आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणींच्या ‘मरणा’च्या कटाविरुद्ध…

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राही श्रु. ग.  

गेल्या काही वर्षांमध्ये निरीक्षकांनी नोंदवलं आहे, की लोकांचे मोठे समुदाय अचानकपणे एखाद्या न घडलेल्या गोष्टीवर एकत्रितपणे विश्वास ठेवतात. आपल्या खासगी आठवणींमध्ये या गोष्टींना जागा देतात. अशा घटनांना अभ्यासकांनी ‘मंडेला इफेक्ट’ असं नाव दिलं आहे. 
 
२०१० मध्ये एकदा मित्रांच्या एका टोळक्याला अचानक लक्षात आलं की दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णभेदाविरोधातल्या लढ्याच्या नायकाला, नेल्सन मंडेला  यांना जगभरातले लोक श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांनी बातम्या पाहिल्या, तर मंडेला यांच्या मृत्यूची बातमी कुठेच दिसेना. उलट लोक सांगू लागले की, मंडेला यांचं काही एवढ्यात निधन झालेलं नाही, त्यांना तर १९८०च्या दशकात तुरुंगात असतानाच मरण आलं होतं. अगदी मंडेला यांच्या अंत्ययात्रेचे फोटो, व्हिडिओ आम्ही तेव्हा टीव्हीवर पाहिल्याचं आठवतं आहे, असंही काही लोक सांगू लागले. मित्रांचा हा गट पुरता गोंधळून गेला. नीट तपासणी केली तेव्हा त्यांनी पाहिलं की, नेल्सन मंडेला यांची १९९० साली तुरुंगातून सहीसलामत सुटका झाली होती, १९९३ मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला, १९९४ ते १९९८ ही वर्षं ते दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिले आणि २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या फुटबॉलच्या वर्ल्ड कप सामन्याचा अंतिम खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये बसलेले होते!
कुठल्याही वर्तमानपत्रात, टीव्ही चॅनलवर मंडेलांच्या मृत्यूची बातमी आलेली नसतानाही जगभरातल्या कितीतरी लोकांनी एकाच वेळी मंडेलांच्या मरणावर विश्वास ठेवला होता. जगभरातल्या कितीतरी लोकांच्या मनातली ही खोटी ‘आठवण’ कुठून उसळी मारून वर आली? मुळात इतकी वर्षं मंडेला हयात नाहीत, ही ‘आठवण’ लोकांच्या मनात कशी तयार झाली? ही घटना एवढ्या एका गोष्टीपुरती मर्यादित नाही. गेल्या काही वर्षांमध्ये निरीक्षकांनी नोंदवलं आहे, की लोकांचे मोठे समुदाय अचानकपणे एखाद्या न घडलेल्या गोष्टीवर एकत्रितपणे विश्वास ठेवतात. आपल्या खासगी आठवणींमध्ये या गोष्टींना जागा देतात. अशा घटनांना अभ्यासकांनी ‘मंडेला इफेक्ट’ असं नाव दिलं आहे. 

काही मानसशास्त्रज्ञांच्या मते एखाद्या घटनेचा वृत्तांत आपल्या आठवणींबरोबर जुळेनासा झाला, तर नव्या माहितीच्या आधारावर आपल्या आठवणीदेखील आपण नकळतपणे ‘बदलून घेतो’. एखाद्या घटनेविषयी एकच प्रकारची माहिती पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागली तर त्या माहितीच्या अनुषंगाने आपल्या आठवणी आपण वेगाने बदलून टाकतो. सामान्य माणूस आपल्या मतांविषयी ठाम नसतो, पण आपल्या आजूबाजूला कुणी ठामपणे काही मत मांडलं की, आपण सहजपणे ते आपलं मत म्हणून स्वीकारतो. मित्रांसोबत सिनेमा पाहायला निघताना आपल्याला खरं तर वेगळा सिनेमा पाहायचा असतो, पण मित्र ठामपणे दुसरा सिनेमा पाहूया, असं सुचवतो आणि आपण सहजपणे तो दुसरा सिनेमा पाहतो. नेल्सन मंडेला यांची अंत्ययात्रा प्रत्यक्षात झालेलीच नसताना कितीतरी लोकांना त्या बातमीचे फोटो, व्हिडिओ पाहिल्याचं आठवत होतं, ती बातमी पाहताना आपण कुठे होतो, आपल्याबरोबर कोण होतं, हेसुद्धा ‘आठवत’ होतं, कारण मंडेलांचा मृत्यू झाला आहे हे पुन्हा पुन्हा ऐकल्यावर लोकांनी नकळतपणे तशा आठवणी आपापल्या मनात नव्याने रचल्या होत्या. 

नेल्सन मंडेलांच्या बाबतीतली घटना ही इंटरनेटवरून वेगाने पसरली खरी, मात्र तिची मुळं ही आपल्या इतिहासाकडे पाहण्याच्या पद्धतीत आहेत. आपल्या आठवणींच्या बाबतीतली दुसरी गंमत अशी की ज्या घटनेच्या संदर्भातल्या आपल्या आठवणी असतात, त्याबद्दलच्या प्रत्यक्ष तथ्यांपेक्षा आपल्या त्याबद्दलच्या भावना, त्याबद्दल आपण केलेला विचार या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्टपणे आठवतात. आपली क्रिकेट टीम जेव्हा कुठला तरी सामना जिंकते, तो सामना पाहतानाचा थरार, तेव्हा झालेला आनंद आपल्या लक्षात राहतो, नेमक्या किती धावांनी सामना जिंकला आहे, कशा प्रकारे जिंकला आहे, हे मात्र आपण लवकरच विसरून जातो. 
तथ्य आणि भावनांच्या संतुलनावर आपलं जगणं तोलून धरलेलं असतं. मात्र सगळं ‘नॉर्मल’ चाललेलं आहे असं वाटत असतानाच आपल्या नकळतपणे या संतुलनाचा पाया हेलखावे खात असतो. इंटरनेटवरून पसरणाऱ्या ‘फेक न्यूज’च्या संदर्भात बोलताना मानसशास्त्रज्ञ या तथ्य आणि भावनांच्या नात्याबद्दल सांगतात. आपल्या मनामध्ये कितीतरी गोष्टींबाबतचे ठाम पूर्वग्रह असतात. ‘बाई आहे ना, म्हणजे दुबळी, मूर्ख, रडकीच असणार’, ‘गरीब आहे ना, म्हणजे अस्वच्छ, अडाणी, चोर असणार’, ‘अमेरिकन आहे ना, म्हणजे अत्याधुनिक, चकचकीत, नेटकंच असणार’… अशा प्रकारचे पूर्वग्रह आपण उघड बोलून दाखवले नाहीत, तरी आपल्या मनाच्या तळाशी ते कायमचे मुक्कामाला असतात. अशा पूर्वग्रहांना पक्की करणारीच ‘माहिती’ आपण आपोआप निवडतो. उलट या पूर्वग्रहांना  खोटी ठरवणारी माहिती आपण टाळतो, पाहून न पाहिल्यासारखी करतो. आपल्या ‘आठवणी’ पक्क्या करण्यासाठी, नव्या आठवणी रचण्यासाठी आपण आपल्या पूर्वग्रहांना धरून चालणारी माहिती निवडतो. अशी ‘माहिती’ पुन्हा पुन्हा बोलली- लिहिली जात असेल तर ती आपण अधिकच वेगात सामावून घेतो.
 
जिथे ‘माहिती’चं खरंखोटंपण आता महत्त्वाचं उरलेलं नाही, प्रत्यक्ष काय घडलं त्यातली तथ्यं महत्त्वाची नाहीत, आपल्या पूर्वग्रहांनी रचलेल्या नकारात्मक भावनाच माणसाचं जगणं ठरवू लागल्या आहेत, अशा काळाला पोस्ट ट्रुथ एरा - ‘सत्योत्तर काळ’ असं म्हटलं जातंय. इथे बोलण्याची विश्वासार्हताच संपत चालली आहे. सत्य काय आहे,  खरेपणा म्हणजे काय, हे कळेनासं झालं आहे. इंटरनेटच्या अगणित खिडक्यांमधून अब्जावधी प्रतिमा दिसत राहतात. फोटो, व्हिडिओ, चित्र, जिफ्स आणि मीम्सच्या एकापाठोपाठ एक प्रतिमा. यातली मुख्य प्रतिमा कोणती? कोणकोणत्या प्रतिमांमधून ‘कॉपी- पेस्ट’, ‘फोटोशॉप’ करून आपल्या व्हॉट्सॲपवर येणाऱ्या ‘गुड मॉर्निंग’च्या फुलांचं चित्र तयार झालं आहे? त्याला किती लोकांचा हात लागला आहे? ग्रुपवर नियमितपणे ‘गुड मॉर्निंग’ करत राहणाऱ्या मित्राच्या हाती रोज कोण हे चित्र देतंय? रोज गुड मॉर्निंग, गुड नाइट करता करता आपण आपल्या कुठल्या खासगी आठवणींच्या तिजोरीची किल्ली बाहेर काढतोय? आपण आपल्या समाजासोबत जशा नव्या आठवणी रचतो आणि सजवतो तशा काही आठवणी एकत्रितपणे विसरून जातो. इतिहासात घडलेली एखादी महत्त्वाची गोष्ट मुळात घडलेलीच नाही, अशा प्रकारे सगळे वागू लागतात. अनेकदा आपण सगळे समाज म्हणून कसे आहोत, आपला स्वभाव काय, आपली स्वप्नं काय हेसुद्धा आपण विसरतो. देशाचा मुकुट परिधान करणाऱ्या हातांवरचे दंगलीच्या रक्ताचे डाग पार विसरून आपण स्वप्नं कुठे स्वस्तात विकत मिळतील का, हे शोधू लागतो. मनाच्या तळाशी असलेल्या पूर्वग्रहांना जुळणारा वणवा चारी दिशांना पसरू लागला, की आपण पाहिलेल्या, विवेकाने जुळवलेल्या आठवणी कापरासारख्या हवेत उडून जातात. ज्वालाग्राही आठवणींचं बांधकाम आपलं मन वेगात सुरू करतं. काही कळायच्या आत सगळं एकदम पेट घेतं आणि भडका डोक्यापर्यंत पोचतो. भीती आणि द्वेषाच्या अजब रसायनातून माणसांची रंगीत गर्दी एकाएकी एकरंगी झुंड होऊन जाते. या झुंडीतल्या मनांमधल्या पूर्वग्रह ओलांडणाऱ्या एकमेकांबद्दलच्या प्रेम, मैत्री आणि सहभावाच्या आठवणी करपून जाऊ लागतात. झुंडीतल्या प्रत्येकाला एकदमच विस्मरणाचा आजार होतो. ‘मेरी यादाश्त खो गयी, मैं कहां हूं, कौन हूं…’ म्हणेपर्यंत आठवणींचा नवाकोरा साठा डोक्यात भरला जातो आणि आपण कुठे आहोत, कोण आहोत हेसुद्धा ताबडतोब सांगितलं जातं.

‘मंडेला इफेक्ट’ का होतो आहे, हे सुरुवातीला कळत नव्हतं, तेव्हा काही लोकांना वाटलं, एकदम शेकडो लोकांना भलत्याच गोष्टी आठवू लागल्या म्हणजे कुणी काही करणी केली, काळी जादू झाली! विज्ञानकथा वाचणारे लोक म्हणू लागले कुणाचं तरी टाइम मशीन बिघडल्यानं इतिहासाच्या एकसरळ रेषेला फाटे फुटले आणि आपण सगळे आपल्याच काळाच्या दुसऱ्या इतिहासात, समांतर जगात फेकले गेलो. या ‘दुसऱ्या जगा’त एकाच वेळी मंडेला जिवंतही आहेत आणि त्यांचं निधनही झालं आहे. सब गोलमाल है! डोकं ठिकाणावर आल्यावर लक्षात आलं की आपल्या या एकाच जगात ठिकठिकाणी पूर्वग्रहांचे समांतर वणवे लागतायत. तथ्यांमधून, प्रत्यक्षातल्या खऱ्या गोष्टींमधून वेगाने पसरत ते आपल्या खासगी आठवणींपर्यंत पोचतायत. नेहरूंची आठवण काढत मंडेला म्हणाले होते ‘स्वातंत्र्यापर्यंतची वाटचाल सोपी नाही’. केवळ मंडेलाच नाही, त्यांचा आणि नेहरूंचा स्वातंत्र्याचा लढाही मरण पावला आहे, असं म्हणत लोकशाहीला श्रद्धांजली वाहणाऱ्या या वणव्यांमध्ये आपल्या आठवणींच्या स्वातंत्र्याला कवटाळून बसणं हाच या ‘मंडेला इफेक्ट’वरचा उतारा आहे. 

लेखिकेचा संपर्क : ९०९६५८३८३२
 

बातम्या आणखी आहेत...