Home | Magazine | Rasik | rahee rasik article in marathi

मृगजळातले बुडबुडे!

राही श्रु. ग. | Update - Mar 17, 2019, 12:02 AM IST

जितकी माणसं सोशल मीडियावर तितके त्यांचे अगणित बुडबुडे. या आंतरजालीय मायाजालात जागतिक माणसाचं एक वेगळं चरित्र घडतं आहे.

 • rahee rasik article in marathi

  जितकी माणसं सोशल मीडियावर तितके त्यांचे अगणित बुडबुडे. या आंतरजालीय मायाजालात जागतिक माणसाचं एक वेगळं चरित्र घडतं आहे. त्यातही वेगवेगळी विश्वं आहेत. विषमतेची चित्रं अदृश्य ठेवूनच हा खेळ चालला आहे. अर्ध जग काळोखातच आहे. प्रत्यक्ष अनुभवांना टाळत केवळ माहितीच्या आभासी चित्रांवर विसंबलेला समाज उभा राहतो आहे...


  सहाशे वर्षांपूर्वी जर्मनीमधल्या माईन्ज गावातल्या गुटनबर्ग नावाच्या एका हुशार कारागिराने एक दिवस लाकडाच्या फळ्या आणि लोखंडाच्या कड्या जोडून एक जरा अवजड यंत्र उभं केलं. त्या यंत्रातून कागदाचे ताव सरकवल्यावर त्यांच्यावर जादुई वेगाने अक्षरं उमटायची. लोकांनी त्याला वेड्यात काढलं, तेव्हा लोकांनाच काय स्वतः गुटनबर्गलाही माहीत नव्हतं की आपण इतिहासातला एक क्रांतिकारक शोध लावला आहे. गुटनबर्गचं यंत्र म्हणजे, युरोपातलं पहिलं छपाई यंत्र होतं. या यंत्रामुळे युरोपात पहिल्यांदा छापखाने उभे राहिले. लोक लिहू वाचू लागले. वर्तमानपत्रं सुरू झाली. त्यापूर्वीच्या युरोपातलं बहुतेक लिखाण चर्चमधल्या लॅटिन भाषेत झालं होतं. ते धर्मगुरूंच्या हातून लोकांच्या हाती आल्यावर लोकांच्या भाषांमध्ये, लोकांच्या जगण्याविषयी लोक लिहू लागले. चर्चच्या सत्तेला आव्हान देऊ लागले. नव्या कल्पना वेगात पसरू लागल्या. युरोपच्या समाज- राजकारण आणि अर्थकारणाचा चेहरामोहराच बदलला. ही माहिती तंत्रज्ञानाची पहिली क्रांती होती. गुटनबर्गने उघडलेल्या दरवाजातून वाऱ्याच्या वेगाने युरोपात नवं युग आलं होतं. सहाशे वर्षं उलटली आणि जगभरात माहितीची देवाणघेवाण वेगाने होऊ लागली. आपण विसावं शतक ओलांडलं तोवर काळ किती वेगाने पुढे सरकू लागला होता!


  अशाच एके दिवशी कॉम्प्युटर बाजारात आले. पाठोपाठ इंटरनेट आलं आणि "गुगल'मुळे क्रांतीच झाली. ज्याच्यासाठी जुन्या वाचनालयांच्या कपाटांमधली धूळ झटकत फिरावं लागत होतं आणि थोडक्या ‘ज्ञानी’ माणसांवर अवलंबून राहावं लागत होतं ते माहितीचं घबाड आता सामान्य माणसाच्या हातात येऊ लागलं. पाहता पाहता प्रत्येकाकडे मोबाइल आले आणि लवकरच ते ‘स्मार्ट’ झाले. फोनवर फेसबुक आणि व्हॉट्सॲप आलं आणि पाठोपाठ यूट्यूब आणि बाकी ॲप्सची न संपणारी यादी!


  तुफान वेगात इंटरनेट आणि स्मार्टफोनने आपल्याला आपलंसं करून घेतलं. कळायच्या आत आपण व्हर्चुअल जगाचे नागरिक झालेलो होतो. स्मार्टफोनवाले लोक जगातल्या प्रत्येक गोष्टीची माहिती गुगलवरून मिळवू लागले. जे जे ऑनलाईन फुकट आणि सहज मिळतं त्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू लागलो. शाळा-कॉलेजचा अभ्यास, आरोग्याचे सल्ले आणि वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपीपर्यंत सगळं काही ‘शोधायचं’ हक्काचं ठिकाण गुगल झालं. गेल्या वर्षी ‘डिजिटल इंडिया’ योजनेअंतर्गत गुगलने "एनसीईआरटी'सोबत करार केला आणि सरकारी शाळांमध्ये डिजिटल नागरिकत्वाचे वर्ग सुरू करणार असल्याची घोषणा केली. गावागावात अजून वीज पोचलेली नसली तरी देशाच्या धोरणांमध्ये गुगलबद्दल विचार सुरू आहे. स्मार्टफोन परवडणाऱ्या लोकांचं प्रमाण आपल्याकडे खूप कमी असलं तरी आता शाळेशाळेतून मुलांना डिजिटल नागरिकत्व मिळणार आहे. गुगलचा हात धरून मुलं आता शिकणार आहेत. गुगल हा ज्ञानाचा अंतिम साठा होण्याच्या मार्गावर असताना व्हर्चुअल जगातल्या सोशल मीडियाच्या आपल्या भिंती तिथे आपली अदृश्य घरं बांधताहेत. आपल्या इतिहासातला हा आणखी एक ‘गुटनबर्ग क्षण’ आहे.


  आपण जितक्या वेळा गुगल उघडतो आणि काहीतरी माहिती शोधतो, तितकं गुगल आपल्याला नीट ओळखू लागतं. कधी कधी तर गुगल जणू आपलं मनच ओळखून आहे,असं वाटतं. फेसबुकसुद्धा फक्त आपला फोटो पाहून ‘आपण कोणत्या हिरो-हिरॉइनसारखे दिसतो’ हे सांगतं. २००४ मध्ये गुगलने प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून त्याप्रमाणे सगळ्यांना ‘हवं ते’ दाखवायला सुरूवात केली. याला गुगल कंपनीनं ‘पर्सनलाईज्ड सर्च सिस्टिम’ असं नाव दिलं. म्हणजे शोधणारी व्यक्ती कुठे राहते आहे, फेसबुक-व्हॉट्सॲपवर काय करते, यूट्यूबवर काय पाहते, ही सगळी माहिती मिळवून आपल्याला हवी तीच माहिती गुगल दाखवतं. जे शोधायचं, ते आता पटकन सापडतंय हे ऐकायला छान वाटत असलं तरी यामध्ये एक फार मोठा धोका आहे.


  २०११ मध्ये अमेरिकेतल्या एलि पॅरिसर या तरूण कार्यकर्त्याने लिहिलं की, हे जे चाललंय ते फार भयंकर आहे. अशा पर्सनलाईज्ड सर्चमुळे आपल्या प्रत्येकाभोवती ‘आपल्याला हव्या त्या’ माहितीचे बुडबुडे तयार होताहेत. आपला बुडबुडा हेच आपल्याला जग वाटतं आणि मग खरं जग आपण कधीच पाहू शकत नाही. फक्त आपल्या जातीच्या, धर्माच्या कल्पना आणि आपले सुरूवातीपासूनचे विश्वास, अंधश्रद्धाच या बुडबुड्यात शिरू शकतात. त्यामुळे एकीकडे आपण जगभर पसरलेल्या एका मोठ्या व्हर्चुअल समाजाचा भाग होतो,पण दुसरीकडे आपला गाव-समाज, आपला धर्म आणि जातीचं, रक्ताच्या भावकीचं जास्त महत्व वाटू लागतं. जी जी नवी, आपल्या मतांपेक्षा वेगळी माहिती आहे, ती कधीच आपल्यापर्यंत पोचत नाही. हे बुडबुडे मोठ्या अंधाऱ्या गुहेसारखे असतात. त्याच्या आत आपण जे काय बोलतो, ते आपल्याला घुमून पुन्हा ऐकू येतं. आपल्याला वाटतं सगळं जग आपल्यासारखं बोलतंय, पण आपण आपलाच आवाज पुन्हा पुन्हा ऐकतोय, हे सांगायला कुणीच नसतं! शिवाय प्रत्येक वेळी गुगल आणि फेसबुक, व्हॉट्सॲप यांना आपण आपली खाजगी माहिती वापरण्याची परवानगी देतो, तेव्हा ती माहिती साठवली जाते. लोकांची खाजगी माहिती ही सध्याच्या अर्थव्यवस्थेतलं सगळ्यात मोठं भांडवल झालं आहे. आपण सोशल मीडियाचे वाचक-लेखक नावालाच आहोत, मुळात आपण तिथले ‘ग्राहक’ झालो आहोत. हीच माहिती गोळा करणाऱ्या "केंब्रीज ॲनालिटिका'सारख्या कंपन्या ती चक्क राजकीय पक्षांना विकतात. अमेरिकन निवडणुकीतल्या ट्रम्पच्या विजयामागे या ‘विकत घेतलेल्या माहितीचा’ मोठा हात आहे,असं म्हटलं गेलं.


  आज स्मार्टफोनवाल्या तरूणांसाठी बातम्यांचं पहिलं साधन म्हणजे, त्यांचा फोनच झाला आहे. फेसबुक आणि व्हॉट्सॲपने प्रत्येकाला लिहायला लावलं आहे, लेखक केलं आहे. सगळ्यांच्या एकमेकातल्या, मित्रामित्रातल्या चावडीवरच्या गप्पा आता चव्हाट्यावर आल्यात. लेखक आणि वाचक, माहिती आणि मतं यांच्यातलं अंतर मिटत चाललंय. याची नेमकी दुसरी बाजू अशी की,आपले बुडबुडे म्हणजे खोट्या माहितीची आणि चुकीच्या बातम्यांची कोठारं बनतात. आपल्या विचारांना पटेल, आवडेल अशीच माहिती आपल्यापर्यंत पोचते आणि आपल्याला कळायच्या आत आपण ती पुढे पसरवतो. कुठला मेसेज कुठून येतो आणि भगतसिंग आणि नेहरूंना बदनाम करून जातो. ज्यांच्या हाती सत्तेची आणि अर्थकारणाची दोरी असते ते या फेक न्यूजच्या कारखान्यावरही राज्य करतात. नुकत्याच झालेल्या "बीबीसी'च्या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक फेक न्यूज या राष्ट्रवादाच्या प्रभावातून तयार झालेल्या होत्या. या बुडबुड्यांच्या खेळाला सरकारी नेतेमंडळीही बळी पडतात. सरकारमधल्याच कितीतरी नेत्यांनी जाहीरपणे खोटी माहिती पसरवली आहे. हे बुडबुडे आपल्याला देशप्रेमाच्या बाबतीत अतिसंवेदनशील करतात, पण अन्नाविना डोळे मिटणाऱ्या झारखंडमधल्या मुलीचं नावही आपल्यापर्यंत पोचू देत नाहीत. कोणती माहिती वाचकापर्यंत/ग्राहकापर्यंत पोहचू द्यायची,हे ठरवणारी मंडळी वेगळेच हितसंबंध असणारी आहेत. माहिती उपलब्ध करून देण्यातही अर्थकारण दडलेलं आहे. यातल्या खोट्या माहितीतून पसरलेल्या अफवांनी गेल्या तीन चार वर्षांत देशात कितीतरी बळी घेतले आहेत. काहीही चूक नसताना कितीतरी दलित आणि मुस्लिमांना या खोट्या माहितीच्या बुडबुड्यात राहणाऱ्या माणसांच्या जमावांनी मारहाण करून मारून टाकलं आहे.


  जितकी माणसं सोशल मीडियावर तितके त्यांचे अगणित बुडबुडे. या आंतरजालीय मायाजालात जागतिक माणसाचं एक वेगळं चरित्र घडतं आहे. त्यातही वेगवेगळी विश्वं आहेत. विषमतेची चित्रं अदृश्य ठेवूनच हा खेळ चालला आहे. अर्ध जग काळोखातच आहे. प्रत्यक्ष अनुभवांना टाळत केवळ माहितीच्या आभासी चित्रांवर विसंबलेला समाज उभा राहतो आहे. जेव्हा फेक न्यूज आणि या बुडबुड्यांविषयी माहिती मिळते, तेव्हा हे सगळं पाहून डोळे दिपून जातात. आपल्या काळाचा आवडता प्रश्न समोर उभा ठाकतो - कशावर विश्वास ठेवायचा? कसा विश्वास ठेवायचा? आपल्याला असं गोंधळून टाकण्यावरच आजची अर्थव्यवस्था आणि राजकारणसुद्धा उभं राहू पाहतंय. प्रतिमा खऱ्या नसतात. हे वास्तवातल्या काही अधांतरी क्षणांचे केवळ अवशेष असतात. खरं काय ते समजून घेण्यासाठी या प्रतिमांच्या पलीकडे जाऊन मोठ्या चित्राचे तुकडे जोडण्यासाठी धडपड करावी लागते. ज्यांनी सोशल मीडियाच्या जगात पाऊल ठेवलेलं नाही, असे आपले आईबाप, शेतकरी, कष्टकरी यांच्याशी बोलूनच या बुडबुड्यांच्या राजकारणाला उत्तर देता येतं. जे आपल्या बुडबुड्यामध्ये कधीच शिरू शकणार नाहीत, अशा वेगळ्या जातीच्या, वेगळ्या धर्माच्या, वेगळ्या विचाराच्या लोकांशी मैत्री करूनच गुहेतून बाहेर पडण्याचा रस्ता सापडतो. बाहेर पडल्यावर उजेडाने दिपून जायला होतं, ठेचकाळायला होतं. पण गुहेतला अंधार सोडल्याशिवाय सूर्य दिसत नाही आणि सूर्य पाहिल्याशिवाय आपलं माणूसपणही पूर्ण होत नाही...


  राही श्रु. ग.
  rahee.ananya@gmail.com
  लेखिकेचा संपर्क : ९०९६५८३८३२

Trending