आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंढे पॅटर्नला बाजूला सारीत गमे यांची पालिकेत एण्ट्री; महापाैरांसह लाेकप्रतिनिधींची घेतली भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गेल्या नऊ महिन्यांपासून वर्तणूक, सुसंवाद, समन्वय या मुद्यावरून वादात असलेल्या अायुक्तपदाच्या खुर्चीत बसल्यानंतर नवनियुक्त अायुक्त राधाकृष्ण गमे यांनी मुंढे पॅटर्नला बाजूला सारीत महापाैर रंजना भानसी यांच्यासह प्रमुख लाेकप्रतिनिधींची स्वत: जाऊन भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर हसु फुलले. पदभार स्वीकारल्यानंतर गमे यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेत त्यांच्याकडील प्रमुख प्रश्न वा प्रस्ताव काेणते याची माहिती घेतली. याव्यतिरिक्त शुक्रवारी प्रत्येक अधिकाऱ्याशी ते वैयक्तिकरित्या अर्थातच 'वन टू वन' संवाद साधून अाढावा घेणार अाहेत. त्यामुळे कथित मुंढे समर्थक अधिकाऱ्यांची धांदल उडाल्याचे चित्र अाहे.

 

'नाशिकचे जावई' अशी अाेळख असलेले गमे यांनी गुरुवारी साधारण पावणे ११ वाजता महापालिकेत एण्ट्री केली. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने खातेप्रमुखांची बैठक घेत महत्त्वाचे प्रश्न जाणून घेतले. या बैठकीत अधिकाऱ्यांना तणावमुक्त मात्र शिस्तबद्ध काम करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. पहिलीच भेट असल्यामुळे त्यांचा समजून घेण्यावर अधिक भर हाेता. त्यामुळे त्यांनी कमीतकमी बाेलून अधिकाऱ्यांकडूनच महत्त्वाचे प्रश्न काेणते याची माहिती घेतली.

 

पालिकाही फुलली 

गत नऊ महिन्यांत पालिकेत नगरसेवक वा त्यांचे कार्यकर्ते फिरकेनासे झाले हाेते. सायंकाळी मुंढेंच्या भेटीसाठी येणाऱ्या अभ्यांगताव्यतिरिक्त अन्य नाशिककरांचाही वावर नव्हता. सत्ताधारी भाजपचेही माेजकेच पदाधिकारी येत हाेते. दरम्यान, गमे यांच्या नियुक्तीनंतर गुरुवारी चित्र पालटले. बहुतांश नगरसेवकांनी महापालिकेत हजेरी लावून नवीन अायुक्तांची भेट घेतली.

 

स्वत: घेत भेटली; महापाैरांनीही केले स्वागत 

सर्वसाधारण संकेताप्रमाणे शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापाैरांची येणारा नवीन अायुक्त वा अधिकारी स्वत: जाऊन भेट घेत असताे, मात्र मुंढे यांनी हा शिरस्ता माेडीत काढला हाेता. ते महापाैरांकडील बैठकांनाही जात नव्हते. त्यामुळे लाेकप्रतिनिधीही संतप्त हाेते. दरम्यान, गमे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर साधेपणाने महापौर रंजना भानसी,उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, सभागृहनेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यामुळे पदाधिकारही सुखावले. महापाैरांनीही त्यांचे स्वागत करीत नगरसेवकांची कामे मार्गी लावा, असे सुचवले.

 

अधिकारीही खुलले 
मुंढे यांच्या उपस्थितीतील बैठकीत अधिकाऱ्यांवरील तणाव दिसून येत हाेता. चुकून माेबाइल वाजला तर जप्ती, ग्लासभर पाणी, लघुशंकेलाही उठण्याची बंदी अशा कडक निर्बंधामुळे अधिकारी नाराज हाेते.

 

विकास कामे मार्गी लावू 

लाेकप्रतिनिधींशी सुसंवाद साधूनच कामे मार्गी लावू. अाधीच्या अायुक्तांनी घेतलेल्या चांगल्या निर्णयांची अंमलबजावणी हाेईल. ज्या निर्णयांमध्ये त्रुटी असेल त्या दूर करण्यात येतील. -राधाकृष्ण गमे, अायुक्त, महापालिका 

बातम्या आणखी आहेत...