आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅगिंगची दहशत : भीतीमुळे ८४ टक्के प्रकरणांत तक्रारही नाही, तरी ७ वर्षांत रॅगिंग तिप्पट वाढली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कठोर कायदे आणि कडक निगराणी ठेवूनही शैक्षणिक संस्थांमध्ये होणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांच्या रॅगिंगच्या प्रकरणांत गेल्या ७ वर्षांत ३ पटींनी वाढ झाली अाहे. असे  असले तरी ८४ टक्के प्रकरणांत विद्यार्थी तक्रारच दाखल करत नसल्याचे समाेर आले आहे. २०१२ पासून देशात रॅगिंगच्या ४६९४ तक्रारींची नोंद झाली असून २५८ तक्रारींसह महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावर आहे. 


मुंबईतल्या नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शिकणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या डॉ.पायल तडवी या विद्यार्थिनीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. यी चिंग लिंग, वरिष्ठ निवासी डॉक्टर हेमा आहुजा, डॉ. भक्ती महिरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे रॅगिंगचा मुद्दा परत एकदा ऐरणीवर आला आहे.

 

रॅगिंगच्या तक्रारी
देशभरात २०१२ पासून ४६९४ रॅगिंगविषयक तक्रारींची नोंद झाली. यापैकी ४६१९ तक्रारींची सुनावणी पूर्ण झाली आहे, तर  ७५ तक्रारींची  सुनावणी सुरू आहे. २०१६ मध्ये ५१५ प्रकरणांची नोंद झाली होती. वर्षभरात त्यात ८० टक्क्यांहून  अधिक वाढ झाली. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशानंतर सर्वाधिक तक्रारी दाखल होणाऱ्या महाराष्ट्रात ७ वर्षंत तक्रारींची संख्या २४ वरून ५३ वर पोहोचली. २०१९ मध्ये पहिल्या ५ महिन्यांतच देशात ३५० तर राज्यात २१ प्रकरणांची नोंद झाली आहे.

 

घाबरू नका, तक्रार करा, helpline@antiragging.in, १८०० १८०५ ५२२
 

रॅगिंगच्या वाढत्या प्रकरणांनंतर सर्वाेच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार यूजीसीने २०१८ मध्ये देशभरातील ३७ शैक्षणिक संस्थांतील १० हजार विद्यार्थ्यांचे एक सर्वेक्षण केले. यातील निष्कर्ष धक्कादायक आहेत-

 

> ८४% विद्यार्थी रॅगिंगची तक्रारच करत नाहीत. त्यांना व्यवस्थेवर विश्वास नाही किंवा परत त्रास होण्याची भीती वाटते. सीनियर्सचे अत्याचार ते मुकाटपणे सहन करतात.

> ६२% सीनियर्सना वाटते की ही मुले वर्षभर आपली कामे करतील 
> ५१% प्रकार होस्टेल, २१% कॅम्पस, १४% कॅम्पसबाहेर तर १४% अन्य ठिकाणी होतात.   
> ३३% विद्यार्थी रॅगिंगच्या माध्यमातून मजा घेतल्याचे सांगतात.
> ४०% विद्यार्थ्यांना मात्र रॅगिंगच्या प्रकारामुळे जुन्या व नव्यात मैत्री घट्ट झाल्याचे वाटते. 

 

महाराष्ट्रात प्रांतवादातून रॅगिंग : प्रत्येक राज्यात रॅगिंगचे प्रकारही वेगवेगळे आहेत. महाराष्ट्रात रॅगिंगसाठी परप्रांतीय हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. उत्तर प्रदेश, बिहार आणि ईशान्येकडील राज्यांतल्या मुला-मुलींना मोठ्या प्रमाणात टार्गेट केले जाते.

 

देशभरात जीवघेण्या रॅगिंगच्या ५ भयंकर घटना... 
> २०१६ मध्ये केरळ वैद्यकीय महाविद्यालयात २१ विद्यार्थ्यांनी फ्रेशर्सना स्वच्छतागृह साफ करायला लावले. नंतर घाण पाणी पाजले.

> गुलबर्गा नर्सिंग कॉलेजमध्ये १९ वर्षीय विद्यार्थिनीला टॉयलेट क्लीनर पिण्यास सांगितले. तिची अन्ननलिका जळाली. 
> २०१७ मध्ये भोपाळच्या नॅशनल लॉ स्कूलमधील मुुलींना रात्रभर अश्लील चित्रपट पाहण्यास सांगत व सकाळी शोषण करत. 

> जोधपूरमध्ये ५ सीनियर्सनी मुलीस वॉशरूममध्ये कोंडले.

> बंगळुरूत विद्यार्थ्याने १० व्या मजल्यावरून उडी घेऊन जीव दिला.

 

बातम्या आणखी आहेत...