आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चळवळींच्या आत्म्याचा आवाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘क्वीन आॅफ सोल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरीथा फ्रँकलिन यांचे गेल्या आठवड्यात अमेरिकेत निधन झाले. आपल्या ७६ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी साठहून अधिक वर्षं कलेची सेवा केली. आपल्या गाण्याने केवळ मनोरंजन न करता रसिकांच्या आत्म्याला थेट हात घालणाऱ्या आणि त्यातून समाजाला कायमचं बदलून टाकणाऱ्या या गायिकेला आदरांजली वाहणारी ही कव्हर स्टोरी.


ज्या आधुनिक जगात आपण जगतो आहोत त्यातल्या बहुतांश साहित्यिक, वैचारिक आणि मानवतावादी चळवळीची पाळेमुळे अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरात १९६७ साली घडून आलेल्या विचारक्रांतीपर्यंत जातात. या एका वर्षाने सबंध जगाचा इतिहास अंतर्बाह्य बदलून टाकला. या काळात प्रसवले गेलेले संगीत, फॅशनच्या तऱ्हा, चळवळी आणि विचारपद्धतीचे परिणाम आजही आपल्या आसपास कुठे न कुठे पाहायला मिळतात. यातल्या बहुतांश गोष्टी लोकांच्या जगण्याचा मुख्य भाग बनल्या असल्या तरी या गोष्टींची सुरुवात नेमकी कुठे झाली आणि त्यात कुठले लोक सहभागी होते याबाबत आपण बऱ्याचदा अनभिज्ञ असतो. १९६७ साली अमेरिकेने व्हिएतनामविरुद्ध पुकारलेल्या युद्धाला १० वर्षांहून अधिक काळ झाला होता, जॉन एफ केनडी यांनी अमेरिकेचे पस्तिसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती, अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्त्रिया, कृष्णवर्णीय आणि अठरा वर्षांवरील कुठल्याही नागरिकाला मतदानाचा समान अधिकार मिळाला होता. या कायद्यानंतर तिथल्या वर्णवर्चस्ववादी आणि पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रिया आणि कृष्णवर्णीयांविरोधात बराच असंतोष खदखदत होता. दरम्यान याअगोदर कुठलीही स्वतंत्र ओळख नसणाऱ्या स्त्रियांना आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची पहिल्यांदाच जाणीव होत होती. परिवर्तनाचे एक नवे वारे अमेरिकेत वाहू लागले होते आणि या परिवर्तनाच्या अग्रभागी ‘द बीटल्स’ ‘पिंक फ्लॉइड’ ‘जेफरसन एअरप्लेन’ यांसारखे म्युझिक बँड्स तर जॉन लेनन, पॉल मकार्टनी, बॉब डिलन यांसारख्या गायकांचे संगीत होते. त्यांनी रचलेली नव्या युगाची गाणी स्वातंत्र्याचा विचार करणाऱ्या प्रत्येक मनात आतमध्ये खोल कुठेतरी अस्तित्वाच्या जाणिवांना आव्हाने देत होती. 


इंटरनेट वा मोबाइलचा शोध लागण्याअगोदरच्या  या काळात एकमेकांना प्रत्यक्ष भेटून सोबत गप्पाटप्पा, वैचारिक आदानप्रदान आणि काहीतरी नविन सृजनात्मक काम करण्यावर लोकांचा भर असे. युवा पिढीची भावनिक गुंतागुंत, चूल आणि मूल या जबाबदाऱ्या सांभाळून चार पैसे कमावण्यासाठी मिळेल ते काम करणारा गृहिणीवर्ग, आणि मूलभूत हक्कासांठी लढा देणाऱ्या कृष्णवर्णीय समाजासमोर नवी वैचारिक आव्हाने उभी राहात होती. या सर्वांना समाजातून मिळणारी दुय्यम स्वरूपाची वागणूक त्यांना अस्वस्थ करीत होती. याच काळात अमेरिकेत अनेक भूमिगत वृत्तपत्रे छापली जात होती ज्यांचे स्वरूप काहीसे आजच्या व्हॉट्सअॅप चळवळींसारखे होते. आज भारतातल्या व्हॉटसअॅपमधून खोटी माहिती व राजकीय संदेश वजा केल्यास मागे उरणारा वैचारिक आशय हा त्या काळच्या भूमिगत वृत्तपत्रांशी बराचसा मिळताजुळता आहे. या भूमिगत वृत्तपत्रांमधून अनेक नवे सामाजिक विचार मांडले जात होते. प्रस्थापित कला, संगीत व रूढीपरंपरांना आव्हान दिले जात होते. अशातच काही तरुण विचारवंतांनी ‘सॅन फ्रान्सिस्को ऑरेक’ या वृत्तपत्रातून विद्रोही विचार करणाऱ्या तरुणांना चौदा जानेवारी रोजी सॅन फ्रान्सिस्को गोल्डन गेट उद्यानात जमा होण्यास सांगितले. ह्यूमन बी इन (माणसांनो एकत्र व्हा) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सभेला वीस हजारांहून जास्त लोकांनी हजेरी लावली. इथे जमलेल्या या समूहाने इथून पुढे कामाच्या ठिकाणी, शाळाकॉलेजमध्ये  कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये, केवळ सत्तेला गैरसोयीचे म्हणून कुठल्याही विचारांवर दडपशाही लादली जाऊ नये आणि विशिष्ट धार्मिक शिकवणुकीपासून मुक्तता मिळवून अधिकाधिक मानवतावादी समाजरचनेसाठी प्रयत्न करावे, असा ठराव पास केला.


‘ह्यूमन बी इन’च्या या सार्वजनिक संमेलनानंतर अमेरिकेतले कृष्णवर्णीय, युवक व स्त्रीवाद्यांची स्वप्ने, आशाआकांक्षा आणि राजकीय मतधारणा त्यांच्या डोक्यात निरनिराळी भावनिक आंदोलने निर्माण करू लागल्या. आपल्याला आयुष्याकडून खूप काही हवे आहे, पण ते मिळवण्याची सुरुवात नेमकी कुठून करावी? आपल्या आकाक्षांपूर्तीची पहिली पायरी काय असावी, याबद्दल कुणामध्येही एकमत होत नव्हते. अनेक लोक भावनिकदृष्ट्या अस्वस्थ तर होते पण त्यांच्या सुखाचा शोध कुठून सुरू होतो हे मात्र कुणालाही समजत नव्हते. अशातच मार्च महिन्याच्या दहा तारखेला अटलांटिक रेकॉर्डसतर्फे ‘आय नेव्हर लव्हड अ मॅन द वे आय लव्ह यू’ नावाचा एक म्युझिक अल्बम बाजारात आला. या अल्बममधले ‘रिस्पेक्ट’ नावाचे गाणे आठवड्याभरातच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले. या गाण्याचा आशय तसा थेट होता. एक स्त्री एका पुरुषाला त्याने आपला ‘रिस्पेक्ट’ करावा असे सांगत होती. ‘राजा, तुला जे हवंय ते ते मी सगळं करतेय, तुला काय हवंय, ते मी पुढेही करीन पण त्याची जरा कदर कर. तू कामावरून घरी येतोस तेव्हा मला जरा समजावून घे, तू कामावर गेला होतास तेंव्हा तुझ्यापाठीमागे मी चकाट्या पिटत नव्हते किंवा काही उलटेसुलटे काम करीत नव्हते. मी कमावलेले सगळे पैसे मी तुला देते आणि बदल्यात फक्त इतके मागते की तू जरा माझी कदर कर,’ असा काहीसा या गाण्याचा आशय होता. ‘जस्ट अ लिटल बिट ऑफ रिस्पेक्ट’ म्हणजेच जरा थोडी कदर करा ही तशी लहानच पण महत्त्वाची मागणी चळवळीतल्या असंख्य लोकांच्या प्रश्नांभोवती येऊन थांबली. अतिशय कमी कालावधीत हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आणि आजही ते इंग्रजी रेडीओवर कुठे न कुठे ऐकू येत असतंच. साधारण पन्नास इंग्रजी चित्रपट पाहिलेल्या कुठल्याही माणसाने हे गाणं कुठल्या तरी सिनेमात ऐकलेलंच असतं. हे गाणं प्रत्येकाच्या सवयीचं असलं तरी त्याची गायिका प्रत्येकाला माहीत असेल असं नाही. त्या गायिकेचे नाव होते अरीथा फ्रँकलिन.


अरीथा फ्रँकलिनचा जन्म २५ मार्च १९४२ रोजी मेम्फिस शहरात रहाणाऱ्या एका कृष्णवर्णीय कुटुंबामध्ये झाला. त्या काळातल्या कुठल्याही कृष्णवर्णीयांच्या वाट्याला येणारी तिरस्काराची वागणूक तिच्या कुटुंबालाही मिळाली परंतु तिचे वडील चर्चमध्ये गाणी गात असल्याने त्यांची आर्थिक स्थिती मात्र तितकीशी वाईट नव्हती. कृष्णवर्णीय म्हणून अरीथाला बाह्यसमस्यांमधून जावे लागले तसे कृष्णवर्णीयांच्या अंतर्गत समस्यांशीही सामना करावा लागला ज्यात तिच्या वडलांनी अगदी सहजपणे बाहेरख्यालीपणा करणे आणि अरीथाच्या आईशी वरचेवर भांडणे करण्याचा समावेश होता. अरीथा दोन वर्षांची असतांना तिच्या कुटुंबाने न्यूयॉर्कला स्थलांतर केले, तर ती पाच वर्षांची असताना न्यूयॉर्कमधून मिशिगन राज्यातल्या डेट्रॉइट शहरात ते कायमचे स्थलांतरित झाले. अरीथा दहा वर्षांची असतांना तिच्या आईवडलांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर अरीथाला वडलांकडे सोडून तिची आई न्यूयॉर्कला परत गेली. इथपावेतो अरीथाचे आयुष्य खडतर म्हणावे तर वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी अरीथाला तिच्या बॉयफ्रेंडपासून मूल झाले आणि वयाच्या तेराव्या वर्षी ती पुन्हा गर्भवती राहिली. समांतर काळात तिच्या वडलांचे गाण्याचे करिअर जोरात असल्याने त्यांनी अरीथासाठी धार्मिक गाणी गाण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या, ज्यात अरीथाने बरेच नाव कमावले. वेगवेगळ्या चर्चेसमध्ये धार्मिक गाणी गाऊन ती अजून बराच पैसा कमावू शकत होती पण वयाच्या अठराव्या वर्षी तिने सेक्युलर करिअर करायचं ठरवलं आणि त्यानंतर तिने क्वचित आध्यात्मिक वा धार्मिक गाणी गायली असली तरी आपली कला कुठल्या एक विचारधारेवर केंद्रित केली नाही. सर्वसहभागातून एका चांगल्या समाजाची निर्मिती केली जाऊ शकते आणि कलेला वा स्वतःलादेखील फक्त धर्मापुरते मर्यादित न ठेवता माणसाने वैश्विक पातळीवर काम करायला हवे, यावर तिचा विश्वास होता. नवे जग रचण्याच्या या प्रेरणेतूनच ‘रिस्पेक्ट’ गाण्याचा जन्म झाला ज्याने पुढे जाऊन समग्र जगाच्या चळवळीचा इतिहास बदलून टाकला.


‘रिस्पेक्ट’ या अडीच मिनिटांच्या या गाण्याने इतके दिवस विचारांत पडलेल्या स्त्रियांना एकदमच त्यांचे लक्ष्य दिले. आपल्या ध्येय व आकांक्षापूर्तीच्या अगोदर आपल्याला मूलभूत सन्मान मिळणे गरजेचे आहे ही गोष्ट स्त्रियांना अगदी पटकन कळून आली. सार्वजनिक मताधिकाराच्या कायद्यानंतरही अमेरिकेतली कुटुंबव्यवस्था पुरुषसत्ताक मानसिकतेतून पुरती बाहेर यायला तयार नव्हती. त्या काळी ‘स्त्रिया कामावर गेल्यास घराकडे कुणी पाहायचे?’ अशी धारणा असल्याने उद्योग आणि व्यावसायिक जगतात स्त्रियांचा सहभाग नगण्य होता. याअगोदर झालेल्या स्त्रीवादी क्रांतीमुळे स्त्रियांना किमान माणूस म्हणून जगण्याचे, मतदानाचे आणि संपत्तीजतनाचे अधिकार दिले होते. या मूलभूत अधिकारानंतर पुढच्या टप्प्यातले कुठले अधिकार स्त्रियांनी मिळवावेत आणि ते कसे मिळविता येतील, याबद्दल मात्र स्त्रीवादी चळवळ बरीचशी साशंक होती. सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याची सुरुवात ‘रिस्पेक्ट’पासून होणार होती. या एका गाण्याने मुख्य धारेतल्या स्त्रीवादी चळवळीला नवी दिशा दिली. आदर मिळवण्याच्या मुख्य पायरीनंतर घरगुती भांडणातून होणारी मारहाण, नवऱ्याने जोरजबरदस्तीने केलेले शारीरिक संबंध, कामाच्या ठिकाणी स्त्रियांचे केले जाणारे शोषण, शरीरसंबंधांचे स्वातंत्र्य, मुले जन्माला घालण्याचा वा न घालण्याचा अधिकार, कामाच्या ठिकाणी सराईतपणे केला जाणारा भेदभाव या मुख्य प्रश्नांभोवती स्त्रीवादी चळवळ एकजूट झाली. लवकरच या विचारांनी जगभरातल्या इतर स्त्रीवादी चळवळींनाही आकर्षित केले आणि स्त्रीस्वातंत्र्याच्या चळवळीचे दुसरे महत्त्वाचे पर्व जगभर सुरू झाले. या गाण्याने स्त्रीवाद्यांना जसा आपल्या चळवळीचा मुख्य उद्देश सापडला तसाच तो कृष्णवर्णीयांच्या लढ्यालाही सापडला. समान नागरिकतेच्या लढ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आवश्यक होती ती गौरवर्णीयांनी कृष्णवर्णीयांना आदराने वागविण्याची. आत्मसन्मान मिळवण्याचा हा एक उद्देश सफल झाल्याशिवाय क्रांतीचे पुढचे चक्र फिरणे अशक्य आहे हे कृष्णवर्णीयांच्या चळवळीला पुरते कळून चुकले. स्त्रीवाद्यांसाठी आणि कृष्णवर्णीयांसाठी ‘रिस्पेक्ट’ हे गाणे राष्ट्रगीताइतके पवित्र बनले.


मुख्य धारेतल्या या दोन चळवळीच्या व्यतिरिक्त अॅरीथाच्या गाण्यांनी ‘ह्यूमन बी इन’ चळवळीवरही प्रचंड महत्त्वाची छाप सोडली. गोल्डन गेटच्या सभेनंतर उन्हाळ्याच्या जून आणि जुलै महिन्यात सॅन फ्रान्सिस्को शहरात सुमारे एक लाख नवयुवक जमा झाले. या युवकांच्या खिशात एक दमडीही नव्हती. याच्यात्याच्याकडे लिफ्ट मागत वा पायी चालत आणि लोकांनी मदत दिलेले अन्न खाऊन हे लोक या शहरात पोहचले होते. जग पैशाविनाही चालू शकते असा दुर्दम्य आशावाद यातल्या काहींना होता. घर सोडून आलेल्या या एक लाख युवकांमध्ये पस्तीस हजारांहून अधिक तरुणींचाही समावेश होता. भांडकुदळ आईबापांना कंटाळून, दारुड्या बापाच्या मारापासून वाचण्यासाठी, पैशामागे धावणाऱ्या दुनियेतून दूर जाण्यासाठी, आपल्या बॉयफ्रेंडचा शारीरिक सहवास मिळवण्यासाठी किंवा मग लग्नाच्या कटकटीत न पडता हवा तसा सेक्स मिळविण्यासाठी या हजारो मुलींनी आपले घर सोडले होते. तोपर्यंत ‘मुलगी पळून जाणे’ म्हणजे काय हे जगाला माहीत नव्हते. संकुचित समाजात प्रेम मिळवण्याच्या सर्व कथांचा अंत हा नायकनायिकांच्या ताटातुटीत वा त्यांच्या मृत्यूत होत असे. सॅन फ्रान्सिस्कोच्या विचारक्रांतीने प्रथमच स्त्रियांना प्रेम मिळवण्याचा आणि लैंगिक स्वातंत्र्यावर त्यांचाही हक्क असल्याची जाणीव करून दिली.


रिस्पेक्ट गाण्यापासून प्रेरणा घेऊन जगभरात सुरू झालेले स्त्रीस्वातंत्र्याचे आंदोलन नव्वदच्या दशकानंतर तिसऱ्या आवर्तनात प्रवेश करून आता संपूर्ण स्त्रीमुक्तीच्या अधिकारासाठी लढते आहे. कृष्णवर्णीयांच्या व्यापक लढ्याच्या यशांमधून बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले अश्वेत राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर कृष्णवर्णीयांचा लढा आता पूर्ण समानतेच्या मागणीपर्यंत येऊन पोहचला आहे. सॅन फ्रान्सिस्कोत सुरू झालेल्या हिप्पी चळवळींपासून प्रेरणा घेऊन स्थापन झालेली अॅपल ही जगातली सर्वात श्रीमंत कंपनी बनली आहे. ही चळवळ आज लयास गेलेली असली तरी तिच्या पोटातून निघालेल्या अनेक चळवळी आज मुख्य धारेत काम करून अधिक चांगले जग घडविण्यासाठी झटत आहेत. जग बदलण्याच्या या व्यापक प्रक्रियेत सर्वात अग्रस्थानी असलेल्या अरीथा फ्रँकलिन यांचे गेल्या आठवड्यात वयाच्या शहात्तराव्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. आपल्या शहात्तर वर्षाच्या आयुष्यात त्यांनी साठहून अधिक वर्षे कलेची सेवा केली. असे म्हणतात की, त्यांचा आवाज थेट हृदयाला भिडणारा होता आणि असा आवाज भिडण्यापूर्वी त्या हृदयात आणखी काही विचार चालू असतील तर त्यांना प्रेरणा देणारा होता. एका अर्थाने अॅरीथा फ्रँकलिन यांच्या गाण्याने केवळ मनोरंजन न करता रसिकांच्या आत्म्याला थेट हात घातला आणि त्यातून समाज कायमचा बदलून गेला. आपल्या आवाजाने जग बदलून टाकणाऱ्या या महान स्त्रीला आदरांजली.

-  राहुल बनसोडे, नाशिक
rahulbaba@gmail.com

बातम्या आणखी आहेत...