आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल आणि काँग्रेसने बदल स्वीकारावेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी हाेणे साेपे नाही. ते केवळ घराणेशाहीतून घडलेले नेतेच नव्हेत, तर अशा पाचव्या पिढीचे नेते आहेत. माेतीलाल नेहरू जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष बनले, त्या घटनेस आता उणीपुरी १०० वर्षे झाली आहेत आणि आनंद भवनाच्या खालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जेव्हा राहुल गांधी निवडणूक पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा सादर करतात, तेव्हा ते राजीनामापत्र गांभीर्याने स्वीकारण्याएेवजी काँग्रेस पक्षाने चिरपरिचित राग आळवण्यास सुरुवात केली ताे म्हणजे ‘नेहरू-गांधींच्या शिवाय आमचे काम चालणार नाही.’


राजकीय पक्षांची तुलना गतकाळातील शाही घराण्यांशी केली तर काही लाेक आक्षेप घेऊ शकतात. परंतु प्रश्न प्रामाणिकपणाचा आहे की, कधी काळी स्वातंत्र्यलढ्यात अग्रणी राहिलेला काँग्रेस पक्ष गेल्या ५० वर्षांपासून ‘काैटुंबिक राज’मध्ये जखडून राहिला आहे. फरक इतकाच की या घराण्याला निवडणूक प्रक्रियेने पावन करून घेण्यात आले आहे. खरेच, काँग्रेसचे काम नेहरू-गांधी परिवाराच्या नेतृत्वाशिवाय चालूच शकत नाही? गेल्या ५० वर्षांत केवळ दाेन वेळा काँग्रेसचे नेतृत्व नेहरू-गांधी परिवाराशिवाय अन्य व्यक्तींनी केले. नेमका हा काळ अस्थिरता आणि अराजकाने ग्रासलेला हाेता. नरसिंह राव यांनी भलेही १९९१ आणि १९९६ या दरम्यान यशस्वीपणे अल्पमतातील सरकार चालवले असले तरी या काळात पक्षाचा ऱ्हास झाला तसेच पक्षात फूटदेखील पडली. राव यांच्या पश्चात सीताराम केसरी पक्षाध्यक्ष बनले, मात्र कधीही कामचलाऊ व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केले नाही. 


त्यानंतर साेनिया गांधींचे साम्राज्य सुरू झाले, सर्वाधिक काळ त्या काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष राहिल्या. परंतु, साेनिया गांधींच्या नेतृत्वाने १९ वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेसचे भाग्य खराेखरीच बदलले का? एक मात्र खरे की, राजकीय चातुर्याचा खुबीने वापर करत आघाडीचे राजकीय पर्व सुरू करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. ज्या शरद पवारांनी साेनिया गांधींच्या विदेशी वंशाच्या मुद्द्यावर आक्षेप घेतला हाेता, त्याच शरद पवार यांच्यासारख्या नेत्याशीदेखील त्यांनी आघाडी केली. साेनिया गांधी यांना आपल्या बलस्थानाच्या मर्यादादेखील ज्ञात हाेत्या, हीच त्यांची खरी ताकद हाेती. एक लाेकनेता म्हणून आणि मते मिळवण्याच्या क्षमतेला असलेल्या मर्यादा त्या आेळखून हाेत्या, म्हणूनच त्याची भरपाई करण्याच्या पर्यायी मार्गाचा व्यवहार्य विचार करण्याला त्यांनी प्राधान्य दिले.


 परंतु, साेनिया गांधींनी काँग्रेसला निवडणूक लढवणारी एक यशस्वी मशीन बनवली का? तर असे म्हणता येणार नाही. १९९९ मध्ये पहिल्यांदा लाेकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व करत ११४ जागा जिंकल्यानंतर २०१४ मध्ये अवघ्या ४४ जागा जिंकण्यापर्यंतच्या काळात साेनिया गांधी काँग्रेसचा ऱ्हास थाेपवू शकल्या नाहीत. अपवाद ठरला ताे २००९ चा. भाजपने लालकृष्ण अडवाणींना प्राेजेक्ट करण्याची चुकीची रणनीती निवडली त्याचा फायदा या वेळी काँग्रेसला मिळाला. नेमके याच काळात भारत-अमेरिका अणुकराराच्या मुद्द्यावर करारीपणा दाखवल्याबद्दल मनमाेहन सिंगांच्या प्रतिमेला बळ मिळाले हाेते. तीन दशकांपेक्षाही अधिक काळ सतत काँग्रेसचे पतन हाेत राहिले. वस्तुत: १९८०च्या मध्यातच पक्षाला घरघर लागली असती, मात्र १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची दुर्दैवी हत्या झाली आणि सहानुभूतीच्या लाटेचा काँग्रेसला फायदा झाला. वैचारिक पतन, यथास्थितीवादी नेतृत्व, संघटनात्मक एकवाक्यतेचा अभाव तसेच हायकमांड संस्कृती आणि निरुत्साही कार्यकर्त्यांमधील फुटीरवाद काँग्रेसच्या अध:पतनाला कारणीभूत ठरला. या पतनासाेबतच पक्षाचा पहिला सामना वाजपेयी-अडवाणी यांच्या प्रभावी हिंदुत्वाने भारलेल्या भाजपशी आणि आता माेदी-शहांच्या अजेय निवडणूक मशीनशी झाला. परिणामी काँग्रेसचे राजकीय पतन अधिक गडद झाले.


२०१४ च्या विद्ध्वंसातून काँग्रेसला बाहेर काढण्यात राहुल गांधी सक्षम ठरले आहेत का? की घराणेशाहीमुळे शीर्षस्थानी आल्यामुळे तेच या समस्येचे मूळ ठरले आहेत.? कारण काँग्रेस अध्यक्षपदाच्या रूपातील राहुल गांधी यांच्या उपस्थितीने माेदींच्या प्रचार यंत्रणेला ‘कामदार विरुद्ध नामदार’ अशी टाेकदार टक्कर दिली. २०१९ च्या निवडणुकीतील प्रतिमा काही वेगळीच दिसली. राहुल गांधी अमेठीत उमेदवारी अर्ज भरावयास गेले तेव्हा साेबत प्रियंका गांधी, राॅबर्ट वाड्रा आणि त्यांची मुले हाेती. स्वातंत्र्य लढ्यातील पक्ष आता एका कुटुंबापुरता मर्यादित झाला आहे, त्याचीच ही साक्ष ठरावी.


तरीही काँग्रेस स्वत:ची आेळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे. काँग्रेस पक्षातील सरंजामशाही शैली बदलावी लागेल, सत्ता आणि बचावात्मक पवित्रा घेण्यामुळे अधिक मजबूत आणि लाेकशाहीवादी संघटना बनण्यात ती अयशस्वी ठरली. या पक्षात वारसापेक्षाही क्षमतेला अधिक वाव देण्याची गरज आहे.


महाराष्ट्रात शरद पवार, बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि आणि आंध्र प्रदेशात जगन रेड्डी अशा प्रादेशिक नेत्यांची माेठी यादी आहे, जे ‘मदर ब्रँड’पासून बाहेर पडल्यानंतरही बहरत राहिले. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला महाराष्ट्र आता भाजपकडे कलू लागला आहे. इथेच ते नव्या प्रयाेगाची सुरुवात करू शकतात. महाराष्ट्रात आॅक्टाेबरच्या सुुमारास निवडणुका हाेऊ जात आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी १०० दिवसांची पदयात्रा करून शेतकऱ्यांशी, दुष्काळग्रस्तांशी संवाद साधला पाहिजे. इथे लक्षात घेण्याची बाब म्हणजे ३५०० किमीच्या पदयात्रेने जगन रेड्डींची राजकीय कारकीर्द नाट्यमयरीत्या बदलली हाेती. काय, राहुल गांधी असे आव्हान पेलू शकतील?