आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅलो, हामीद?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसदेत तुमच्या काश्मीरचा गजर सुरू झाला तोवर टीव्हीवर यावर्षीचे चित्रपटांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत सर्जिकल स्ट्राइक ते पॅडमॅनची नावं वाचेपर्यंत उर्दू भाषेतल्या सर्वोत्कृष्ट सिनेमाचं नाव पाहण्याचा माझा उत्साह संपला होता. पण मग पाठोपाठ बातम्यांमध्ये पाहिलं की आठ वर्षांच्या तलहा अर्शद रशीला सर्वोत्कृष्ट बालकलाकारासाठीचा पुरस्कार मिळाला आहे. आता हा तलहा राहणारा काश्मीरचा. पुरस्कार जाहीर झाले तोवर तुमच्या काश्मीरमध्ये ‘इतिहास’ घडल्याच्या आनंदात जाण्यायेण्याचे रस्ते, इंटरनेट, फोन लाइनी… सगळं सगळं बंद झालं होतं. त्यामुळे तीन-चार दिवस होऊन गेले, देशाने तलहाच्या पुरस्काराची बातमी साजरी केली, पण तलहा मात्र संपर्कक्षेत्राच्या बाहेर! 
 

तलहा अर्शद रशी... काश्मीरच्या या मुलाला ‘हमीद’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
 
… बीप बीप बीप बीप…
‘आपने डायल किया हुआ नंबर अभी उपलब्ध नही है’
‘आपण डायल करत असलेल्या नंबरची सेवा बंद केली आहे…’
 ‘यह नंबर संपर्क क्षेत्र के बाहर है’

हामीद, दोस्त, किती प्रयत्न करतेय, पण कशी पोहोचू तुझ्यापर्यंत? आठवडाभर झाला, सतत फोन लावतेय... पण तू कायम संपर्कक्षेत्राच्या बाहेर! ‘सभी लाइने बंद है’ म्हणे! आणखी काही दिवस असे गेले तर तू राहतोस ते ठिकाण खरोखर अस्तित्वात आहे की नाही अशी शंका यायला लागेल, शप्पथ! 

‘पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथे आहे!’ तुझ्या घराबद्दल आमिर खुस्रो म्हणाला होता. पुढे खालून हिमालय चढून जे जे आले ते सगळे याच चालीवर त्याला ‘नंदनवन’ म्हणू लागले. छोटू, तू तर आताशी सात वर्षांचा आहेस. अजून शाळेत भूगोलाच्या तासाला तुला नकाशे शिकवले असतील का, मला माहीत नाही. पण मला पक्कं माहितीय की आमच्या कुणाहीपेक्षा तुला नकाशे जास्त ‘जाणवतात’.  तुझी झेलम, तुझा हिमालय आणि तुझ्या काश्मीरची दरी कापत जाणाऱ्या जीवघेण्या सीमा तुझ्या छोट्या डोळ्यांना झोपेतही दिसतात. इथल्या मोठ्या माणसांना या सीमा फार फार महत्त्वाच्या वाटतात हामीद. तुझ्या काश्मीरच्या सीमांपेक्षा आम्ही जितके दूर तितक्या आम्हाला त्या आणखी हव्याहव्याशा वाटतात. त्या सीमांनी बंद केलेली ती जमीन आम्हाला हवी असते. आम्हाला आमच्या सुरक्षित घरांमध्ये टीव्हीसमोर बसून तिथे आमचा झेंडा फडकत राहिलेला पाहायचा असतो. टीव्हीचा कॅमेरा आम्हाला बंदुकीच्या नळ्या दाखवत नाही. तुमचे आवाज "म्यूट' करण्यासाठीच तर आमच्या रिमोटला ते बटण दिलेलं असतं. कधीकधी तो टीव्हीचा कॅमेरा इतका झूम होतो की तिथल्या नदीकाठच्या गोऱ्या सुंदर मुलीही फ्रेमच्या बाहेर जातात आणि फक्त झेंडाच दिसत राहतो. न जाणो त्या मुलींच्या डोळ्यांतले अश्रू आमच्या स्क्रीनवर दिसू लागले तर? कॅमेरा काळजी घेतो. आम्हाला नकाशातली जमीन दिसत राहते, तिच्या सीमा दिसत राहतात, हनिमून पॅकेजमध्ये विकलेली दाल लेकच्या सौंदर्याची चकचकीत चित्रं दिसत राहतात, पण तिथली माणसं मात्र आम्हाला दिसतच नाहीत. मग माणसं असली काय, नसली काय, काय फरक पडतो? जमीन महत्वाची. कुंपणं महत्त्वाची.

आम्ही विसरून जातो हामीद, की रान राखायच्या नादात पिकाला आग लावायची नसते. 
तुला खरं सांगू, आत्ता असं तुझ्याशी बोलून मोठी रिस्क घेतेय मी. सगळीकडे अशी भयानक शांतता पसरलेली असताना माझं हे बोलणं कुणी ऐकलं तर काय होईल, कल्पना करून भीती वाटते. माझ्या घरात मी सुरक्षित आहे आणि आता तर आमच्याकडचा पाऊसही ओसरू लागलाय. लख्ख ऊन पडेल आणि रस्त्यावर जल्लोष सुरू होईल. असं सगळं बरं चाललेलं असताना तुझ्याशी बोलणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुरहाड किंवा अस्मानीत सुल्तानीला आवतनच आहे थेट. पण काय करू? मला झोप लागत नाहीये हामीद. सतत ओले असणारे तुझे डोळे आणि आसवं सुकून कोरडी झालेली तुझ्या अम्मीची नजर… मला मान वर करून तुमच्याकडे पाहायची लाज वाटतेय हामीद…

खरं तर लक्ष गेलंच नसतं माझं तुमच्याकडे. झालं काय, संसदेत तुमच्या काश्मीरचा गजर सुरू झाला तोवर टीव्हीवर यावर्षीचे चित्रपटांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत सर्जिकल स्ट्राईक ते पॅडमॅनची नावं वाचेपर्यंत ऊर्दू भाषेतल्या सर्वोत्कृष्ट सिनेमाचं नाव पाहण्याचा माझा उत्साह संपला होता. पण मग पाठोपाठ बातम्यांमध्ये पाहिलं की आठ वर्षांच्या तलहा अर्शद रशीला सर्वोत्कृष्ट बालकलाकारासाठीचा पुरस्कार मिळाला आहे. आता हा तलहा राहणारा काश्मीरचा. पुरस्कार जाहीर झाले तोवर तुमच्या काश्मीरमध्ये ‘इतिहास’ घडल्याच्या आनंदात जाण्यायेण्याचे रस्ते, इंटरनेट, फोन लाईनी… सगळं सगळं बंद झालं होतं. त्यामुळे तीन चार दिवस होऊन गेले, देशाने तलहाच्या पुरस्काराची बातमी साजरी केली, पण तलहा मात्र संपर्कक्षेत्राच्या बाहेर! मी तलहाला शोधत निघाले आणि तू दिसलास. 

तुझ्या अम्मीच्या कुर्त्याच्या टोकाला धरून तू एकटक पाहत होतास अधांतरी कुठे तरी. आकाशात तुझ्या अल्लाकडे पाहत होतास का रे? किती दिवस झाले, तुझे अब्बू हरवले म्हणून तू अल्लाला फोन लावायचा प्रयत्न करत होतास. पुन्हा पुन्हा नंबर डायल करत होतास. तुझी अशी तंद्री लागली होती की मी काही तुला हाक मारली नाही. अर्थात माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचला असता का, मला माहीत नाही. हामीद बेटू, तुझ्या अम्मीकडे पाहायची मला भीती वाटते. तिच्यासाठी सहानुभूतीचे दोन शब्द बोलायचीही माझी लायकी नाही, असं वाटतं रे. म्हणून अखेर तुझ्याशी बोलतेय. तू मोठा होशील तोवर मला आणि दिल्लीपलीकडच्या आम्हा सगळ्यांना माफ करशील, म्हणून.

‘अल्लाने आपल्याला हे सुंदर जग दिलं. डोक्यावर निवारा दिला. अल्लानेच आपल्याला प्रेम करायला शिकवलं.’ तुझ्या अब्बूने तुला सांगितलं होतं. तुझ्या जमीनीतच ही प्रेम करण्याची रीत आहे. दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होण्याची, एकत्र एकाच दस्तरख्वानवर मिल- बांट के खाण्याची ही रीत. सगळ्या जाती, धर्माच्या माणसांना एका पंगतीचं आमंत्रण देणारी तुझ्या काश्मीरची ही काश्मीरियत. आपले पहिले पंतप्रधान नेहरू या काश्मीरियतचा मोठ्या प्रेमाने उल्लेख करायचे. भारतीय संविधानात जीव फुंकणारा सहभाव हे तुमच्या काश्मीरियतचंच एक रूप होतं हे नेहरूंनी ओळखलं होतं. हा आठवडा भारताच्या स्वातंत्र्याची आठवण जागवण्याचा आहे. तेव्हा त्या काळच्या मोठ्या अडचणींसमोर न नमता आपल्या विविधतेने नटलेल्या देशाला मोठ्या ताकदीने उभारणारे नेहरू हे तुमच्या काश्मीरचा वारसा सांगत होते ही किती सुंदर आठवण आहे. काही सुंदर आठवायचं म्हटलं की भीती वाटू लागते, अशा या काळात आपण ही आठवण जपायला हवी हामीद. 

तुम्हाला खरं तर सुरक्षितपणे जगण्याची आझादी तेवढी हवी आहे. आपल्या अम्मी आणि अब्बूसोबत झेलममधून तुझी नाव वल्हवत नेण्याचं स्वप्न तेवढं तू पाहतो आहेस. तुला तुझ्या डोंगरांमधली लय, तिथल्या माणसांच्या बोटांमधलं कसब आणि त्या कलेतलं काव्य जपायचं आहे. त्यापेक्षाही खरंतर सात वर्षांच्या कोणत्याही मुलाएवढीच साधी तुझी अपेक्षा आहे. तुला तुझे अम्मी आणि अब्बू तुझ्यासोबत हवे आहेत. 

…पण तेवढ्यासाठी तुला किती भोगायला लागावं! अल्लाच्या नावावर द्वेष शिकवणाऱ्या माणसांचा रस्ता टाळून तू जपून चालत राहतोस. मदत हवी तेव्हा तुझी अम्मी पोलिसांकडे खेटे घालत राहते, सीआरपीएफच्या बंदुंकांना घाबरून तू दूर दूर पळू पाहतोस. थकून भागून दिवसाकाठी मदत मागायला तुझ्या फोनमध्ये अल्लामियांशिवाय कुणाचाच नंबर नाही, ही आमची चूक आहे हामीद. ज्या जमिनीला आम्ही ‘आमची’ म्हणून साजरी करतो, तिच्या आत्म्याची, तिच्यातल्या शायरीची, तिच्या काश्मीरियतची राखण करणाऱ्या तुला आम्ही विसरून जातो. व्हॉट्सॲपवरच्या उन्मादी मेसेजेसपलीकडे तुझ्या काश्मीरबद्दल आम्ही काहीही वाचलेलं नसतं. तुझ्या जिवंत असण्याकडे या राष्ट्रातल्या लोकांचं लक्ष वेधण्यासाठी तुला राष्ट्रीय पुरस्कारालाच गाठावं लागतं. अर्थात त्यानंतरही तू अजून या राष्ट्राच्या संपर्कक्षेत्राच्या बाहेर! कसलं संपर्कक्षेत्र आहे हे यार आमचं, ज्याच्या हद्दीच्या बाहेरच बसवलं आहे तुला कायमचं!

... असो. हा आठवडा तर सेलिब्रेशनचा आहे. आणखी एक स्वातंत्र्यदिन येऊन गेला आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आनंदाने आणि सुरक्षितपणे जगण्याची आझादी असल्याची तो आठवण करून गेला आहे. हामीद, दोस्त, तुला हा स्वातंत्र्यदिन मुबारक. तुझ्या अम्मीलाही स्वातंत्र्यदिनाच्या  शुभेच्छा....

लेखिकेचा संपर्क : ९०९६५८३८३२
 

बातम्या आणखी आहेत...