आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवं तर मला स्वप्नाळू म्हणा, पण इथे मी एकटी नाहीये!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राही श्रु. ग.  

आदर्श जगासाठी झटणारे स्वप्नाळू वेडे लोक झाकलेल्या दुःखाला खेचून बाहेर काढतात आणि थेट भिडायचा प्रयत्न करतात. ते मिळून रस्त्यांवर उतरतात आणि हातात हात घेऊन लांबलांब चालतात. जगण्याच्या शक्यता अजमावण्याची संधी प्रत्येकाच्या वाट्याला येऊ न देणाऱ्यांना प्रश्न विचारतात, जाब विचारतात. मुक्तीची त्यांची आस पाहून, त्यांच्या डोळ्यातली स्वच्छ स्वतंत्र वृत्ती पाहून जागेपणीच झोपलेल्या समाजाला खूप खूप भीती वाटते. आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या, आपल्या उशाखाली दाबलेल्या कत्तलींचा, आपल्या ऐषारामापायी केलेल्या अप्रामाणिक बेछूट उद्योगांचा हिशेब मागितला जाईल, याची ही सुप्त भीती असते. मग हे लोक घाईघाईने भगतसिंगांना श्रद्धांजली वाहतात. सिनेमा हॉलमध्ये रंग दे बसंती पाहून क्रांतीच्या ‘थ्रिल’ने भारावून जातात, पण तरुणांचे जथ्थे पडद्यावरून रस्त्यावर आले, की त्यांचा तळतळाट होतो. ते आपल्या सहजप्रेरणेने या तरुणांना चौकात फटके मारायला तयार होतात.  You may say that I'm a dreamer
But I'm not the only one
I hope someday you'll join us
And the world will be as
one


जॉन लेनन या गीतकार-संगीतकाराच्या या ओळी... ‘इमॅजिन’ नावाचं त्याचं गाणं निखळ जगण्यासाठीच्या वाटांवरून जाण्यासाठी ऐकणाऱ्याला कल्पना करायला सांगतं, एका सुंदर, स्वतंत्र जगाची. तो म्हणतो, कल्पना करा की आपल्या डोक्यावर स्वर्ग नाही, पायाखाली नरक नाही. केवळ खुल्या आकाशाखाली, आताच्या क्षणाला न्याय देत आपण सगळे जगतो आहोत. देश, धर्म आणि एकमेकाचे जीव घ्यायला लावणारी कुठलीच गोष्ट जगात उरलेली नाही. संपत्तीचा तोरा आणि माज शिल्लक नाही. उपाशी पोटाचं दुःख गायब झालं आहे… तुम्ही प्रयत्न केलात तर नक्की दिसेल तुम्हाला हे जग. तुम्ही मला स्वप्नाळू म्हणाल, पण पाहा, मी एकटा नाहीये. मला खात्री आहे की एक दिवस तुम्ही सगळेसुद्धा आमच्यासोबत उभे राहाल आणि आपण हे जग प्रत्यक्षात आणून दाखवू!

जॉन लेननने जागतिक शांततेचं आणि सगळ्या लोकांच्या आनंदाचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांच्या मनालाच या गाण्यात उतरवलं आहे. धर्म आणि देशाच्या विकृत दुराभिमानाला त्याने आयुष्यभर आपल्या कवितांमधून- गाण्यांमधून आरसा दाखवला. मात्र त्याच्या या काव्यात्म आग्रहानेच पश्चिमेतले हिंसक सनातनी चवताळले आणि वयाच्या चाळिसाव्या वर्षीच भररस्त्यात पाठीवर पाच गोळ्या घालून त्याचा निर्घृण खून केला. या जॉन लेननच्या ब्रिटनमधलाच विन्स्टन चर्चिल म्हणतो ‘वयाच्या पंचविशीपर्यंत तुम्ही कम्युनिस्ट नसाल तर तुम्ही वेडे आहात आणि वयाच्या पंशविशीनंतरही तुम्ही कम्युनिस्ट असाल तर तुम्ही निश्चितच वेडे आहात!’ इथे चर्चिलला कम्युनिस्ट म्हणजे ध्येयवादी, आदर्शवादी, स्वप्नाळू माणूस हा अर्थ सांगायचा आहे. ही सगळी ‘वेडेपणा’ची लक्षणं मानली जातात. डाव्या विचारधारेबाबत आपले मतभेद असू शकतात, पण रूढार्थाने कम्युनिस्ट नसलेले लोकही जेव्हा नव्या, भल्या जगाचं स्वप्न पाहतात तेव्हा त्यांना सरसकट वेडं ठरवलं जातं. जॉन लेननचा सूर कान देऊन ऐकल्यावर लक्षात येतं की भलेपणावर विश्वास ठेवणारे, स्वप्न पाहू शकणारे लोक एकत्र आले तर खुल्या आकाशाखाली मोकळा श्वास घेत त्या त्या क्षणाच्या संपूर्ण काव्यमय अनुभवाकडे जाणं नक्कीच शक्य असतं. 

आपण वर्तमानपत्र उघडतो आणि हिंसा, दुरवस्था, भेदभाव आणि उपासमारीच्या बातम्या घाईघाईने मिटून टाकतो. जगात चांगुलपणाची प्रत्येक शक्यता जिवंत असली तरी आपल्या आजूबाजूला दुःख आहे, हे आपल्याला स्वीकारावं लागतं. सगळ्या ऐषारामात जगणाऱ्या सिद्धार्थ राजाला जगातलं दुःख दिसल्यानंतर त्याचा गौतम बुद्ध होण्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे. जगात दुःख आहे, आजार आहेत, मृत्यू आहे याची जाणीव होणंच खूप अवघड आहे. यात आपली काही चूक नाही, कारण घड्याळाबरोबरच्या शर्यतीत आणि संसाराचा गाडा रेटताना आपला वेग टिकवत राहणं यानेच आपण प्रचंड थकून जातो. दिवसाकाठी प्रत्येक नकोशी बातमी, तमाम हताश असहाय नजरांना उशाखाली दाबून टाकून झोपून जातो. आपल्या आतला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या दुःखाचा आवाज ऐकण्यासाठी, त्याचा पोत समजून घेण्यासाठी जास्तीची मेहनत करावी लागते. 

मुळात जगात दुःखं आहेत, हेच काही लोक स्वीकारू शकत नाहीत. आपण जन्माला येतानाच चांगली परिस्थिती घेऊन आलेले असू तर सहजपणे आपण दुःखाकडे पाठ वळवू शकतो. माझ्या बाबतीत जे जे चांगलं झालं आहे, ते माझ्या नशिबामुळे आणि कर्मामुळे असं म्हटलं की विषय संपतो. ज्यांची परिस्थिती चांगली नाही, ते अप्रमाणिक आहेत, आळशी, बिनडोक आहेत असं म्हणून आपल्या मिळणाऱ्या ऐषारामात बिनघोर राहता येतं. शनिवारी रिलीज होणाऱ्या नव्या सिनेमात, मॉलमधल्या रविवारच्या सेलमध्ये, थाटामाटात, पैसा खेळवून साजऱ्या केलेल्या प्रत्येक पूजा, सण-उत्सवामध्ये, अमक्या तमक्या गुरू, बाबा यांच्या तिकीट लावून चाललेल्या सत्संगांमध्ये स्वतःला बुडवून टाकलं की मग दुःखापासून स्वतःला पूर्णपणे झाकल्याचा भास होतो. 

‘प्राइम टाइम’ चर्चांच्या आरडाओरड्यामध्ये आपलं मनोरंजन करून घेताना कुणाकुणाला शिव्या देऊन जीव शांत होतो. मध्ययुगामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी गावातल्या मुख्य चौकात एखाद्या व्यक्तीला चाबकाचे फटके मारले जायचे, त्या व्यक्तीवर निरनिराळ्या प्रकारचे अत्याचार केले जायचे. जणू आपणच त्या व्यक्तीला मारतो आहोत, अशा विकृत आनंदात लोक चेकाळून आरडाओरडा करायचे. मिशेल फुको हा फ्रेंच विचारवंत म्हणतो, की असल्या प्रथा बंद केल्या म्हणून आपण सुधारलो, हा आपला भ्रम आहे. आपण ‘प्रगत समाज’ म्हणून आपल्या डोळ्यांसमोर होणारी ही प्रत्यक्ष अत्याचारांची प्रथा बंद केली असली तरी तिचा आशय आपण मिटवू शकलेलो नाही. अजूनही एखाद्या व्यक्तीला, किंवा काही लोकांना गुन्हेगार, नालायक, शत्रू ठरवून त्यांना शिक्षा व्हावी, त्यांचा जीव घेतला जावा अशी एकत्रितपणे मागणी करण्यातून आपल्याला आजही तोच विकृत आनंद होतो. कुणा ‘साल्यांना जूते मारायचे’ कुणाला भाले तलवारींनी चिरून टाकायचं, कुणाकुणाला गोळ्या घालायच्या हे ठरवून आजही तशा चेकाळून घोषणा दिल्या जातात. व्हॉट्सॲपसारख्या ठिकाणी हे मारण्या-कापण्याचे जाहीरनामे वाचत रोज आपल्या रक्तात ते विष मिसळत जातं आणि आपोआप एक दिवस आपण रस्त्यावर एकट्या निःशस्त्र माणसाला ठेचून मारणाऱ्या जमावाचा हिस्सा होऊन जातो.

आदर्श जगासाठी झटणारे स्वप्नाळू वेडे लोक या खेळाचे बळी ठरतात. ते आपण झाकलेल्या दुःखाला खेचून बाहेर काढतात आणि थेट भिडायचा प्रयत्न करतात. जगात दुःख आहे, तसा दुःखातून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा आहे, या विश्वासाने ते कामाला लागतात. ते मिळून रस्त्यांवर उतरतात आणि हातात हात घेऊन लांबलांब चालतात. जगण्याच्या शक्यता अजमावण्याची संधी प्रत्येकाच्या वाट्याला येऊ न देणाऱ्यांना प्रश्न विचारतात, जाब विचारतात. आनंदावर सर्वांचीच मालकी असावी म्हणून डोक्यावरच्या आकाशाला भेदत मुठी उंचावून घोषणा देतात. मुक्तीची त्यांची आस पाहून, त्यांच्या डोळ्यातली स्वच्छ स्वतंत्र वृत्ती पाहून जागेपणीच झोपलेल्या समाजाला खूप खूप भीती वाटते. आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या, आपल्या उशाखाली दाबलेल्या कत्तलींचा, आपल्या ऐषारामापायी केलेल्या अप्रामाणिक बेछूट उद्योगांचा हिशेब मागितला जाईल, याची ही सुप्त भीती असते. मग हे लोक घाईघाईने भगतसिंगांना श्रद्धांजली वाहतात. सिनेमा हॉलमध्ये रंग दे बसंती पाहून क्रांतीच्या ‘थ्रिल’ने भारावून जातात, पण तरुणांचे जथ्थे पडद्यावरून रस्त्यावर आले, की त्यांचा तळतळाट होतो. ते आपल्या सहजप्रेरणेने या तरुणांना चौकात फटके मारायला तयार होतात.  

प्रसिद्ध पत्रकार पी. साईनाथ एक गोष्ट सांगतात. रोममध्ये निरो नावाचा एक राजा होता. त्याचं राज्य जळत असताना फिडल वाजवणारा हाच तो राजा. रोममध्ये प्रशासनाची वाताहत चालली होती, काही धड चाललं नव्हतं. प्रजा प्रचंड रागात होती. अशा सगळ्या अनागोंदीमध्ये त्याने आपल्या महालात एक भव्य मेजवानी देणार असल्याचं जाहीर केलं. या मेजवानीसाठी त्याने राज्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रण दिलं. व्यापारी, सुलतान, सरदार, कवी आणि कलाकार अशी प्रतिष्ठित मंडळी या मेजवानीसाठी आली, तशी सामान्य माणसंही आली. निरोने जय्यत तयारी केली होती. त्याने अगदी टेबलं भरून वाहतील इतके वेगवेगळे चविष्ट पदार्थ करवून घेतले, सजावट केली, अत्तरं फवारली. मेजवानीचा कार्यक्रम संध्याकाळी होता. अंधार वाढू लागला, तेव्हा याने रोषणाईसाठी खास व्यवस्था केली. त्याच्या राज्यातले जे सर्वात गरीब, दुबळे, असहाय लोक आहेत त्यांना खांबांवर बांधून त्यांना चक्क मधोमध जाळण्यात आलं. या माणसांच्या जळण्याच्या प्रकाशात मेजवानीसाठी आलेले पाहुणे जेवले आणि घरी गेले. जळणारी माणसं बिचारी आहेत, जाळणारा निरो क्रूर आहे, पण या प्रकाशात जेवणाऱ्या माणसांचं काय? असहायतेतून जळेपर्यंत ज्यांच्यावर वेळ आली त्यांच्या जळण्याकडे ते पाहून न पाहिल्यासारखं करतात. आपलं जेवण करत राहतात आणि भरल्या पोटी मेजवानीतून उठतात. यांना जिवंत माणसं तरी कसं म्हणायचं? ही तर चालतीबोलती प्रेतं आहेत!

पाहा, जॉन लेनन म्हणतो पुन्हा जिवंत व्हायची संधी आहे. मला खात्री आहे की तुम्हीसुद्धा स्वप्न पाहायचं धाडस कराल, आमच्यासोबत याल आणि एकमय भलं जग उभं राहील. मला स्वप्नाळू म्हणा, पण इथे मी एकटी नाहीये!

लेखिकेचा संपर्क : ९०९६५८३८३२