरात हायकमांडपेक्षा मोठे आहेत का? मला जे सांगायचे आहे ते हायकमांडला सांगेन. बाळासाहेब थोरात हायकमांडपेक्षा मोठे आहेत का? मी त्यांना सांगण्यास बांधील नाही.

  काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात?

  काँग्रेसने विखे कुटुंबाला खूप काही दिलं आहे. त्यांच्या सगळ्या अपेक्षा पक्षाने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे विखेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली होती. त्यावर विखे पाटील म्हणाले, मी अद्यापही काँग्रेसमध्येच आहे. काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाशी माझी बांधिलकी आहे. त्यामुळे माझ्याबाबत पक्ष आणि पक्षनेतृत्त्व जो काही निर्णय घेईल, तो मला मान्य असेल.

Trending