आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुरंधरांचा चित्रखजिना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावबहादूर महादेव विश्वनाथ धुरंधर ऊर्फ  चित्रकार धुरंधर यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त मुंबईतील राष्ट्रीय आधुनिक कलादालनात एक सर्वव्यापी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन ११ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर  या कालावधीत सोमवार आणि सुट्यं व्यतिरिक्त रोज ११ ते ६ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले असणार आहे. त्यानिमित्त...

 

रावबहादूर महादेव विश्वनाथ धुरंधर, यांच्या रावबहादूर या पदवीपेक्षा चित्रकार धुरंधर ही पदवी वा ओळख, एकूणच चित्रकारांना समाजात मानाचे स्थान देणारी आहे. ब्रिटिश सरकारने दिलेली रावबहादूर पदवी त्या सरकारच्या अस्ताबरोबरच विस्मृतीच्या वाटेवर गेली, पण त्यांना चित्रकार म्हणून मिळालेला मान, लौकिक आजही जिवंत आहे.

 

१८ मार्च १८६७ रोजी कोल्हापुरात जन्मलेल्या धुरंधरांची १५०ची जयंती साजरी करण्यासाठी मुंबईतील राष्ट्रीय आधुनिक कलादालनात (सर कावसजी जहांगीर पब्लिक हॉल, महात्मा गांधी रोड मुंबई-३२) एक सर्वव्यापी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. इतिहासाच्या पाऊलवाटा शोधत दिल्ली, कोल्हापूर, मुंबई, औंध, सातारा, सांगली, हैदराबाद, नागपूरसह देश-विदेशातील त्यांची चित्रे जमवणे, त्या सर्वांचा आलेख मांडणारे उत्तम प्रतीचे पुस्तक छापणे (३१४ पाने) हे साधेसुधे काम  नव्हते. पण धुरंधरांच्या परंपरेतील आजचा (युवा?) कलावंत आणि राष्ट्रीय कलादालनाचा प्रमुख सुहास बहुलकरांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे, धुरंधर जे. जे. कला महाविद्यालयाचे पहिले भारतीय डीन  (अधिष्ठाता) होते. पूर्वसुरींच्या, राजा रवी वर्मांच्या शैलीमध्ये त्यांनीही मानवाकृती चितारल्या. ऑइल, जलरंग, चारकोल, पेन्सिल अशा त्या काळी प्रचलित असणाऱ्या सर्व माध्यमातून त्यांनी रेखाटन केले. नेहमी त्यांच्या कोटाच्या खिश्यामध्ये वेगवेगळ्या आकाराची स्केच बुकं असत आणि त्यामध्ये सतत स्केचेस ते करत असत. आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या  पत्नीची रेषाचित्रे त्यांनी त्या घरकामात असताना केली. शेकड्यामध्ये! आणि त्याचा अल्बमही केला. अशा प्रकारचा हा जगातील एकमेव अल्बम असावा.
मानवाकृतीची कम्पोझिशन  (रचना कृती) करताना त्याच्यावर भारतीय शिल्पकला, अजिंठा, वेरूळ, मंदिरातील उठावशिल्पे यांचा प्रभाव होता. अर्थात समकालीन एम. एफ. पीठावाला आणि ए.एक्स.त्रिन्दादही  याच प्रकारे व्यक्तिचित्रण करत होते.


औंधच्या महाराजांची चित्रे इतिहासातील घटना, सामाजिक रूढी, परंपरा, लग्न सोहळे हे अत्यंत वास्तववादी शैलीमध्ये त्यांनी चित्रित केले. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील रोमहर्षक प्रसंगांची कल्पनाचित्रे त्यांनी रेखाटली. शाहिस्तेखानाची चार बोटे कापून काढण्याच्या प्रसंगाचे मी लहानपणी पाहिलेले चित्र आजही डोळ्यासमोर आहे. संस्कारक्षम वयामध्ये अशी अभिजात चित्रे पाहिली की ती मनावर कोरली जातात आणि याचसाठी शाळांमधील मुला-मुलींना प्रत्येक शिक्षकाने या प्रदर्शनाची सफर करून आणली पाहिजे. एका महान चित्रकाराची कला आजच्या पिढीसमोर मांडण्याचे आणि तेही अत्यंत देखणेपणाने मांडण्याचे काम सुहास बहुलकरांनी आपुलकीने केले आहे. नुसती चित्रेच नव्हे, तर धुरंधरांना मिळालेली सुवर्णपदके, जी हिरे-माणकांनी मढवलेली आहेत, प्रशस्तिपत्रे असा खजिना आपल्या समोर ठेवला आहे. नव्या चित्रकारांनी (हुसेन आदी) रवी वर्मा, धुरंधर यांच्याविरुद्ध हे चित्रकारच नव्हेत, अशी बोंबही मारली होती. पण आपण कोणाच्या खांद्यावर उभे आहोत,  हे माणसाने विसरू नये. शेवटी, भारतीय स्तरावर महाराष्ट्रीय  थोर चित्रकाराची थोरवी आपण नाही सांगायची तर कुणी? अनुल्लेखाने मारणारे बरेच असतात. पण प्रेमाने, तळमळीने आणि कष्टाने असे प्रदर्शन उभे करणाऱ्यांच्या प्रयत्नांना आपणच सार्थकी लावले पाहिजे.

 

लेखकाचा संपर्क : ९९३००२३२९९

raghuvirkul@gmail.com


पुढील स्‍लाइडवर पाहा, रावबहादूर महादेव विश्वनाथ धुरंधर यांचे चित्रं...

बातम्या आणखी आहेत...