आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुुक्तिदायी अवकाशाच्या वाटेवर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 जन्मापासून वयाच्या प्रत्येक टप्प्यावर अविरतपणे माणूस स्वतःला समाजाभिमुख करत असतो. आपल्या क्षमतांचा विकास करत आजूबाजूच्या जगामध्ये काही सर्जक हस्तक्षेप करायचा प्रयत्न करत राहतो. माणूस आणि समाजातल्या या सेंद्रीय संवादातून माणसाची वाढ होत राहते. अशा या नजरेच्या टप्प्यातल्या निरंतर प्रक्रियेचा, आजूबाजूच्या विद्यार्थी जीवनातून शिक्षणाच्या बहुरंगी पटावरचे सर्जक सूर शोधण्याचा आणि समकालीन राजकारणाच्या अनुषंगाने त्यातले गुंते सोडवण्याचा प्रयत्न करणारे हे पाक्षिक सदर...
 

आजही शनीशिंगरापूरच्या मंदिराच्या चौथऱ्याला तिचा स्पर्श झाल्याने विटाळ होतो.  शबरीमाला मंदिरात तिला प्रवेश नसतो. मशीदींचे दरवाजे तिच्यासाठी बंद असतात. धर्मसत्तेने मंदिरात, धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश देणं आजही नाकारलेलं असताना एकोणीसाव्या शतकात तिला ज्ञानाच्या मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून धडपडणा-या सावित्रीबाई आठवल्या नाहीत, तरच नवल ! 

 

दोन वर्षांपूर्वी मध्य झारखंडमधल्या आडकीच्या जंगलाजवळच्या एका आदिवासी शाळेत गेले होते. झारखंड सरकारच्या लोककल्याण विभागाबरोबरच्या एका प्रकल्पासाठी या मुलींच्या निवासी शाळेत राहून काम करायचं होतं. रांचीपासून चार तासांचा बसचा प्रवास करून तमार गावच्या फाट्याला उतरले, तेव्हा या चार तासांमध्ये खरंतर खूप लांब लांबची अंतरं पार केली होती. शाळेत पोचले तोवर अंधार गडद होऊ लागला होता. सामान ठेवून तिथल्या शिक्षकांसोबत मैदानावर येऊन बसले, तेव्हा आकाश चांदण्यांनी गच्च भरलं होतं! जेवणाची ताटं घेऊन हॉस्टेलमधून मुली आल्या, आणि त्यांनी गराडाच घातला. आमची थोडीफार ओळख होते आहे, तेवढ्यात आठवी-नववीच्या चारपाच मुली पुढे येऊन म्हणाल्या, ‘दीदी, तू महाराष्ट्राहून आलीस म्हणजे, सावित्रीबाईंच्या राज्यातून! तू पाहिलं आहेस त्यांचं घर? आम्ही पुस्तकात वाचला आहे, त्यांचा धडा!’ 


क्षणात सगळी अंतरं विरघळली आणि देशाच्या दूरच्या कोपऱ्यातल्या या सगळ्या छोट्या मैत्रिणी एकदम सामावून गेल्या. आकाशातल्या चांदणछताखाली जेवताना मी सावित्रीबाईंची गोष्ट सांगू लागले. सगळ्या मुली भारावून जाऊन ऐकू लागल्या. आता या क्षणी आमचं सगळ्यांचं, तिथे शाळेच्या आवारात असं बसलेलं असणं ही किती मोठी गोष्ट आहे, हे काही या सगळ्या मुलींना वेगळं सांगायची गरज नव्हती. तमारच्या या आदिवासी शाळेतल्या सगळ्या मुली, अनंत कष्ट उपसत शाळेपर्यंत पोचल्या होत्या. या मुली म्हणजे, त्यांच्या गावातली शिकणारी पहिलीच पिढी होती. सावित्रीबाईंचा रोजचा लढा, त्या सगळ्याजणी अक्षरशः जगत होत्या. सावित्रीबाईंची गोष्ट ऐकताना त्यांचे डोळे चमकू लागले. शिक्षणाच्या किल्लीने उघडणारी सगळी दारं, त्यांना त्यांच्या समोर दिसत होती.

 

मग मुलींनी मला गोष्ट सांगायला सुरूवात केली. त्यांच्या बिरसा मुंडाची गोष्ट. झारखंडच्या मातीत एकोणिसाव्या शतकात या विशीतल्या तरूणाने ब्रिटिश शासनाविरुद्ध मोठं बंड उभारलं. भयानक दुष्काळाच्या परिस्थितीत आदिवासींवर कर लादणाऱ्या जुलुमी ब्रिटिश सत्तेला बिरसाने आव्हान दिलं. आदिवासींच्या संघर्षाचं तो एक प्रतीक बनला. उलिहातू गावच्या ज्या शाळेत बिरसा मुंडा शिकला, ती शाळा त्याच्या कथेचं एक महत्वाचं केंद्र होती. मुंडारी भाषेत बिरसाची गाणी सुरू झाली, तेव्हा मुली मला या उलिहातूमधल्या ‘चमत्काराची गोष्ट’ सांगू लागल्या. हातात धनुष्य बाण होते, तेव्हा आम्ही जंगलात आरामात राहात होतो, पण जंगलाबाहेर हे धनुष्य बाण पुरणार नाहीत, हे बिरसाला माहीत होतं. त्याने त्याच्या भात्यात ब्रिटिशांनी आणलेलं शिक्षणही ठेवलं. ब्रिटिशांनी इथे शाळा आणली, तेव्हा त्यांना कुठे माहिती होतं की, तिथे धडे गिरवणारा बिरसा त्यांनाच पुढे ‘शिकवणार’ आहे ते.

 

शिक्षण नव्या जगाची दारं उघडतं तसं ते प्रत्येक अन्यायाला प्रश्न विचारण्याची, तोंड देण्याची हिंमत देतं. सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी शूद्रांसाठी आणि स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं उघडली, त्याबरोबर इथल्या ब्राह्मणशाहीला आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेला खोलवर तडा गेला.

 

शिक्षणाचा आणि सत्ताव्यवस्थांचा असा थेट संबंध आहे. भारतातली जातीसंस्था- पुरुषसत्ताक व्यवस्था आणि जगभरात पसरलेला साम्राज्यवाद याच शिक्षणाच्या अक्षावर लोकांना गुलामीत ठेवत राहिले. लोखंडाच्या साखळदंडांपेक्षा वर्चस्ववादी ज्ञानाच्या प्रसारातून आलेली गुलामगिरी आणखी भयंकर असते, कारण ती अदृश्य असते. दलितांचं आणि स्त्रियांचं अस्तित्वच दुय्यम आहे, हे सांगणाऱ्या मनुस्मृतीपासून ते जगभरातली श्रीमंती आणि गरिबी ही एका ‘न्याय्य खुल्या स्पर्धे’तून जन्माला आलेली आहे असं भासवणाऱ्या साम्राज्यवादी नवउदारमतवादापर्यंत वेगवेगळ्या व्यवस्थांमधल्या, सत्ताधिशांनी लोकांच्या मनांनाच गुलामीत बांधून घातले असते.

मात्र या गुलामीला भेदायचा रस्ताही शिक्षणातूनच मिळतो. मुक्तीदायी शिक्षण हे सत्तेला आव्हान देत असतं. कधी ते पृथीचं सूर्याभोवती फिरणं सिद्ध करत चर्चच्या धर्मसत्तेला आव्हान देतं तर कधी जगभरातल्या सगळ्या माणसांचा एकसारखा डीएनए दाखवून वंश आणि राष्ट्राच्या उन्मादी अभिमानातला फोलपणा उघड करतं. डॉ आंबेडकरांनी शिक्षणाला ‘वाघिणीचं दूध’ हे याच अर्थी म्हटलं होतं. महाश्वेतादेवींनी एका कथेत मोयना नावाच्या आदिवासी मुलीला शिक्षणातून दिसणारं नवं जग खूप सुरेखपणे उतरवलं आहे. नव्याने शाळेत जाणारी मोयना नदीतले मासे आणि आकाशातले तारे, अशा तिच्या जिव्हाळ्याच्या विषयांबद्दल शिकताना हरखून जाते आणि आपल्या मनातले अगणित प्रश्न विचारायचं, धाडस करू लागते. शाळकरी वयातल्या कुतुहलाने निरागसपणे ती ‘असं का?’ आणि ‘तसं का’चा पाढाच सुरू करते. शाळेच्या वर्गाबाहेर हे ‘का? का?’चं लटांबर न्यायचं नसतं, हे तिला कुणी सांगितलेलं नसतं. त्यामुळे ‘गावच्या सावकाराची गुरं मीच का चारायला न्यायची? त्याची पोरं असली कामं का करत नाहीत?’ असं ती विचारू लागते. शिक्षणाचा खरा उद्देश आपल्याला हे ‘का?’ विचारण्याचं धाडस देणं हाच तर असतो.

 

भारतामध्ये खऱ्या मुक्तीदायी शिक्षणासाठीचे निकष आपल्या संविधानातल्या उद्देशिकेतच दिलेले आहेत. स्वातंत्र्य, समता आणि सहभावाच्या मूल्यांना वगळून भारतात शिक्षणाचा विचार होऊच शकत नाही. सहभाव ही शिक्षणाची खरंतर पूर्वअटच आहे. एकमेकांच्या माणूसपणावरचा आपला विश्वास, सहवेदना आणि प्रत्येकाकडून शिकण्यासाठीची नम्रता, सहिष्णुता आणि खुलेपणा नसेल. तर माणूस तरूणपणीच म्हातारा होऊन जातो. शिकत राहणं आपल्याला तरूण ठेवतं. भारताच्या सर्वाथाने समृद्ध असलेल्या विविधतेचं जतन आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा आदर हे सहभावाचे दोन व्यापक निकष आहेत. शेकडो भाषा आणि जगण्याच्या अगणित पद्धती असलेल्या आपल्या देशात अनेकदा एकच एक पद्धत सर्वांवर लादली जाते. एकच प्रकारची भाषा ‘शुद्ध’ आणि बाकीच्या सगळ्या ‘अशुद्ध’ समजल्या जातात. अगदी शाळेतल्या परीक्षांमधून आपल्यावर तसं ठसवलं जातं. यामध्ये आपण अनेक समृद्ध लोकपरंपरांचा आणि मोठ्या ऐतिहासिक संचिताचा बळी देत असतो. कोकणी, अहिराणी, वऱ्हाडी या स्वतंत्र आणि महत्वाच्या भाषा आहेत, हे आपल्याला कळेपर्यंत आपण सगळ्या विद्यार्थ्यांना पुणेरी भाषाच ‘प्रमाण’ आहे, हे शिकवून झालेलं असतं. शिक्षण मुक्तीदायी व्हायचं असेल, तर प्रत्येकाला आपल्या गावच्या भाषेत अभिमानाने व्यक्त होण्याचं वातावरण तयार व्हावं लागेल. ‘महिषासुर मर्दिनी’ दुर्गेच्या गोष्टीबरोबरच आपल्याच देशातल्या असुर या आदिवासी जमातीतल्या ‘महिषा’ राजाची गोष्टही शिकवावी लागेल. केवळ एकाच प्रकारचं जगणं ‘योग्य, प्रमाण’ या समजातून बाहेर येऊन भारताच्या बहुलतेमधलं सौंदर्य खुलेपणाने स्वीकारणं शिकवावं लागेल. आपल्या देशातल्या अनेक शतकांपासूनच्या जात आणि पुरुषसत्ताक व्यवस्था, बहुसंख्य हिंदू आणि मुस्लिम यांच्यातल्या द्वेषाच्या राजकारणाला, त्यातून होणाऱ्या अन्यायाला प्रश्न विचारणारं शिक्षण हेच, आपल्या मातीसाठीचं अस्सल शिक्षण असू शकतं. वय, लिंग, जात, धर्म आणि प्रतिष्ठेच्या सगळ्या उतरंडींच्या सीमा ओलांडत जेव्हा आपण एकमेकांशी मैत्री करू शकू आणि खुलेपणाने एकमेकांकडून शिकू शकू तेव्हाच हे सहभावाच्या कक्षेतलं शिक्षण भारतातल्या रस्त्यारस्त्यावर, गल्ल्या, मोहल्ले आणि गावा-पाड्यांपर्यंत पोचेल. 

 

आजही शनीशिंगरापूरच्या मंदिराच्या चौथऱ्याला तिचा स्पर्श झाल्याने विटाळ होतो.  शबरीमाला मंदिरात तिला प्रवेश नसतो. मशीदींचे दरवाजे तिच्यासाठी बंद असतात. धर्मसत्तेने मंदिरात, धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश देणं आजही नाकारलेलं असताना एकोणीसाव्या शतकात तिला ज्ञानाच्या मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून धडपडणा-या सावित्रीबाई आठवल्या नाहीत, तरच नवल ! शाळेच्या वाटेवर गेस्टापूंची आजही असते फौज उभी; पण निडर निर्भीड मलाला वाट सोडत नाही. मुक्तीच्या वाटेत कैक अडथळे; नव्या फातिमा शेख, नव्या ताराबाई... नि आणि कोण कोण, उभ्या राहतात. शिक्षणाची वाट मुक्तिदायी आणि प्रशस्त करत राहतात.

 

पावणेदोनशे वर्षांपूर्वी अशाच जानेवारीच्या थंडीमध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. २०१९च्या नव्या दिवसांमधल्या नव्या थंडीत सगळी नवी जुनी प्रगती पुस्तकं आपल्या पुढ्यात आहेत. त्या सगळ्या मार्कांच्या गोळाबेरजेला डोक्यात ठेवून आपल्यातलं कुतूहल जिवंत ठेवत निर्भयपणे नव्या वर्षातल्या सगळ्या परिक्षांना एकत्र सामोरं जाऊ या. ऑल द बेस्ट!

 

लेखिकेचा संपर्क क्रमांक : ९०९६५८३८३२
(लेखिका नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.)