आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेला नापास करणारा धडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुळात ब्रिटिश साम्राज्यातली नोकरशाही चांगली चालावी म्हणून मॅकोलेने दिलेली ही आपली आजची शिक्षणव्यवस्था. परीक्षांमधून माणसं निवडणं हा तिचा मूळ उद्देश. ब्रिटिशांपेक्षाही जास्त निष्ठेने आपण शिक्षणव्यवस्थेचा हा आत्मा जपला. इतका, की आज जगात इतर कोणत्याही देशात नाही इतकं भारतात परीक्षांना महत्व दिलं जातं.


सकाळच्या पेपरसाठी धावतपळत वर्गात पोचले. 
माझ्यासारखेच सगळे जण धापा टाकत वर्गात शिरत होते. कुणी ‘नाईट’ मारून, रात्रभर अभ्यास करून तारवटलेल्या डोळ्यांनी थेट पेपरला आले होते तर कुणी शेवटच्या क्षणी नोट्स घोकत वर्गाबाहेर उभे होते. सेमेस्टरचा शेवटचा पेपर असल्यामुळे बहुतेक मुलं अवकाशात दूर कुठेतरी नजर लावून हरवली होती. पेपरचा गठ्ठा घेऊन प्राध्यापक वर्गात आले आणि एकदम शांतता पसरली. या वर्गात वर्षभर हसतखेळत आम्ही समाजशास्त्रातले मूलभूत सिद्धांत शिकलो होतो पण परीक्षा द्यायची वेळ आली आणि वर्गाची रयाच गेली. 


वर्गाकडे शांतपणे मिनीटभर पाहून प्राध्यापक म्हणाले, “मग, काय म्हणताय? कसे आहात?” काही क्षण वर्गात शांतता पसरली आणि  मग सगळा वर्ग हसायलाच लागला. वर्षातल्या सगळ्यात महत्वाच्या शेवटच्या परीक्षेआधी विचारायचा हा प्रश्न आहे का! कसे आहात म्हणे! “अरे मी खरंच विचारतोय. इतना टेन्शन क्या लेना!” प्राध्यापक म्हणाले. मग ते खुर्चीवर जाऊन बसले आणि त्यांच्या सहाय्यक विद्यार्थिनीने मोबाईलवर एका आसामी लोकगीताची बासरीवरची धुन वाजवायला घेतली. सर डोळे मिटून गाणं ऐकू लागले. आधी गोंधळून गेलेले आम्ही सगळे मग हळूहळू गाण्यात बुडून गेलो. आसामी गाणं संपल्यावर जॉन लेननचं ‘इमॅजिन’ गाणं सुरू झालं आणि त्यापाठोपाठ राज कपूरचं ‘जीना इसीका नाम है’. गाणी ऐकल्यावर सरांनी पेपर वाटले. 


वर्षभर शिकलेल्या सिद्धांतांना आणि विचारवंतांना आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडणारे, त्या सिद्धांतांसोबत पेपर लिहिणाऱ्याला जोडून देणारे सगळे प्रश्न होते. कुठल्याच प्रश्नात कसली ‘माहिती’ विचारली नव्हती, उलट त्या ‘माहिती’ पलिकडे स्वतः विचार करून लिहिण्यासाठी सगळे प्रश्न होते. पेपर वाटून मग सरांनी सगळ्यांसाठी चहा मागवला. आम्ही वेडेच व्हायचे बाकी राहिलो होतो. “तीन तास वेळ आहे तुमच्याकडे. तुम्हाला हवं तिथे बसा. हवं तर पुस्तकातून माहिती पाहा, एकमेकांशी बोला आणि मजा घेत लिहा! वेळ संपल्यावर माझ्याकडे पेपर आणून द्या” असं म्हणून सर वर्गातून निघूनही गेले. हा अविजित पाठकांचा वर्ग होता आणि समाजशास्त्रीय सिद्धांतांसोबत घालवलेले हे आमचे सर्वात सुंदर तीन तास होते. एकमेकांशी भरपूर चर्चा करूनही प्रत्येकाने आपापल्या प्रकारे सगळ्या प्रश्नांची स्वतंत्र उत्तरं लिहिली आणि समाधानाने पेपर जमा केले. 


जेएनयूने मला जे अनेक धक्के दिले त्यातला हा ‘परीक्षे’लाच नापास करणारा धडा मला फारच आवडला. पुढे अविजित पाठकांकडूनच शिक्षणाचं समाजशास्त्र शिकताना एकदा परीक्षा कशी असावी हे प्रत्येकाने आपापलं ठरवून स्वतःची परीक्षा घ्यायची असा एक प्रयोग झाला. नंतर एकदा सरांचं शिकवणं कसं आहे, याला आम्ही मार्क द्यायचे, अशीच एक ‘परीक्षा’ झाली. एकदा परीक्षा आपली गुणवत्ता ठरवत नाही, हे मान्य केल्यावर मग इथलं वातावरण समजून घेणं एकदम सोपं झालं. कुणी ‘हुशार’ आणि कुणी ‘ढ’ नसल्यामुळे इथे सगळे एकमेकांकडून शिकायला कायम तयार असतात, हे लक्षात आलं. कुणी दुसऱ्यापेक्षा चार पुस्तकं जास्त वाचली असतील, तर वाचणारा समोरच्याला आपल्याकडची सगळी माहिती मोकळेपणाने देऊन ‘चल, आता बोलू’ असं सहजपणे म्हणू शकतो, ज्युुनियर-सिनियरमधल्या सगळ्या भिंतीच कोसळून जातात. जिथे ‘परीक्षा’ संपते तिथे भीती संपते आणि भीती संपते तिथे शिकणं खऱ्या अर्थाने सुरू होतं.


पास-नापास, पहिला-दुसरा, हुशार-ढ अशा माणसांना मोजण्याच्या फुटपट्ट्या आपण नको तितक्या महत्वाच्या मानतो. मुळात ब्रिटिश साम्राज्यातली नोकरशाही चांगली चालावी म्हणून मॅकोलेने दिलेली ही आपली आजची शिक्षणव्यवस्था. परीक्षांमधून माणसं निवडणं हा तिचा मूळ उद्देश. ब्रिटिशांपेक्षाही जास्त निष्ठेने आपण शिक्षणव्यवस्थेचा हा आत्मा जपला. इतका, की आज जगात इतर कोणत्याही देशात नाही इतकं भारतात परीक्षांना महत्व दिलं जातं. दहावी-बारावीसारख्या परीक्षांचं तर आपल्याकडे नको तेवढं अवडंबर आहे. ‘यश’ नावाची काहीतरी पोकळ गोष्ट आपण सतत साजरी करत राहतो, पण हे यश आहे काय, याचा कधी विचार करत नाही. परीक्षा आपलं ज्ञान मोजण्यासाठी, आपण शिकतो ते मोजण्यासाठी असते असं म्हटलं जातं, पण आपण शिकतो, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खरोखर मोजता येतात का? रुढार्थाने ‘निरक्षर’ असणाऱ्या, गवंडीकाम करणाऱ्या कारागीरांना कोणत्याही फुटपट्टीशिवाय जमीन व्यवस्थित मोजता येते, कोनमापकाशिवाय काटकोन मोजता येतात, किचकट आकडेमोडी करून हे कारागीर मोठी मोठी घरं बांधतात आणि फिजिक्सचे नियम घोकणाऱ्या विद्यार्थ्याचं विज्ञान त्याच्या वह्यापुस्तकांमध्येच अडकून राहतं. प्रेमचंदांच्या कथा आणि कबीराच्या दोह्यांचा अर्थ न समजताच एखादी मुलगी हिंदीची ‘टॉपर’ होते आणि तिला बिचारीला बसमध्ये भेटलेल्या हिंदी भाषक बाईशी चार वाक्य बोलतानाही नाकी नऊ येतात. आपली सर्जकता आणि भाषेचं कौशल्यही आपण आकड्यांमध्ये मोजतो. ‘मला कवितेत इतके इतके मार्क पडले’ हे किती विनोदी वाक्य आहे! एखाद्या दिवशी दुकानात जमलेला उत्तम हिशेब, कुणी आजारी असताना आठवलेला प्रथमोपचाराचा धडा आणि वाचल्यानंतर झोप उडवून टाकणारी एखादी कविता हे सगळं मार्कांत कसं मोजणार?


येत्या महिन्याभरात दहावी आणि बारावीचे निकाल लागतील. कुणी ‘यशस्वी’ म्हणून त्यांचं कोडकौतुक होईल आणि बाकीचे सगळे ‘नालायक’ म्हणून सहज निकालात निघतील. आपल्या आयुष्याला आता चांगली किंवा वाईट दिशा मिळणार म्हणून सगळी मुलंमुली अकारण श्वास रोखून बसतील. ‘जे सक्षम आहेत, ते पुढे जाणार, जगाचा नियमच आहे तो!’ अशी वाक्य आपल्याकडे सर्रास बोलली जातात. अशा वातावरणात तरूण आणि अयशस्वी असणं याचं ओझं दर वर्षी हजारो विद्यार्थ्यांना पेलावं लागतं. कितीतरी जणांना यातल्या अंतर्विरोधाच्या जखमांनी कोसळायला होतं. प्रत्येक परीक्षेनंतर पहिल्या पानावरच्या विद्यार्थ्यांच्या सोनेरी यशाच्या बातम्यांच्या आडून दुसऱ्या पानावरच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या वाकून पाहत असतात. काही वेळा तर यशस्वी विद्यार्थीच लहानशा अपयशाच्या शंकेने स्वतःला संपवून टाकतात. या एकाच पानाच्या दोन बाजू आहेत, याकडे आपण दुर्लक्ष करत राहतो. अपयशाचं दुःख जेवढं निरर्थक, तेवढाच यशाचा डोलाराही पोकळ, हे कुठेतरी आतून आपल्याला माहीत असतं तरी मध्यमवर्गीय पालक आपल्या पोरांनी ‘एक्झाम वॉरियर’ व्हावं असं स्वप्न पाहतात. नक्की कुणाशी लढायचं हे न कळून हे छोटे वॉरियर्स स्वतःलाच जखमी करून घेत जातात. 

आपल्या काळाचा रेटा असा आहे की अस्थिर भविष्याच्या चिंतेने दिवसेंदिवस तरूणांनी अधिकाधिक अस्वस्थ आणि अधीर व्हावं अशाप्रकारे व्यवस्था काम करते. संधींचा अवकाश लहान होत जातो, तसं तसं तरूणांच्या डोक्यावरचं ‘एक्झाम वॉरियर’ होण्याचं ओझं वाढत जातं. परीक्षेच्या बागुलबुवाने पालक इतके पछाडले जातात की चक्क तिसरी चौथीपासूनच मुलाला इंजिनियरिंगची तयारी करून घेणाऱ्या क्लासला घालतात. बरं एवढं करून त्या मुलाला मात्र माहीत असतं की ‘आज’च्या पलिकडे फार दूरवर आपल्याला कधी पाहता यायचं नाही. कितीही कष्ट उपसले तरी पदरी निराशाच पडणार, या खात्रीसकटच तरूणांच्या रांगा निर्जीवपणे परीक्षेच्या अजब यंत्राकडे ढकलल्या जातात. यंत्रापलिकडच्या क्रूर जगासाठी मूल जन्माला येतानाच रंगहीन करियरिस्ट जगण्याचं नशीब घेऊन येतं. ‘पिंक फ्लॉइड’ बॅंडच्या ‘वी डोंट नीड नो एजुकेशन’ या गाण्याच्या ‘अनादर ब्रिक इन द वॉल’ या व्हिडिओत कारखान्यातल्या सरकत्या पट्ट्यावरून लहान मुलांची रांग त्यांना चेंगरून, चिरडून टाकणाऱ्या एका प्रचंड यंत्राकडे जातेय, असं एक अंगावर काटा आणणारं दृश्य आहे. या गाण्यातल्या दृश्याप्रमाणे परीक्षेच्या यंत्राच्या एका बाजूने जिवंत मुलं आत शिरतायत आणि दुसरीकडून एकसारख्या दिसणाऱ्या विटा बाहेर पडतायत, असं काहीसं शिक्षणव्यवस्थेचं चित्र आहे. हा सगळा कारखाना बंद पाडणं तर आपल्या हातात नाही, पण त्यातल्या परीक्षेच्या यंत्राची दहशत तर आपण कमी करू शकतो. अतिशय चांगले किंवा अतिशय वाईट मार्क मिळाले तरी खळखळून हसून स्वतःच्या वाढीची जबाबदारी विद्यार्थ्यांना घेता यावी आणि कारखान्याबाहेरच्या दुनियेत स्वतःला शोधता यावं म्हणून आपण प्रयत्न करू शकतो. राज कपूरच्या गाण्याच्या लयीत स्वतःला विसरून, कधी कुणाचं दुःख उसनं घेऊन तर कधी कुणाच्या मुक्त हसण्यात स्वतःला हरवून टाकताना सहजपणे या कारखान्यातून बाहेर पडण्याचा रस्ता मिळतो. हा रस्ता सापडतो तेव्हाच आपण खर्‍या अर्थाने ‘साक्षर’ होऊ शकतो. आखिर जीना इसीका नाम है!


राही श्रु. ग.
rahee.ananya@gmail.com
लेखिकेचा संपर्क : ९०९६५८३८३२

 

बातम्या आणखी आहेत...