आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद वाचवण्यासाठी रहाटकर यांची धावाधाव, सर्वोच्च न्यायालयात केली याचिका दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : राज्य सरकार बदलल्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नवी नियुक्ती करावी, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध महिला आयोगाच्या विद्यमान अध्यक्षा व भाजप नेत्या विजया रहाटकर यांनी आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

उच्च न्यायालयाचा हा आदेश अनावश्यक व राजकीय स्वरूपाचा असून आयोगाच्या संवैधानिक अध्यक्षपदाला राज्य सरकारचा विशेषाधिकार लागू होत नाही, असे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत रहाटकर यांनी नमूद केले आहे. २०१३मधील एक जनहितार्थ याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने मागच्या आठवड्यात सरकार बदलल्याने रहाटकर यांनी राजीनामा दिला पाहिजे. ५ फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने नव्या अध्यक्षांची नियुक्ती करावी, असा आदेश दिला होता. हा आदेश आयोगाच्या कायद्यातील स्पष्ट तरतूदींविरुद्ध असल्याने रहाटकर यांनी त्यास सर्वोच्च न्यायालयात अॅड निशांत कातनेश्वरकर यांच्यामार्फत आव्हान दिले आहे. सत्ताबदल होताच मागील सरकारने महामंडळे व इतर संस्थावर केलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात येत असतात. नवे सरकार आपल्या मर्जीतील लोकांची महामंडळे व सरकारी संस्था यावर नियुक्त्या करते. महिला आयोगाची अध्यक्ष यांची नियुक्ती सुद्धा लवकरच रद्द केली जाईल असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विजया रहाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आपल्याला पदच्युत करता येणार नाही असा याचिकेत दावा केला आहे. आता याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे भाजपसह राजकीय पक्षाचे लक्ष लागले आहे.

पदाच्या प्रतिष्ठेसाठी सुप्रीम कोर्टात : रहाटकर

महिला आयोग हे विशेष कायद्याने निर्माण केलेले संविधानिक पद असून त्याला अर्धन्यायिक स्वरूपाचे अधिकार आहेत. आयोगाचे कामकाज पूर्णतः अराजकीय, निष्पक्ष स्वरूपाचे राहिले आहे. अशा स्थितीत उच्च न्यायालयाने कायदा बाजूला सारून या पदाला राजकीय तराजूत तोलणे, अनावश्यक राजकीय शेरेबाजी करणे हे समजण्यापलीकडे आहे. म्हणून पदाची अराजकीय प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे भाग पडले, असे मत रहाटकर यांनी व्यक्त केले.
 

बातम्या आणखी आहेत...