आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खांद्याच्या दुखापतीनंतरही अबाधित ठेवले किताबावरचे वर्चस्व; सीनियर नॅशनल स्पर्धेत सलग सात सुवर्णपदके जिंकणारा राहुल एकमेव मल्ल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राष्ट्रकुल चॅम्पियन मल्ल राहुल आवारेने खांद्याच्या गंभीर दुखापतीनंतरही किताबावरचे आपले वर्चस्व अबाधित ठेवण्याचा पराक्रम गाजवला. त्याने 73 व्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सलग सातव्या सुवर्णपदकाची कमाई केली. यासह तो सीनियर नॅशनल स्पर्धेत सलग सात सुवर्णपदकांची कमाई करणारा पहिला मल्ल ठरला. त्याने आता या राष्ट्रीय स्पर्धेतील 61 किलो वजन गटाच्या फ्री स्टाइलमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याने या गटाच्या फायनलमध्ये गोव्याच्या नितीनचा पराभव केला. राहुलने आपल्या खास शैलीदार खेळीच्या बळावर 10-0 ने अंतिम सामना जिंकला. यासह तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याने शेवटच्या क्षणापर्यंत आपले वर्चस्व अबाधित ठेवताना हा सोनेरी यशाचा पल्ला यशस्वीपणे गाठला. सात किताब आपल्या नावे करताना महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये ऐतिहासिक यश संपादन केले. या गटात त्याने यूपीसह गोव्याच्या मल्लांचे आव्हान संपुष्टात आणून हे या विक्रमाला गवसणी घातली.


- महाराष्ट्राच्या या प्रतिभावंत मल्लाने 2000 मध्ये पहिल्यांदा या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. सोनेरी यशानंतर त्याने स्पर्धेत किताब जिंकण्याची मोहिम अबाधित ठेवली. यातूनच त्याला सात पदके जिंकता आली. तो 2015 मध्ये सहभागी झाला नव्हता. 
- महाराष्ट्राचा प्रतिभावंत कुस्तीपटू राहुल आवारेने खांद्याच्या दुखापतीवर मात करून रविवारी सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्याचे फ्री स्टाइल प्रकारातील या स्पर्धेचे हे सातवे सुवर्णपदक ठरले. अशा प्रकारे सात सुवर्णपदके जिंकणारा राहुल हा एकमेव मल्ल ठरला. पुरुषांच्या फ्री स्टाइल गटामध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे. त्याचे या स्पर्धेतील हे सातवे सुवर्णपदक ठरले. 


सिकंदरला सुवर्ण; अभिजितला रौप्य, महाराष्ट्र संघ पाचव्या स्थानावर 
उत्तर प्रदेशातील नंदिनीनगर येथे ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मल्लांनी बाजी मारली. त्यामुळे महाराष्ट्राला या स्पर्धेत एकूण 10 पदकांची कमाई करता आली. यामध्ये चार सुवर्णसह प्रत्येकी तीन रौप्य आणि कांस्यपदकांचा समावेश आहे. राहुल आवारे आणि सिकंदरने पुरुष गटात सुवर्णपदके जिंकली. तर महिला गटात कोमल गोळे (73 किलो) आणि अंकिता गुंडने (60 किलो) सुवर्णपदकाची कमाई केली. या दोघींनी महिला गटाचे सामने गाजवले. तसेच स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी रविवारी अभिजित कटकेसह कौतुक डफळे यांनी रौप्यपदक पटकावले. तसेच नामदेव कोकाटेने कांस्यपदक जिंकून स्पर्धेचा शेवट गोड केला. या स्पर्धेत रेल्वेचा संघ चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला. या टीमने सर्वाधिक पाच सुवर्णपदके जिंकली आहेत. 


ऑलिम्पिक प्रवेशाची संधी आता सप्टेंबरमध्ये; एशियन चॅम्पियनशिपच्या आखाड्यातही उतरणार 
राष्ट्रीय स्पर्धेतील आपले वर्चस्व अबाधित ठेवल्याने आता माझा ऑलिम्पिक प्रवेशासाठीचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. मला याची मोठी संधीही आता पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये आहे. यादरम्यान चीनमधील बींजिग येथे 2019 च्या सप्टेंबरमध्ये जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप होणार आहे. या स्पर्धेमधून 2020 टोक्यो ऑलिम्पिकमधील आपला प्रवेश निश्चित करण्याची संधी आहे. यामध्ये ऑलिम्पिकचा कोटा आहे. त्यामुळे या जागतिक स्तरावरील स्पर्धेच्या खास तयारीसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबिर होणार आहे. जानेवारीत होणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरासाठी राहुल पात्र ठरला आहे. येथील तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि सरावातून त्याला जागतिक स्पर्धेची तयारी करता येईल. तसेच तो पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये एशियन कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार आहे. यासाठीच्या तयारीला आता तो पुढच्या महिन्यात सुरुवात करणार आहे. या स्पर्धेतही आता सोनेरी यशाचा पल्ला गाठण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्याने 'दिव्य मराठी' शी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...