आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजेडाच्या गोष्टींची पेरणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हुकुमशाही आणि आक्रमक सरकार असलेले देश भीती आणि संशयाने पछाडून जातात. सततची हिंसा पाहून दुःख आणि भीती रोजच्या जगण्यात सवयीची होऊ लागते. त्याच त्याच द्वेषाने भरलेल्या एकसुरी कथा सत्ताधारी ऐकवत राहतात आणि त्यांच्याआडून होणाऱ्या हिंसेने लोकांचे जीव जातात तशी त्यांच्या साठवणीतली अद्भुतरम्य स्वप्नंही हळूहळू संपत जातात. युटोपिया संपून त्याच्या जागी अमानुषपणा, भीती आणि संशयाने भरलेलं काल्पनिक जग लोकांच्या जगण्याचा हिस्सा होतं.
 

 

गोष्टींमध्ये भूमिगत निखारे असतात. लहानपणी झोपताना आजीने सांगितलेल्या गोष्टींमधल्या उबेला कुशीत घट्ट धरून आपण झोपत असतो. घरा-गावातले जुने जाणते चावडीवर बसल्या बसल्या दूर नजर लावून गजाली सांगायला लागले की त्यांच्यातली ऊबच तर आजूबाजूच्या कोंडाळ्याला त्यांच्याभोवती ओढून आणते. अगदी पहिला माणूस जन्मला तेव्हा त्याच्यासोबत गोष्टी जन्माला आल्या. इतिहासात दूरपर्यंत पाहावं तिथवर या गोष्टींच्या खुणा आपल्याला दिसतात. जगभरात सगळीकडे, प्रत्येक समाजात माणूस गोष्टी सांगत- ऐकत वाढतो. असं म्हणतात की एखाद्या आदिवासी टोळीत माणूस एकवेळ चाकाचा वापर करत नसेल, पण गोष्टींवर आपला गाडा हाकत राहतो. अगदी लहानपणापासून मरेपर्यंत माणसाला आपण कुठून आलो, जग कुठून आलं, आपलं आणि जगाचं नातं काय याचं अमाप कुतुहल असतं. आपल्या घरापलिकडे, गावापलिकडे, दूर देशातले लोक कसे असतील? समुद्रापलिकडे, जमिनीखाली, आकाशापलिकडे, आपली नजर पोचत नाही तिथे असलेली दुसरी दुनिया कशी असेल? लहान मुलं हे प्रश्न बोलून दाखवतात आणि मोठी माणसं मनातल्या मनात ते चघळत बसतात. मुलांना उत्तरं देताना मोठी माणसं स्वतःलाही उत्तरं देऊ लागतात आणि गोष्टी तयार होतात. आपल्या नजरेपलिकडच्या अनोळखी दुनियेतल्या दूरदूरच्या लोकांबद्दलच्या गोष्टी आपण आवडीने ऐकतो आणि सांगतो. आपल्यापेक्षा वेगळ्या जगण्याबद्दलच्या आपल्या कुतुहलामुळे आपण आवडीने काल्पनिक अद्भुतरम्य जगं तयार करतो. हव्याहव्याशा वाटणाऱ्या अशा अद्भुत- आदर्श युटोपियाच्या गोष्टींची स्वप्नं पाहत लहान मुलं शांत झोपून जातात आणि ती स्वप्नं घेऊन मोठी माणसं जागेपणी आहे ते जगणं सुंदर करण्यासाठी प्रयत्न करतात. काही गोष्टींमधून मुलांनी कसं वागावं हे शिकवलं जातं. आपल्या समाजात चांगलं वागणं आणि वाईट वागणं कशाला म्हणतात हे आपण गोष्टींमधून शिकतो. काही गोष्टी या चांगल्या वाईटाला निकालात काढून आणखी वेगळेच काही धडे देतात. अशा हजारो लाखो गोष्टींच्या धगीवर एक एक माणूस जगत असतो.

 

आधुनिक जगात निरनिराळ्या शोधांनी आणि जगाला जोडणाऱ्या सगळ्या साधनांनी आपलं ‘दुसऱ्या लोकां’बद्दलचं कुतुहल बऱ्यापैकी शमवलं, पण आपण गोष्टी सांगणं थांबवलं नाही. आपण दिवसाकाठी एकमेकांना गोष्टी सांगतोच आहोत. कुठल्याही समाजात ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांच्या नजरेतून दिसणारं जग जनता पाहू लागते. जशीजशी सगळी सत्ता एका गटाकडे एकवटू लागते, तशा राज्यकर्त्यांनी सांगितलेल्या गोष्टीही त्यांच्याबरोबरीने राज्य करू लागतात. जेव्हा एखाद्या देशात आक्रमक एकाधिकारशाही सत्ता पाय रोवते, तेव्हा तिथल्या हिंसक राज्यकर्त्यांच्या गोष्टींमधले निखारे पेट घेतात आणि प्रचंड आग भडकते. एकदा अशाच एका देशात प्रचंड ताकदीने एक राज्यकर्ता सत्तेत आला होता. त्याच्या पक्षाने जनतेला गोष्टी सांगायला सुरुवात केली. देशातले अल्पसंख्य धर्माचे लोक हिंसक आणि आक्रमक आहेत, त्यांनी देशातल्या बहुसंख्यांकांचं नुकसान केलं आहे, अशी तात्पर्य देण्यासाठी ते एकापाठोपाठ एक गोष्टी सांगत राहिले. आपल्याच देशातल्या, आपल्या नजरेसमोरच्या लोकांच्या गोष्टी ‘दुसऱ्या’ आणि ‘परक्या’ लोकांबद्दलच्या गोष्टींसाठीच्या उत्साहाने जनता ऐकू लागली. मात्र अनोळखी जगण्याबद्दलच्या युटोपियाच्या जागी आता ओळखीच्या अल्पसंख्यांकांच्या जगण्याबद्दल पद्धतशीरपणे रचलेल्या अफवाच गोष्टी म्हणून लोकांना भरवण्यात आल्या. हे अल्पसंख्य त्यांची संख्या वाढवत आहेत, त्यांच्या आक्रमक आणि घाणेरड्या जगण्यामुळे बहुसंख्यांकांचं जगणं धोक्यात येणार, अशा गोष्टी ऐकून बहुसंख्यांकांच्या मनात जी आग भडकू लागली, तिने देशभरात बरंच काही जाळून खाक करून टाकलं. ही गोष्ट आहे १९३० आणि १९४०च्या दशकातल्या नाझी जर्मनीची. देशातल्या अल्पसंख्य ज्यूंविरोधातल्या द्वेषाच्या आगीमुळे झालेला प्रचंड संहार सगळ्या जगाला माहीत आहे.


आणखी काही वर्षांनी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जनतेने दिलेल्या प्रचंड बहुमतासह एक लोकप्रिय नेता सत्तारूढ झाला. बालपणापासूनच त्याला धार्मिक शिक्षण मिळालं होतं आणि आपल्या धर्माचं रक्षण हे त्याने त्याचं मुख्य कर्तव्य मानलं. सत्तेत आल्याबरोबर त्याने शाळाशाळांमधून, सार्वजनिक ठिकाणी, अगदी सिनेमागृहांमधूनही लोकांना देशप्रेमाचे धडे द्यायला सुरूवात केली. त्याच्या सहकाऱ्यांनी देशाच्या आणि धर्माच्या इतिहासाच्या सुरस आणि जोशपूर्ण कथा रंगवूनच सत्ता मिळवली होती. ‘त्या सोनेरी दिवसांकडे’ जाण्यासाठी देशाचं आणि संस्कृतीचं ‘रक्षण’ करण्यासाठी त्याचे सहकारी सज्ज झाले. हे चित्र आहे १९७९च्या आसपासच्या इराणचं. देशव्यापी ‘इस्लामिक क्रांती’ झाली आणि खोमिनी या सनातन हुकुमशहाने सत्ता हाती घेतली. सत्तेवर आल्या आल्या त्याने लोकांच्या जगण्यावर धर्माच्या नावाखाली अमाप बंधनं घातली. तो सत्तारूढ होण्यापूर्वी स्कर्ट घालून मुक्तपणे वावरणाऱ्या इराणी बायकांना हिजाबशिवाय रस्त्यावर आल्या तर अटक होऊ लागली. देशातल्या अनेक पुरोगामी कवी, लेखक आणि विचारवंतांच्या दिवसाढवळ्या हत्या झाल्या. खोमिनीसारख्यांनी दाखवलेल्या जुन्या दिवसांच्या सुरस कथांच्या पोटी भयानक हिंसेने जन्म घेतला होता.


हुकुमशाही आणि आक्रमक सरकार असलेले देश भीती आणि संशयाने पछाडून जातात. सततची हिंसा पाहून दुःख आणि भीती रोजच्या जगण्यात सवयीची होऊ लागते. त्याच त्याच द्वेषाने भरलेल्या एकसुरी कथा सत्ताधारी ऐकवत राहतात आणि त्यांच्याआडून होणाऱ्या हिंसेने लोकांचे जीव जातात तशी त्यांच्या साठवणीतली अद्भुतरम्य स्वप्नंही हळूहळू संपत जातात. युटोपिया संपून त्याच्या जागी अमानुषपणा, भीती आणि संशयाने भरलेलं काल्पनिक जग लोकांच्या जगण्याचा हिस्सा होतं. बेमालूमपणे लोक अशा डायस्टोपियाच्या कथांमध्ये जगू लागतात. आपल्यावरची सत्ताधाऱ्यांची ‘नजर’ आणि आपल्यावरचं त्यांचं नियंत्रण जाणवून झोप विसरून जागेपणीच लोक स्वतःला डायस्टोपिक कथांमध्ये अडकवून टाकतात.

 


डायस्टोपिया किंवा ‘ॲन्टी-युटोपिया’ला कोणी ‘दुःखाचा प्रदेश’ म्हणतं तर कोणी अंधारयुग. जगाच्या इतिहासात कितीतरी वेळा वेगवेगळ्या ठिकाणी लोकांवर डायस्टोपियात दिवस काढायची वेळ आली आहे. मात्र प्रसिद्ध नाटककार बर्टोल्ट ब्रेख्त आपल्याला आठवण करून देतो की, अंधारयुगातही संगीत असतं, त्या त्या अंधारयुगाचं असं खास संगीत तेव्हा जिवंत असतं. हे जिवंत संगीत जपून ठेवणाऱ्या गोष्टीही अंधारयुगातल्या अंधाऱ्या तळघरांमधून, बंद दारांआडून कुजबुजत्या आवाजात सांगितल्या- ऐकल्या जातात. लोक लिहित राहतात, वाचत राहतात. द्वेषाच्या डायस्टोपिक कथांना लोक आपापल्या प्रेम आणि सहभावाच्या गोष्टींमधून उत्तर देतात. 
हिरोशिमा आणि नागासाकीच्या बॉम्बहल्ल्यामध्ये जपानमधली छोटी सादाको गंभीर आजारी झाली. तिच्या जीवघेण्या आजारपणात सगळ्यांसाठी प्रार्थना करत तिने कागदाचे लहान लहान हजार बगळे बनवायला घेतले. तिच्या बगळ्यांनी सोबत आणलेल्या शांततेसाठीच्या प्रार्थनेने सादाकोच्या गोष्टीतून जगभर प्रवास केला. जपानची सादाको तशी नाझी जर्मनीतल्या एका ज्यू कुटुंबातली हुशार आणि धाडसी ॲन फ्रॅंक. तिच्या ‘डियर डायरी’सोबत बोलता बोलता आपल्या घराच्या कैदखान्यातून ही ॲन कितीतरी स्वप्नं रंगवते. बाहेरच्या जगातल्या दहशतीसोबत झुंझत ती आपल्याला केवढी हिंमत देऊन जाते!

 


‘पर्सेपोलिस’ या पुस्तकात मार्जान सत्रापी या इराणी लेखिकेने तिच्या बालपणी पाहिलेली इस्लामी क्रांती आणि त्यानंतर बदलत गेलेल्या तिच्या प्रिय देशाचं चित्र रंगवलं आहे. ‘ग्राफिक नॉव्हेल’ म्हणजे चित्रांच्या आणि शब्दांच्या मालिकेतून मार्जानने दोन पुस्तकांमध्ये तिचा आणि तिच्या देशाचा तीन दशकांचा प्रवास सांगितला आहे. या कादंबरीवर एक ॲनिमेटेड सिनेमाही येऊन गेला आहे. तिच्या स्वप्नातला, तिच्या बालपणीच्या अंधुक आठवणीतला इराण, मग वाढत गेलेला अमेरिकेचा आणि पाश्चिमात्य जगाचा प्रभाव आणि शेवटी धार्मिक कट्टरतेतून आपली जान हरवून टाकलेला इराण अशी वेगवेगळी चित्रं मार्जान आठवत जाते. आपली इराणी ओळख आणि आपल्या हिश्शाच्या स्वातंत्र्याची ओढ यातल्या कात्रीत अडकलेली मार्जान सत्रापी तिच्या परीने अंधारयुगाशी लढण्याचे कितीतरी मार्ग दाखवते.

 


इराणच्या शेजारी, इराकच्या बसरा शहरातल्या अलिया मोहम्मद बकरची गोष्टसुद्धा अशीच, तिथल्या अंधारयुगाला पार करत आपल्यापर्यंत पोचते. बसरामधल्या तीस हजारांवर पुस्तकं असलेल्या वाचनालयाची अलिया ही लायब्रेरियन. अमेरिका आणि इंग्लंडबरोबरच्या इराकच्या युद्धाचं सावट अलियाच्या लायब्ररीत जाणवू लागतं तेव्हा युद्धापासून लायब्ररीची पुस्तकं वाचवण्यासाठी अलिया जिवाचं रान करते. देशविदेशातल्या गोष्टींचा साठा आणि विचारांच्या देवाणघेवाणीचं केंद्र असलेली तिची लायब्ररी जळण्याआधी अलिया आणि तिचे मित्रमैत्रीणी सगळी पुस्तकं सोडवून आणतात, त्याची ही गोष्ट. युद्धाच्या झळांपासून पुस्तकं वाचवणारी अलिया ही अंधारयुगात गोष्टी जपणाऱ्या सगळ्यांचं प्रतिकच होऊन जाते. अंधारयुग जसं भीती घेऊन येतं तशी गोष्टी जपायची हिंमतही. अधिक प्रेमानं आणि मोठ्या जोशानं गाण्याची ही गाणी आहेत. जमिनीवर थिजवणारा अंधार पसरत गेला की भूमिगत गोष्टी त्यांची ऊब घेऊन येतात. त्यांना पेरल्यावर, आठवणीने पाणी घालत राहिलं की त्या उजेड घेऊनच उगवतात. जमेल तिथवर त्या पेरत जाणं मात्र आपलं काम, अजून काय!
------------------------------

राही श्रु. ग.
rahee.ananya@gmail.com
लेखिकेचा संपर्क : ९०९६५८३८३२

बातम्या आणखी आहेत...