लैंगिक स्वातंत्र्याचा भारतीय / लैंगिक स्वातंत्र्याचा भारतीय इतिहास

Dec 14,2018 02:19:00 PM IST

स्त्री-पुरुष समागम ही प्रजोत्पादनाच्या उद्देशाने घडून येणारी क्रिया. परंतु, या क्रियेपलीकडे जाऊन लैंगिकता आणि लैंगिक सुखाच्या कल्पनेनेही माणसाचे जगणे व्यापलेले आहे. अर्थात, लैंगिक सुख हेच आणि एवढेच माणसाचे जगणे नसले तरीही ते टाळून जगण्यालाही पूर्णत्व नाही, या विचारांतून खरं तर लैंगिक स्वातंत्र्याच्या, ‘सेक्शुअल फ्रीडम’च्या संकल्पनेची रूजवात झाली. या संकल्पनेवर सामाजिक-सांस्कृतिक आर्थिक घटकांचाही प्रारंभापासून प्रभाव राहिला. किंबहुना इतिहासाच्या अनेक टप्प्यावर शासन आणि बाजार सत्तांनी, सामाजिक-सांस्कृतिक परंपरांनी लैंगिक स्वातंत्र्याच्या चौकटी विस्तारल्या प्रसंगी त्या आक्रसवल्यादेखील. पण या संघर्षातूनच त्या-त्या काळात केवळ लैंगिक स्वातंत्र्याचाच नव्हे तर भारतीय समाजाच्या आत्मिक आणि ऐहिक प्रगतीचाही इितहास आकारास येत गेला...

‘सेक्स फ्रीडम' वा लैंगिक स्वातंत्र्य हा विषय मुख्यधारेतल्या सार्वजनिक चर्चेत असणे, हे प्रगत समाजाचे लक्षण आहे. अर्थात, सेक्सविषयी खुलेपणाने विचार आणि चर्चा करण्याइतपत वैयक्तिक स्वातंत्र्य जसे गरजेचे आहे, तसे सामाजिक स्वातंत्र्यही गरजेचे आहे, आणि या दोन्ही स्वातंत्र्याच्या व्याख्यांच्या मुळाशी आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य आहे. सेक्सचा उद्देश केवळ प्रजननापुरता न रहाता, त्याचे मनोरंजनात्मक, सामाजिक आणि अध्यात्मिक आयाम शोधण्यासाठी एखाद्या संस्कृतीचा आर्थिक आणि सामाजिक इतिहास शोधणेही गरजेचे आहे.
पृथ्वीवर जीवन अस्तित्वात येऊन तीन अब्जांहूनही अधिक काळ लोटला असला तरी या ग्रहावर आधुनिक माणसाचा इतिहास हा अवघा दोन लाख वर्षांचा आहे. या दोन लाख वर्षांत नव्वद टक्क्यांहून अधिक काळ माणसाची सेक्शुअ‍ॅलिटी पृथ्वीवरच्या इतर प्राण्यांच्या सेक्शुअ‍ॅलिटीपेक्षा फारशी वेगळी राहिलेली नाही. यातल्या अलिकडच्या चाळीस हजार वर्षांत काही ठिकाणी सेक्सचा विचार प्रजोत्पनापलिकडे झाला असला, तरी जंगल आणि डोंगरकपारीतल्या टोळी जीवनपद्धतीमध्ये सेक्सचे बहुविध आयाम शोधणे, माणसाला शक्य झाले नव्हते. सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागल्यानंतर मात्र ही परिस्थिती बरीचशी बदलू लागली. जंगलातले भटके आयुष्य सोडून मानवप्राणी एकाच जागी वस्ती करून राहू लागला. ज्या वस्तीतून पुढे त्याचे लैंगिक व्यवहार बदलत गेले. त्याला निरनिराळे आयाम प्राप्त होऊ लागले. शेतीच्या शोधाने शोषणाची व्यवस्था जन्माला घातली, तशी व्यापक संस्कृतीही जन्माला घातली. ‘सिव्हिलायझेशन’ या इंग्रजी शब्दाला सभ्यता हा मराठी शब्द योजल्यास या सभ्यतेच्या सेक्शुअ‍ॅलिटीचा म्हणजेच लैंगिकतेचा इतिहास शोधताना हाती लागणारी तथ्ये ही माणसाच्या आत्मशोधासाठी आणि क्वचित अध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीही उपयोगाची ठरतात.


भारतीय सभ्यता आणि लैंगिकता
शेतीच्या प्रारंभिक शोधानंतर साडेचार ते पाच हजार वर्षांपूर्वी सुमेरियन, इजिप्शियन आणि इंडस (सिंधू) सभ्यतेचा उदय झाला. परस्पर समांतर काळात विकसित झालेल्या या सभ्यतांमध्ये बहुविध समाजरचनेतून आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक शांतता साधली गेल्याचे पुरावे मिळतात. या स्थिर, शांत आणि प्रगतिकारक वातावरणात साहित्य, संगीत आणि चित्र-शिल्प कला मोठ्या प्रमाणावर विकसित झाली. अर्थात अलिकडे उत्खननात सापडलेल्या अनेक शिल्पांच्या अवशेषांमधून, आणि भूर्जपत्रांवर लिहिलेल्या शब्दांवरुन त्या काळातल्या सेक्सविषयीच्या धारणांची आपल्याला थोडीफार कल्पना येत असली तरी, सेक्शुअ‍ॅलिटीबद्दल या तीनही सभ्यतांमध्ये गरजेपेक्षा जास्त विचार केला गेला नव्हता, असेही दिसून येते. मात्र, पुढे जाऊन सभ्यतेच्या इतिहासात सेक्सविषयी सर्वांगाने विचार करुन त्याचे प्रतिबिंब साहित्य, संगीत आणि कलांमध्ये सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय निर्विवादपणे भारताकडे जाते. इंडस सभ्यतेच्या पडझडीनंतरच्या काळात गतसंस्कृतीतून महत्त्वाचे धडे घेऊन नव्याने उभ्या राहिलेल्या भारतीय सभ्यतांनी, सेक्सला संस्कृतीच्या केंद्रस्थानी ठेवले. हे जग नेमके कसे अस्तित्वात आले असावे, या कळीच्या प्रश्नाचा वेध घेताना, त्याच्या मुळाशी भारतीय सभ्यतांनी योनी आणि लिंगाची उपयोजना केली. कुठल्याही जिवंत गोष्टीच्या मुळाशी समागम असतो, हे मूलतत्व त्यामागे होते. भारतीय सभ्यतांनी सेक्सला निषिद्ध वा चोरुन लपून करण्याची गोष्ट न ठेवता, तिचा खुलेपणाने स्वीकार करून सबंध संस्कृतीची मोटच सेक्सभोवती बांधली असण्याची शक्यताही इथेच आकारास येते.


इंडस संस्कृतीच्या पश्चात उभ्या राहिलेल्या सभ्यतांनी धातूंपासून अवजारे बनविण्यात मोठ्या प्रमाणात प्रगती केली ज्याचा उपयोग शेतीचे उत्पादन वाढविण्यात झाला. या उत्पादनांचे रक्षण करण्यासाठी मग शस्त्रांची निर्मिती झाली. गरजेपेक्षा वाढीव उत्पादन आणि युद्धकलेतल्या कौशल्यामुळे, केवळ काही माणसांच्या हाती सुरक्षेचे काम देऊन सैन्यांची निर्मिती झाली. या सैन्यांवर नियंत्रण ठेवणारी राजकीय पद्धतही अस्तित्वात आली. ज्यामुळे शेतीत प्रत्यक्ष सहभाग न घेणाऱ्या अभिजन वर्गाची निर्मिती झाली. या पद्धतीत माणसांचे कौशल्यानुसार वर्गीकरण होऊन युद्धशास्त्र, अवजार निर्मितींसह उत्पादनांच्या अनेक प्रक्रियांची सुरुवात झाली. उत्पादनांच्या या विविध प्रक्रियांचा वापर करून तत्कालिन नगराची निर्मिती करणे शक्य झाले. इंडस संस्कृतीप्रमाणे इथेही नगररचनाशास्त्र विकसित होऊ लागले, उत्पादनामुळे नगर मोठे होणे आणि मोठ्या झालेल्या नगरात उत्पादन वाढल्याने त्यातून आणखी नगरांचा विस्तार होणे, या निरंतर भासणाऱ्या प्रक्रियेची सुरुवातही इथेच झाली. ज्यातून पुढे अनेक साम्राज्यांचा उदय होऊ लागला.


लैंगिकतेच्या बदलत्या व्याख्या
साम्राज्यनिर्मितीची ही प्रक्रिया विस्मयकारी वाटत असली, तरी तिच्या मुळाशी एका मोठ्या लोकसंख्येचे कष्टप्रद जीवन होते. साम्राज्याचा डोलारा ज्या कष्टकऱ्यांच्या खांद्यावर उभा असतो, त्यांच्या दैनंदिन जीवनाची माहिती साधीसोपी आणि अस्मिताविहीन असल्याने, ती जाणून घेण्यात समाजाला फारसा रस नसतो, याशिवाय या माहितीचे संकलन करण्यासाठी साम्राज्यातला सत्ताधारी वर्गही फारसा अनुकूल नसतो. प्राचीन नगररचना शास्त्र आणि साम्राज्यात वर्गव्यवस्था अस्तित्वात असली तरी ती थेट गरीब आणि श्रीमंत यामध्ये विभागली न जाता, ऐपती आणि क्रयशक्तीनुसार तिच्यात बऱ्याच पायऱ्या होत्या. पूर्ण श्रीमंत आणि पूर्ण गरीब यांच्या अधेमधे असलेल्या या वर्गाला ‘मध्यमवर्ग’ असे म्हणता येईल. या मध्यमवर्गात जगणाऱ्या लोकांना ‘सभ्य नागरिक' किंवा ‘सामान्य नागरिक' असे संबोधता येईल.
इतिहासातल्या माणसाच्या सेक्शुअ‍ॅलिटीचा अभ्यास करण्यास उपलब्ध असणारी चित्रे आणि शिल्पे ही बहुतांशी राजेमहाराजे वा सरंजमदारी असल्याने तो तत्कालिन समग्र समाजाच्या कामजीवनाचा दस्तावेज नक्कीच असू शकत नाही. भारतीय इतिहासातील सामान्य माणसाच्या (पक्षी: मध्यमवर्गीय नागरिकाच्या) सेक्शुअ‍ॅलिटीचा अभ्यास करावयाचा झाल्यास तो दस्तावेज भारताच्या इतिहासाच्या विविध कालखंडात तपासणे, गरजेचे ठरते. साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या लोहयुगात कौशल्य स्थापन केल्यानंतर मौर्य आणि सातवहान वंशाचा इसवीसनपूर्व दोनशे ते इसवी सन बाराव्या शतकापर्यंतचा अभिजात कालखंड, इसवीसन बाराशे ते पंधराशे सव्वीस मधला मध्ययुगीन काळ आणि इसवीसन पंधराशे सव्वीस ते इसवीसन अठराशे सत्तावन्नपर्यंतचा पूर्वाधुनिक कालखंड, अशा तीन भागांत ही विभागणी करता येते. या तीनही काळात सेक्शुअ‍ॅलिटीच्या भारतीय व्याख्या सतत बदलत्या राहिल्या आहेत. संकुचित धार्मिक प्रभावाने चालणाऱ्या व्यवस्थांमध्ये लैंगिक स्वातंत्र्यावर आलेल्या मर्यादांना विरोध करीत लैंगिक उदारमतवादी तत्वज्ञानाची धार्मिक मांडणी होणे आणि हा उदारमतवाद टोकाला जाऊन समाजाची वाटचाल पुन्हा संकुचित धारणांकडे होणे, अशी आवर्तने आपल्याला या अडीच हजार वर्षांच्या काळात झालेली पहावयास मिळतात.


लोहयुगाच्या सर्वोच्च प्रगतीतून साम्राज्यांची बांधणी करताना आणि त्यांना एकत्रित ठेवण्यासाठी विविध संकल्पना, नितीनियम, आज्ञावली, कार्यपद्धती, परिशिष्टे, संकल्पना आणि करारांची निर्मिती करण्यात आली, ज्याला एकत्रितरित्या ‘शास्त्र' असे संबोधले जाते. शास्त्रपद्धतींची प्राथमिक संरचना केल्यानंतर त्यातून युद्धशास्त्र, नगररचनाशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, शिल्पशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेक महत्त्वांच्या ज्ञानशाखांची निर्मिती करणे, शक्य झाले. या ज्ञान शाखांसोबत सेक्ससंबधीचा विचारही शास्त्रीय पातळीवर पहाण्यात आला, ज्यात ‘काम' या शब्दाची प्रारंभिक रचना करण्यात आली. भारतीय भाषांच्या इतिहासात ‘काम' या शब्दाचा अर्थ प्रचंड गुंतागुंतीचा, अध्यात्माच्या अनेक पातळ्यांवर जाणारा, अनेक धर्मांच्या रचनेत अतिशय महत्त्वाचा असा शब्द आहे. ‘काम’ या शब्दाची व्याख्या करायची झाल्यास त्यात व्यक्तीच्या इच्छा, आकांक्षा, गरजा, लालसा, अभिलाषा, इंद्रियानुभव, स्नेह, ममता, प्रेम, ध्येय, साधना आणि सुखाची परमावधी इतक्या विस्तृत प्रतलात विचार करावा लागतो. या प्रतलांचेही स्वत:चे असे गहन अर्थ आहेत. त्यामुळे कामशास्त्राची निर्मिती ही माणसाच्या अध्यात्मिक इतिहासातली सर्वात महत्त्वाची निर्मिती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये.


कामसूत्र आणि भारतीय समाज
भारतीय तत्त्वज्ञानांतल्या अनेक शास्त्रांच्या आद्यनिर्मितीचे श्रेय हे कुणा एका व्यक्तीला न देता, ते विद्वानांच्या अनेक व्यक्तीसमूहांना दिले जायला हवे. परंतु व्यक्तीसमूहांचा दीर्घ उल्लेख प्रत्येकवेळी शक्य नसल्याने, त्याऐवजी कदाचित देवांची उपयोजना करण्यात आली असावी. कामशास्त्राच्या आद्यरचनेचे श्रेय मल्लनाग या असुरांच्या प्रेषिताला दिले जाते. जो प्रत्यक्षात जन्माला आल्याचे पुरावे इतिहासात नाहीत. कामशास्त्राच्या या प्रारंभिक रचनेनंतर त्याच्या विस्तृत अवकाशात आद्य तत्त्वज्ञान मांडण्याचे श्रेय हे उद्दालक ॠषींचा मुलगा श्वेतकेतुला द्यावे लागेल. असे म्हटले जाते की, उद्दालक ॠषींनी ‘काम' ही संज्ञा केंद्रस्थानी ठेऊन विश्वाच्या निर्मितीचे आद्यरहस्य संक्षेपाने श्वेतकेतुला सांगितले. या संक्षेपाचा विस्तार करुन ख्रिस्तपूर्व आठव्या शतकात श्वेतकेतूने प्रारंभिक तत्त्वज्ञानाची क्लिष्ट मांडणी केली. या क्लिष्ट मांडणीची संकीर्ण मांडणी बाभ्रव्य नावाच्या विद्वानाने केली. अर्थात त्यातली क्लिष्टता काहीशी कमी करण्यास त्याला यश आले तरी त्याचे स्वरुप हे बरेचसे माहितीकोशासारखे होते. या माहितीकोशाच्या आधारे इसवीसनपूर्व पहिल्या ते इसवीसन तिसऱ्या शतकात दत्तक, सुवर्णनभा, घोतकमुख, गोनर्दिया, गोणिकपुत्र आणि चरण्य या सहा विद्वानांनी सेक्सचे तत्त्वज्ञान अधिक सोपे आणि विस्तृत अवकाशात मांडले. या सहा जणांच्या विस्तृत साहित्याचा अभ्यास करुन ते सामान्य लोकांना समजेल, अशा सोप्या भाषेत आणि परिपूर्णरित्या मांडण्याचे अवघड नि ऐतिहासिक काम केले ते, वात्सायनाच्या ‘कामसूत्रा’ने.


जगात सर्वात जास्त वाचले गेलेले निधर्मी पुस्तक म्हणून ज्याचा उल्लेख होतो, तो ‘कामसूत्र’ ग्रंथ इसवीसनपूर्व चारशे ते इसवीसन दोनशे या कालखंडाच्या दरम्यान लिहिला गेला असावा. सद्य:स्थितीत उपलब्ध असणाऱ्या संपूर्ण कामसूत्राची प्रथमावृत्ती ही दुसऱ्या शतकातली आहे. मात्र, ऐकीव माहिती आणि पाश्चात्यांच्या पूर्वग्रहांमुळे कामसूत्र हे फक्त समागम करताना वापरल्या जाणाऱ्या आसनांची माहिती देणारे पुस्तक आहे, असा समज जगभर रुढ आहे. वास्तवात मूळ कामसूत्रात लैंगिक क्रीडांचा भाग हा वीस टक्क्यांहूनही कमी आहे. कामसूत्राची रचना ही ‘काम' या शब्दाच्या व्यापक संज्ञापनेभोवती रचलेली अाहे. त्यात जीवनपद्धती, प्रेम, समागम, विवाह, पत्नीचे आचरण, तिचे अधिकार आणि कर्तव्ये, शारिरीक सौंदर्यशास्त्र, आकर्षणाचे नियम, मानवी नातेसंबध आणि नागरिकांची वर्तणूक याबद्दल विस्तृत भाष्य करण्यात आले आहे. ‘कामसूत्र’चा अंतिम उद्देश हा माणसाला मोक्ष मिळविण्यात मदत करण्याचा आहे. ‘कामसूत्र’ हे फक्त धर्माच्या रक्षकांसाठी लिहिलेला ग्रंथ नसून तो नगरवासीयांसाठी म्हणजे तत्कालिन सामान्य मध्यमवर्गीय नागरिकांना उद्देशून लिहिला गेला आहे. सामान्य नागरिकांना उद्देशून लिहिला गेल्यामुळे त्यात अनुकर्त्यांच्या म्हणजेच, वाचकांच्या भावनांचा आणि इच्छा आकांक्षांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. याशिवाय तत्कालिन समकालिकतेचा विचार करून जुनाट रुढी परंपरांना छेद देऊन परिवर्तनशील समाजरचनेची बीजे रोवण्याचाही अप्रत्यक्ष प्रयत्नही या ग्रंथात करण्यात आला आहे.


कामसूत्र लिहिले जाण्यापूर्वी सेक्सविषयी आदर्श नितीनियमांसाठी कौटिल्यीय अर्थशास्त्र आणि मनुस्मृतीचा वापर केला जात असे. कामसूत्राच्या सर्वात अद्ययावत प्रतीचे सटीक भाषांतर करणाऱ्या वेंडी डॉनीजर नावाच्या अमेरिकी विदुषी या कामसूत्राबद्दल आपली निरीक्षणे नोंदविताना लिहितात- "मनु स्त्रियांना आयुष्यभर एकाच पतीच्या खुंट्याला बांधून ठेवतो. तो लग्नाचे विभाजन मान्य करीत नाही, परित्यक्तेला वा विधवेला कुठलेही अधिकार देत नाही. पती सुंदर असो वा कुरुप, पत्नीने त्याची आयुष्यभर देवासमान पूजा केली पाहिजे, असे तो सांगतो. मनु स्त्रियांना विद्यार्जनाचे कुठलेही अधिकार देत नाही, त्यांच्या संपत्ती खर्च करण्यावर पूर्णतः अंकुश ठेवण्यास सांगतो. मात्र, कौटिल्याचे अर्थशास्त्रातले नियम हे मनुच्या स्मृतींपेक्षा जास्त उदारमतवादी आहेत, ते एकाच स्त्रीचे एकापेक्षा जास्त पती वा जोडीदार असणे मान्य करतात. ते परित्यक्त्या आणि विधवा स्त्रियांच्या संपत्तीजतनाला दुसरा साथीदार मिळेपर्यंत मान्यता देतात, विधवा पुर्नविवाहाला मान्यता देतात. अर्थशास्त्र बाजाराचा विचार करते आणि बाजार ग्राहकांमध्ये भेदाभेद करत नाही. बाजाराला तो परवडतही नाही. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात बहुदा समानतेचे हे मूल्य त्यातून आले आहे. असे असले तरी मनु आणि कौटिल्य इतर कितीतरी बाबतीत स्त्रियांवर निर्बंध लादतात. मात्र, या दोहोंच्या पुढे जाऊन वात्सायन कामसूत्रात स्त्रियांच्या धनार्जनाबद्दलही उदारमतवादी विचार मांडतो. तो घरातल्या चार भिंतींच्या आतही स्त्रीसत्तेचा पुरस्कार करतो. तो घरगुुती खर्च आणि व्यवहार हे स्त्रियांच्या ताब्यात ठेवण्यासाठी सांगतो. विधवा आणि परित्यक्त्यांच्या पुनर्विवाहांना मान्यता देतो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो शक्य तितक्या स्त्रियांनी साक्षर होऊन ‘कामसूत्र’ हा ग्रंथ वाचावा, यासाठीही उद्युक्त करतो. विवाहित स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याबद्दल वात्सायनाचे मत त्या काळाच्या कितीतरी प्रकाशवर्षे पुढे आहेत, असे म्हणावे लागते. कारण तो पुरुषांनी विवाहित स्त्रियांचा सहवास मिळविण्यासाठी त्यांना लग्नसमारंभात, उत्सवांमध्ये, सार्वजनिक बागांमध्ये, नाट्यसंमेलनामध्ये कसे भेटावे यासंबधी तो मार्गदर्शन करतो. हे असे करणे फारसे हितावह नाही, हे त्याने मान्य केलेले असले तरी विवाहित स्त्रियांशी समागम करण्याचे त्याचे मुक्तस्वातंत्र्याचे विचार, अगदी आजच्या काळातही बरेच पुढारलेले आहेत, असेच म्हणावे लागते.


लैंगिक स्वातंत्र्याची मुहुर्तमेढ
लैंगिक स्वातंत्र्याच्या अंगाने कामसूत्राचा विचार केल्यास स्त्रियांच्या लैंगिकतेवर वात्सायनाने अत्यंत बारकाईने विचार केला असल्याचेही दिसून येते. तो समागमात स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तु बनवून वा समागमाची व्याख्या फक्त पुरुषकेंद्री न ठेवता, ती पूर्णतः समानतेच्या पातळीवर आणतो. तो म्हणतो की, समागमात तृप्तीचा अनुभव न मिळणारी स्त्री आपल्या पुरुषाचा तिरस्कार करु लागते आणि ती अशा पुरुषाला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाऊ शकते. शरीरसंबंध फक्त संततीनिर्माणासाठी असल्याचे गृहितक वात्सायन अवघ्या दोनतीन ओळीत फेटाळून लावतो. आपल्या सिद्धांताला दुजोरा देण्यासाठी तो इतर जनावरे फक्त प्रजोत्पादनाच्या बहराच्या काळातच समागम करतात, तर माणूस हा प्राणी बहर नसतानाही समागम करतो, हे निरीक्षण नोंदवितो. लैंगिक स्वातंत्र्याशिवाय वात्सायन स्त्रियांच्या जोडीदार निवडण्याच्या आणि जोडीदार सोडण्याच्या प्रक्रियेवरही गांभीर्यपूर्वक विचार करतो. एखादी स्त्री आपल्या पुरुषाला केव्हा व का सोडते, याचे सार्वकालिक विवेचन कामसूत्रात आले आहे. जे अगदी आजही खरे ठरते. ब्रेकअप करुन पुरुषाला स्वेच्छेने सोडण्याचा स्त्रिचा अत्यंत मुलभूत अधिकार वात्सायन फक्त मान्यच करीत नाही, तर हे का होते, त्याची स्पष्ट कारणेही समाजापुढे मांडतो. त्या अर्थात ‘कामसूत्र’ हा लैंगिक स्वातंत्र्याची मुहुर्तमेढ रोवणारा जगातला पहिला ग्रंथ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरत नाही.


इसवीसन दुसऱ्या शतकात भारतीय उपखंडात ‘कामसूत्र’ हा ग्रंथ सर्वदूर पसरल्यानंतर आधुनिक नागरिकतेचा पुरस्कार करण्यासाठी अनेक साम्राज्यांनी कामशास्त्राचा संरचनावाद आणि कामसूत्राची नियमावली स्वीकारल्याचे दिसते. तत्कालीन शिल्पकला आणि कलेच्या इतर अनेक शाखांवरही कामसूत्राचा प्रभाव पडल्याचे दिसून येते. भारतीय उपखंडातल्या प्रमुख धर्मांनी भोग, लालसा वा तृष्णा यांची मीमांसा करतानाही कामसूत्राचा आधार घेतल्याची उदाहरणे आहेत. प्रारंभिक प्रकाशनानंतर कामसूत्र हा ग्रंथ जनप्रिय झाला आणि समाजावर त्याचे अनेक चांगलेवाइट परिणाम झाले. फक्त समागमाची आसने शिकण्याचे साधन म्हणून आज जसे त्याच्याकडे पाहिले जाते, तसे त्याकाळातही पाहिले गेले. भारतीय साम्राज्यांच्या ज्या परिसरांमध्ये नागरिकांना वा स्त्रियांना जास्त अधिकार नव्हते, पण ‘कामसूत्र’ हे पुस्तक पोहचले होते, तिथे ते केवळ एक थिअरी वा पुस्तकी गोष्ट अथवा फँटसी बनून राहू लागले. कामसूत्राच्या पढिक ज्ञानाला प्रत्युत्तर म्हणून आणि छापील पुस्तकांच्या बाहेर येऊन तत्कालीन समाजवास्तव मांडण्यासाठी प्राकृत भाषेतून अनेक गाथा लिहिल्या जाऊ लागल्या. या गाथांचे स्वरुप हे आर्यवृत्तात लिहिल्याप्रमाणे होते, त्यांची रचना संस्कृत सुभाषितांसारखी असली तरी भाषा मात्र स्थानिक होती.


लैंगिक स्वातंत्र्याचा विस्तार
आजच्या काळात ट्वीटरवर अवघ्या दोनशे ऐंशी अक्षरांच्या मर्यादित आकारात लोक जसे व्यक्त होतात, त्याचप्रमाणे तत्कालीन महाराष्ट्रातील अनेकजण या गाथांमधून व्यक्त होत होते. या गाथांच्या केंद्रस्थानी प्रेम आणि लैंगिकता होती. त्या बहुतांशी विवाहित स्त्रिया वा लग्नायोग्य कुमारिकांनी रचलेल्या होत्या. ‘कामसूत्र’ हे जर थिअरीशी संबधित होते, तर गाथासप्तशती या प्रॅक्टिकलशी संबधित होत्या. महाराष्ट्रात उदयास आलेल्या प्राकृत भाषेतल्या या अनेक गाथांचा संचय एकत्र करुन त्यातल्या निवडक ७०० गाथांचा हालसातवाहनाने कोश केला. ज्यातून "गाथासप्तशती'ची निर्मिती झाली. आता गाथासप्तशतीच्या निरनिराळ्या आवृत्त्या उपलब्ध असल्या तरी, त्यातल्या कुठल्याही आवृत्तीत चारशे तीस गाथा या समान आहेत. यातली प्रत्येक गाथा ही वेगळ्या माणसाने लिहिलेली अाहे. त्यात किमान तीनशे एकोणव्वद लेखक लेखिकांचा समावेश आहे. आजच्या काळात सेक्स आणि शृंगार या विषयांवर फेसबुकवर व्यक्त होणाऱ्या लेखक-लेखिकांचे समग्र लिखाण एकत्रित करुन त्यातले निवडक लिखाण वेगळे काढल्यास समोर येणारी माहिती ही बरीचशी ‘गाथासप्तशती’सारखीच असेल. भारतीय उपखंडातल्या लैंगिक स्वातंत्र्याच्या इतिहासात लैंगिकतेविषयी एक सार्वजनिक विचारांचा समुच्चय म्हणून गाथासप्तशतीचे महत्व निर्विवाद आहे.


मौर्य आणि सातवहानाचा सुमारे चौदाशे वर्षांच्या अभिजात काळात कामशास्त्राला अनुसरुन लैंगिकतेविषयी बरीचशी साहित्यनिर्मिती आणि टीका लिहिली गेली. या काळात भारत ही जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती आणि जगातल्या एकूण संपत्तीच्या एकतृतीयांश ते एक चतुर्थांश संपत्तीवर भारताची मालकी होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माणासाठी अर्थात मोठ्या प्रमाणावर नागरी व्यवस्थेचे गरज असते. परंतु ही नागरी जीवनपद्धती उदारमतवादी असली, तरी ती भोगविलासी असून चालत नाही. कारण त्यामुळे साम्राज्यावर आक्रमणाचा धोका उद्भवू शकतो. अभिजात काळाच्या शेवटच्या शतकांमध्ये संपत्तीचा संचय वाढल्यानंतर लोकांमध्ये संकुचित भावनांचे प्रमाण वाढू लागले. या काळात काही साम्राज्यांमध्ये नागरिक संपत्ती खर्च करुन प्रवाही ठेवण्यापेक्षा, ती साठवून ठेवण्यास महत्व देऊ लागले. विविध प्रकारच्या खर्चावर मर्यादा आल्याने आत्मविलासी प्रवृत्ती जाऊन ती अधिकाधिक धार्मिकतेकडे झुकू लागली. ज्यात सेक्सला दुय्यम मानले गेले. काही प्रसंगी निषिद्धही मानले गेले. एकच जोडीदार करण्याच्या विवाहसंस्काराला समाजमान्यता मिळू लागली. विवाहपूर्व व विवाहबाह्य संबधांकडे घृणेने पाहिले जाऊ लागले. जुन्या उदारमतवादी संकल्पना जाऊन कन्झरव्हेटिव्ह म्हणजेच अनुदारमतवादाचा उदय होऊ लागला. इथे खरे तर समाज आणि अर्थव्यवस्था पुन्हा प्रवाही करण्यासाठी कामसूत्राची नव्याने मांडणी करणे गरजेचे होते. ही नवी मांडणी केली, ती वेणुदत्त राजाच्या दरबारी असलेल्या कोका नावाच्या पंडिताने. इसवी सन अकरा व बारा या शंभर वर्षांच्या काळातल्या आजूबाजूच्या समाजव्यवस्थेचा अभ्यास करुन लोकांमध्ये सेक्सविषयी जनजागृती करण्यासाठी आणि सेक्सकडे घृणेने न पहाता सौंदर्यशास्त्राच्या दृष्टिकोनाने पहाण्यासाठी कोकाने ‘रतिरहस्य' नावाचा ग्रंथ लिहिला ज्याला ‘कोकशास्त्र’ही म्हटले जाते. कामसूत्रापेक्षा हा ग्रंथ थोडा वेगळा होता, ज्यात कामाचे अध्यात्मिक अर्थ लावण्यापेक्षा थेट सुखाच्या आणि सौंदर्यांच्या व्याख्यांना हात घातला होता, आणि सेक्स ही उपभोगाची सर्वात सुंदर गोष्ट आहे, हे त्यात ठासून सांगण्यात आले होते.


कमालीच्या अध्यात्मिक वातावरणात सेक्सकडे दुय्यम नजरेतून पहाण्याच्या प्रक्रियेला छेद देण्याचा दुसरा प्रयत्न केला गेला, तो खजुराहोच्या मंदिर निर्मितीने. खजुराहोची मंदिरे ही निर्विवादपणे अनुदारमतवादला खुले आव्हान देण्यासाठी निर्माण करण्यात आली होती. अनुदारमतवाद्यांनी पसरविलेल्या निराशेच्या गर्तेतून लोकांना बाहेर काढून धर्म आणि अध्यात्मिकतेची ‘कामाच्या' मार्गाने पुन्हा एकदा सांगड घालून मोक्षाचा परिपूर्ण अर्थ सांगण्याचे काम खजुराहोच्या मंदिर निर्माणाने साध्य केले गेले. कामसूत्राप्रमाणेच खजुराहोची मंदिरेही फक्त कामूक शिल्पांसाठी ओळखली जातात, पण त्यांची संख्या ही प्रत्यक्ष शिल्पांच्या संख्येच्या फक्त दहा टक्के इतकी आहे. ही मंदिरे बांधताना पुन्हा धर्म, कर्म, अर्थ, मोक्ष आणि काम या पुरुषार्थांच्या मुख्य लक्षणांचा विचार केला गेला आहे. तत्कालिन जीवनपद्धतीची स्पष्ट जाणीव आणि आकलन आज उपलब्ध नसल्याने खजुराहोची मंदिरे बघताना त्यामागची निश्चित कथासंकल्पना समजाऊन घेण्यास आपण कित्येकदा अपुरे पडतो. या मंदिराचे बांधकाम हे त्याकाळचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता, जो आखताना अनुदाराने ग्रासलेल्या समाजाचे अध्यात्मिकतचे अर्थ, विविध धर्मांची स्थानिक व्यामिश्रता, श्रद्धा आणि लोकभावनांचा विचार केला गेला होता.


खजुराहोच्या मंदिरावर असलेल्या विविध शिल्पांकडे नजर टाकल्यास अप्सरांसारख्या दिसणाऱ्या स्त्रिया मेकअप करीत आहेत, काही आपला केशसंभार सजवित आहेत, नृत्य करीत आहेत, तर पुरुष नगरात चालणाऱ्या विविध कार्यांमध्ये व्यस्त आहेत, असे दाखविलेले आहे. याशिवाय सामान्य ठरविता येतील, असे काही नागरिक विविधप्रकारे कामूकक्रीडांमध्ये व्यस्त आहेत. या क्रीडांच्यावेळी इतर लोक वा लहान मुले तिथे उपस्थित असल्याचेही दर्शविण्यात आले आहे. साधारणपणे मानवी मनाच्या सेक्सविषयीच्या विविध धारणा आणि आकांक्षाचे सार या शिल्पांमध्ये सामावले आहे. त्यात समलैंगिकता, बहुसहचारिता, प्राणीगमन आणि सामूहिक समागमाची काही ठळक शिल्पे आहेत. समागमाची इतकी विविध रुपे स्वीकारणे आणि समलैंगिकतेला वा प्राणीगमनाला मान्यता देणे हे निश्चितपणे परकोटीच्या लैंगिक स्वातंत्र्याचे लक्षण अाहे. या शिल्पांमुळे तत्कालीन अनुदारवादी लोक अस्वस्थ झाले असतील, यात शंकाच नाही. खजुराहो मंदिर निर्माणानंतर बाराशे वर्षानंतर आजही जेव्हा भारतात अनुदारमतवादाचा प्रभाव वाढू लागतो, आणि लैंगिक स्वातंत्र्यावर बंधने घालण्याचे प्रयत्न केले जातात, तेव्हा तेव्हा खजराहोचे उदाहरण देऊन, भारत हा लैंगिक स्वातंत्र्यांची जन्मभूमी आहे, हे ठासून सांगितले जाते.


परकीय आक्रमण आणि लैंगिक स्वातंत्र्याचा संकोच
दुसऱ्या शतकात वात्सायनाच्या कामसूत्राने सुरुवात केलेली पहिली सेक्स क्रांती ही रतिरहस्य आणि खजुराहोच्या निर्मितीनंतर काही काळ आवर्तित झाली. ही क्रांती अशीच चालत राहिली असती, तर त्यातून जगाच्या इतिहासावर कुठले प्रभाव पडले असते, हे निश्चितपणे सांगणे अवघड आहे. मौर्य आणि सातवाहनाचा अभिजात काळ चौदाशे वर्ष चालल्यानंतर भारतीय साम्रांज्यावर मध्यपूर्वेच्या साम्राज्यांची आक्रमणे होऊ लागली. सुरुवातीच्या काळात ही आक्रमणे थोपवून धरण्यास काही साम्राज्यांना यश आले असले, तरी आक्रमणपश्चात राजकीय आणि सामाजिक व्यवहार बदलायला सुरुवात झाली. वारंवार होणाऱ्या आक्रमणांनी सामाजिक संतुलन आणि शांततेचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले. या अस्थिरतेच्या काळात संपत्तीची लूट जशी सुरु झाली, तशी व्यक्तिस्वातंत्र्य आणि नागरी स्वातंत्र्याचीही लूट सुरु झाली. मध्यपूर्वेतल्या संस्कृतीच्या धारणा आणि संकल्पना या भारतीय धारणांपेक्षा भिन्न होत्या ज्यात लैंगिकतेवर प्रचंड प्रमाणावर बंधने होती. विवाहसंस्थांचे नितीनियम वेगळे होते आणि स्त्रियांचे अधिकार अतिशय मर्यादित होते. सेक्स ही पराकोटीची खाजगी गोष्ट होती आणि सार्वजनिक जीवनात सेक्सचा उल्लेख केवळ चूक म्हणूनच नाही, तर कित्येकदा गुन्हा म्हणूनही पाहिला जात होता.
यथावकाश मध्यपूर्वेतल्या टोळ्यांनी आणि साम्राज्यांनी भारतभर आपला विस्तार वाढविला. सेक्सविषयी आपल्या संस्कृतीच्या धारणा आणि संकल्पना स्थानिक लोकांवर लादण्यास सुरुवात केली. हे नियम प्रत्येकवेळी जाचकच होते. असे नाही, ते तसेच स्वीकारले जात होते, असेही नाही. पण दोन परस्परभिन्न संस्कृती किमान समान अभिसरणाच्या पातळीवर आल्याने तिथल्या समाजजीवनाला असंख्य तडजोडींचा सामना करावा लागला. ज्यात नंतर लैंगिक स्वातंत्र्य दुय्यम तर सोडा, पण गृहितकांतही शिल्लक राहिले नाही. काळ आणखी पुढे सरकला आणि आक्रमकांची साम्राज्ये भारतात स्थिरावली, तशी नागरिकांना लैंगिक स्वातंत्र्य देण्याची पश्चातबुद्धी काही सुल्तांनाना होऊ लागली. यातून पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला दिल्लीच्या लोधी राजघराण्याच्या दरबारात पंडित असलेला कल्याण मल्ला या कवीने ‘अनंगरंग’ हा ग्रंथ लिहला. ‘अनंगरंग’ ही कामसूत्रावर आधारित आणि कोकशास्त्राचा संदर्भ वापरुन लिहिलेली त्यावेळची समकालीन साहित्यकृती होती. ‘अनंगरंग’ किंवा ‘कमलेधिप्लव’ नावाच्या या ग्रंथाचा मूळ उद्देश हा स्त्री-पुरुषांमध्ये प्रेम उत्पन्न करुन त्यांचे विभाजन थांबविण्याचा होता. यात स्त्रियांच्या शारिरिक स्वभावांचे चार प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले होते. विवाह करताना ग्रहस्थितींचा विचार करण्यात आला होता, आणि बहुचर्चित ‘वशीकरण विद्ये'वरही प्रकाश टाकण्यात आला होता. ‘अनंगरंग’ हा ग्रंथ काही काळ लोकप्रिय झाला, तरी त्याची समाजावरची पकड जास्त काळ टिकली नाही. दरम्यान, भारतावर आक्रमणांचे दुसरे आवर्तन सुरु झाले आणि उरल्यासुरल्या लैंगिक स्वातंत्र्यावरही गदा आणली.
वास्को-द-गामाच्या भारत सफरीनंतर युरोपीय देशांनी व्यापाराच्या उद्देशाने भारताला भेट देण्यास सुरुवात केली. अंतिमतः त्यांचा उद्देश भांडवलशाही सत्तेची स्थापना करणे हा होता. मध्यपूर्वेतल्या आक्रमकांच्या कित्येक पिढ्या इथे वसल्याने, आता त्याही स्थानिक झाल्या होत्या. पाश्चिमात्यांची भारतावर आक्रमणे सुरु झाल्यानंतर त्यांना इथल्या मूळ भारतीय संस्कृतीचेही उच्चाटन करायचे होते, आणि मध्यपूर्वेने नव्याने लादलेल्या संस्कृतीचे अवशेष पुसून टाकीत त्यावर व्यापार आणि शोषणाला सोयीचा ठरेल, अशा वातावरणाची निर्मिती करायची होती. या काळात पोर्तुगीज आणि फ्रेंच जेव्हा भारताच्या विविध भागातल्या किनाऱ्यांवर उतरु लागले, तेव्हा भारतातली प्राचीन शिल्पकला, त्यातली नग्नता आणि कामूकता त्यांना रानटी स्वरुपाची भासली. यातून अनेक शिल्पांची तोडफोड केली गेली. काही ठिकाणी पूर्ण शिल्प न फोडता शिल्पांचे चेहरे वा अवयव तोडून त्यांना विद्रुप करण्यात आले. भारताच्या लैंगिक स्वातंत्र्याचे हे अखेरचे मूर्तिभंजन होते. लवकरच मध्ययुगानेही आपला अखेरचा श्वास घेतला आणि भारतात वसाहतींचे साम्राज्य सुरु झाले.


लैंगिक स्वातंत्र्याचे अंधारयुग
वसाहतींच्या साम्राज्याने भारतच नव्हे तर पूर्ण जगाचा इतिहास बदलून टाकला. जिथे जिथे म्हणून वसाहतवाद होता, तिथे स्थानिक लोकांचे मुलभूत अधिकारच दुय्यम ठरविले गेले. निसर्गसंपत्तीने नटलेले हे देश निर्यातीसाठी अनुकुल असले, तरी त्या देशातली माणसे ही फक्त निर्यातीच्या फायद्यासाठी एक साधन म्हणून पाहिली गेली. आपल्याच देशात दुय्यम नागरिक बनून रहावे लागल्यामुळे इतल्या लोकांना नागरिकत्वाचा मुलभूत अधिकारही शिल्लक राहिला नाही. या कालावधीत स्थिरता आणि शांतता राहिली तरी वसाहतींच्या रक्षणकर्त्यांनी स्थानिकांना अमानुष पद्धतीने वागविणे सुरु ठेवले. व्यापार प्रचंड वाढत असला तरी त्यातून येणारा नफा हा नागरिकांकडे न जात कंपन्यांकडे आणि सरतेशेवटी पाश्चिमात्य देशांकडेच जात होता. भारताच्या लैंगिक स्वातंत्र्याच्या इतिहासात हा काळ अंधारयुग म्हणून गणला जाऊ शकतो. वसाहतवादातल्या काही लोकांनी एकाचवेळी भारताचे लैंगिक स्वातंत्र्य हिरावले आणि दुसऱ्या लोकांनी भारताच्या लैंगिक स्वातंत्र्याचा समग्र इतिहासच लिहून काढला. प्रस्तुत लेखात वापरले गेलेले अनेक संदर्भ, त्याची इंग्रजीतली भाषांतरे आणि त्यावरच्या टिपण्या या वसाहतींच्या काळात पाश्चिमात्यांनीच लिहिलेल्या आहेत. बऱ्याच मोठा कालखंडांपासून भारत स्वतःच आपला इतिहास विसरुन गेला होता, हा हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास हुडकून काढणे, त्याचे रीतसर दस्तावेजीकरण करणे, इतिहास हुडकून काढताना अर्थसहाय्य करणे, प्रसंगी प्राणही धोक्यात घालणे, इत्यादी गोष्टीदेखील पाश्चिमात्यांनीच केल्या. एका परीने पाश्चिमात्यांच्या आक्रमणामुळेच भारताला स्वतःच्या भारतीयत्वाची ओळख झाली, असेही म्हणता येते. १७६३ मध्ये व्यापारी म्हणून भारतात प्रवेश करुन १९४७ मध्ये पाश्चिमात्यांनी भारत सोडला.


महायुद्धपश्चात समाजरचना
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दोन वर्षे आगोदर दुसरे जागतिक महायुद्ध संपुष्टात आले होते. युद्ध संपल्यानंतर जगाचे दोन मुख्य भाग झाले. एक भाग भांडवलशाही अमेरिकेच्या वर्चस्वाखाली आला, तर दुसरा भाग समाजवादी रशियाच्या वर्चस्वाखाली गेला. जर्मनीसारख्या काही देशांचे भौगोलिक तुकडे करुन एक भाग भांडवलशाहीच्या ताब्यात तर दुसरा समाजवादाच्या ताब्यात गेला. दरम्यान भारतीय उपखंडातले अनेक देश हळूहळू स्वतंत्र होऊ लागले. रशियाच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंब्याने आपल्या देशातल्या श्रीमंत भांडवली व सरंजामी लोकांना जास्त त्रास न देता, मिश्र समाजवादी अवस्थेत प्रगती करु लागले. या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांसमोर आपल्या जनतेला अन्न, वस्त्र व निवारा पुरविण्याचे मुलभूत आव्हान होते. सकल समाजाच्या या प्राथमिक गरजा आगोदर पूर्ण झाल्याशिवाय जनतेला आणखी काय देता येईल, यासंबधी सरकारे विचार करु शकत नव्हती. युक्रेनमध्ये झालेल्या सामुदायिक कृषिक्रांतीनंतर आणि अमेरिकन शास्त्रज्ञांनी लावलेल्या किटकनाशकांच्या शोधानंतर रशिया आणि अमेरिकन नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊ लागल्या. एकीकडे तंत्रज्ञानाच्या स्पर्धेतून ४ ऑक्टोबर १९५७ रोजी रशियाने ‘स्पुटनिक’ या प्रहिल्या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर अमेरिकेचे एकूण सांस्कृतिक विश्व ढवळून निघाले. रशियाशी स्पर्धा करण्यासाठी संकुचित धार्मिक धारणांना तिलांजली देत अमेरिका अधिकाधिक विज्ञानवादी होऊ लागला.परमेश्वराच्या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेऊन आजपर्यंत वाटचाल करणाऱ्या समाजात विज्ञानवाद्यांनी माणूस केंद्रस्थानी ठेऊन नव्याने रचना करण्याचे प्रयत्न सुरु केले. या प्रयत्नांत धार्मिक व्यवस्थांमध्ये लैंगिक स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर येत गेला.

मनोरंजनातून लैंगिक स्वातंत्र्याकडे
माणसाच्या गेल्या ३९ हजार वर्षांच्या इतिहासाकडे नजर टाकल्यास अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा भागल्यानंतर माणूस मनोरंजनाकडे वळतो, असे दिसून येते. फक्त पोट भरेल असे अन्न न खाता चविष्ट लागेल असे अन्न खाणे, ही या मनोरंजनाची प्रारंभिक पायरी असते. मनोरंजनाचा दुसरा महत्त्वाचा मार्ग, हा अर्थातच लैंगिक सुखाच्या मार्गाने जातो. मूलभूत गरजा पूर्ण होत नसणाऱ्या समाजातही सेक्स असतो, परंतु त्याला मनोरंजनाची किनार क्वचितच असते, तो बहुतांशी नैसर्गिक शरीर व्यवहाराप्रमाणे चालतो, आणि वैयक्तिक पातळीवर आनंद मिळत असला, तरी त्याचे सामाजिक संदर्भ हे अतिशय त्रोटक असतात. ज्यात वैविध्याचा अभाव असतो. एकीकडे रशिया आणि अमेरिकेच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर त्या देशातल्या नागरिकांना अर्थातच मनोरंजन हवे होते, ज्यात सेक्सचाही समावेश होता. या प्रगतीशील मानवतावादी समाजरचनेमध्ये सेक्सकडे फक्त प्रजननाची एक प्रक्रिया म्हणून न पहाता,त्यात माणसाच्या भौतिक सुखाचा विचार प्रामुख्याने करण्यात आला. साठच्या दशकात अमेरिकेत सुरु झालेल्या ‘आत्मसुखाच्या' शोधातून सेक्सचा मुलभूत उद्देश प्रजनन नसून, तो माणसाच्या सुखाशी निगडीत आहे, हा प्रतिवाद सामोर आला. तशा सेक्सविषयीच्या सार्वजनिक धारणा वेगाने बदलू लागल्या. यातूनच मग लैंगिकतेची क्रांती (सेक्शुअल रिव्होल्युशन) किंवा लैंगिक स्वातंत्र्य लढ्याचा (सेक्शुअल लिबरेशन) जन्म झाला. लैंगिक स्वातंत्र्य लढ्याच्या या प्रारंभिक काळात गर्भनिरोधक गोळ्या आणि निरोधचा प्रसार, सार्वजनिक ठिकाणची अर्धनग्नता वा नग्नतेची मोकळीक, पोर्नोग्राफी, विवाहपूर्व शरीरसंबध, समलैंगिक शरीरसंबध या गोष्टींचा समावेश होता. स्वेच्छेने केला जाणारा गर्भपात, हे या क्रांतीचे शेवटचे टोक होते.
या काळात भारतीय उपखंडातल्या देशांची विकासप्रक्रिया मात्र अन्न- वस्त्र आणि निवारा या मूलभूत प्रश्नांभोवतीच अडकून पडलेली होती. भारताच्या संदर्भात नोंदवायचे तर अमेरिकेत लैंगिक स्वातंत्र्यक्रांतीची सुरुवात आणि भारतात हरीतक्रांतीची सुरुवात जवळजवळ एकाचवेळी झाली होती. यथावकाश साधलेल्या प्रगतीनंतर तत्कालिन समाजवादी भारतातल्या मोठ्या लोकसंख्येला किमान पोटभर अन्न मिळत राहिले. तरीही अधूनमधून पडणाऱ्या दुष्काळांमुळे विकासाचे पुढचे पाऊल पडणे, मात्र दुरापास्त होत होते. याच काळात ज्या रशियाच्या आधाराने भारत समाजवादाचे गाडे पुढे हाकीत होता, त्या रशियाच्या मदतीने भारताने १९ एप्रिल १९७५ रोजी ‘आर्यभट्ट’ हा पहिला उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला. मुंबई दिल्ली आणि मद्राससारखी शहरे वेगाने विकसित होत गेली. विकासाचा हा परीघ वाढविण्यासाठी भारत सरकारच्या इस्त्रो आणि अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेमार्फत १ ऑगस्ट १९७५ ते ३१ जुलै १९७६ या वर्षात उपग्रहामार्फत दूरदर्शनच्या प्रसारणाचा प्रयोग राबविण्यात आला. याच काळात अमेरिकेने तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताला सहकार्य करायला सुरुवात केली. जिचा प्रारंभिक उद्देश भारताला उदात्त हेतूने मदत करण्याचा असला, तरी अंतिम लक्ष्य भारताला समाजवादाकडून भांडवलशाहीकडे वळविण्याचाच होता.


संचार क्रांतीतून लैंगिक स्वातंत्र्याकडे
दरम्यान, भारताचा भुकेचा प्रश्न बराचसा आटोक्यात येऊ लागला होता. चीन आणि अन्य देशांसोबत केलेल्या वस्त्रव्यापाराच्या करारातून आणि भारतातील रेयॉन व पॉलिएस्टरच्या विक्रमी उत्पादनातून भारतीयांना अंगभर कपडे घालायला मिळू लागले होते. समाजातल्या किमान एका स्तरातल्या लोकांच्या मूलभूत गरजा आता व्यवस्थित भागविल्यानंतर त्यांना मनोरंजनाची गरज होती. शहरा-शहरांमध्ये सिनेमा थिएटर्सचे परवाने देताना सरकारी अधिकारी मोकळा हात ठेवीत होते. पुढचा टप्पा दूरसंचार क्रांतीचा होता. ३० ऑगस्ट १९८३ रोजी भारताने इनसॅट वन-बी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या एका प्रक्षेपणानंतर भारतात खऱ्या अर्थाने संचारक्रांती सुरु झाली, देशाच्या अगदी दुर्गम भागातही संचारसेवा देणे शक्य झाले आणि भारतीय राष्ट्रसंकल्पना खऱ्या अर्थाने दृढ झाली. याच उपग्रहामुळे भारतात टीव्हीचा व्यापक प्रसार होण्याचाही मार्ग मोकळा झाला. या उपग्रहामुळे भारतच नाही तर भारतीय उपखंडातल्या इतर देशांनाही संचारक्रांतीत सहभागी होण्यास मदत झाली. गमतीने भारताला काही लोक ‘एशियाचा रशिया’ही म्हणू लागले.


इन्सॅट वन बी सारख्या शक्तीशाली उपग्रहाचे प्रक्षेपण जरी यशस्वी झाले, तरी त्या उपग्रहाचा फायदा घेण्यासाठी लागणारे फोन आणि टीव्ही विकत घेण्याची क्रयशक्ती भारतीयांमध्ये अजूनही बळावली नव्हती. एखाद्याकडे टीव्ही असलाच आणि त्याच्या टीव्हीची ट्यूब उडाल्यास त्याची बातमी पूर्ण कॉलनीत पोहचत असे. अशा टीव्ही मालकाचे मित्र त्याच्या या दु:खावर हळहळत, तर शत्रूच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत. अर्थात, दूरदर्शनच्या प्रारंभिक काळातल्या कार्यक्रमांचे स्वरुपही तसे मर्यादितच असे. त्यावर बातमीपत्रांचे प्रसारण, गाणी आणि रविवारी चित्रपट दाखविले जात. अशातच १९८४मध्ये मेक्सिकोच्या टीव्ही कार्यक्रमांचे लिखाण करणाऱ्या मिग्युल साबिदो यांना भारतात येण्याचे निमंत्रण देण्यात आले. साबिदो यांनी तेव्हा नुकतीच मेक्सिकन टीव्हीसाठी ‘वेन कॅमिगो’ नावाची प्रौढ साक्षरतेवरची यशस्वी सिरियल बनविली होती. आपल्या भारतातल्या मुक्कामात त्यांनी स्थानिक कलाकार आणि लेखकांना घेऊन ‘हमलोग' या प्रसिद्ध सिरियलच्या निर्मितीला मोठा हातभार लावला. या सिरियलमध्ये कुटुंबनियोजन, जातीय सलोखा, स्त्री सक्षमता, राष्ट्रीय एकात्मता, हुंडापद्धती निर्मूलन, व्यसनमुक्ती असे विविध विषय हाताळले गेले होते. मनोरंजनाचे दुसरे काही मार्ग असतात, हेही लोकांना माहिती नसल्याने हीच सिरियल मनोरंजक म्हणून भारतीयांना मोठ्या प्रमाणावर स्वीकारली आणि परिवर्तनाच्या नव्या युगाची इथे सुरुवात झाली.


या सिरियलचा प्रभाव इतका मोठा होता की, आपल्याला आंतरजातीय लग्न करू देण्यास मदत करावी, अशी विनंती करणारी चार लाखाहून अधिक पत्रे या सिरियलचे निवेदक हिंदी आणि चित्रपटसृष्टीतले बुजुर्ग अभिनेते अशोककुमार यांना सोळा महिन्यांच्या काळात आली. या घटनेचा थेट लैंगिक स्वातंत्र्याशी संबध नसला तरी मनाजोगता जोडीदार निवडण्याच्या प्राथमिक स्वातंत्र्याची मागणी इथेच सुरु झाली असे दिसून येते. परिवर्तनाच्या या तत्कालिन लढ्याशी समकक्ष लढा आज नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’पर्यंत आला आहे.
‘हमलोग’ सिरीयलमुळे परिवर्तनाचे वारे देशभर पसरत असताना पुनरुज्जीवनवाद्यांनी बदलत्या समाजव्यवस्थेचा रोख धर्माकडे कसा नेता येईल, यासाठी प्रयत्न सुरु केले. यातून १९८७ मध्ये रामानंद सागरच्या ‘रामायण’ या महामालिकेची निर्मिती झाली. या सिरियलमुळे आणि या सिरियलच्या आगेमागे सुरु भारतीय जनता पक्षाच्या लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या अयोध्येतील राम मंदिर आंदोलनामुळे देशातले वातावरण बदलून ते पुन्हा एकदा धार्मिकतेकडे वळू लागले. टीव्हीमुळे होणारे तथाकथित सांस्कृतिक पतन थांबविण्यात पुनुरुज्जीवनवादी विचारधारांना यश आले.


आधुनिक भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीत १९८८ ते १९९० या काळात खेडी आणि शहरे, लहान मुले आणि मोठी माणसे, पुरुष आणि स्त्रिया, आधुनिकता आणि पुराणमतवाद या निरनिराळ्या लोकसंख्येसाठी कार्यक्रम बनविले गेले. हे दूरदर्शनचे कर्तेकरविते माहिती आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा समतोल साधण्यात जसे व्यग्र होते, तसे सुखवस्तु नागरिकांच्या लैंगिक स्वातंत्र्यासाठीही किमान पातळीवर प्रयत्नशील होते, असे म्हणता येते. यासंदर्भात आठवून विचार करायचे झाल्यास साप्ताहिकीत अंतर्भूत नसलेल्या आणि कुठलीही पूर्वसूचना न देता दूरदर्शनवर रात्री उशिराने दाखविल्या जाणाऱ्या इंग्रजी चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. हे चित्रपट तत्कालिन समाजाच्या दॄष्टीने सार्वजनिकरित्या ‘घाणेरडे' म्हटले गेले, तरी खाजगीत अनेक विवाहित स्त्री-पुरुष या चित्रपटांचा आनंद घेत होते. सार्वजनिक जीवनात लैंगिकता व्यक्त करण्याची विशेष साधने उपलब्ध नसताना दूरदर्शनवरचे हे चित्रपट त्यांच्यासाठी विशेष पर्वणीच होते. हे चित्रपट सुरु होण्यापूर्वी हिंदीतून त्याचे कथासार सांगण्यासाठी निवडण्यात आलेले कलाकारही दूरदर्शनच्याच इतर गाजलेल्या कौटुंबिक धारावाहिकांमधले मुख्य कलाकार असत, हे त्याचे विशेष होते.


उदारीकरणानंतरचे सेक्सकेंद्री मनोरंजन
काळ पुढे सरकू लागला आणि नव्वदच्या उत्तरार्धात भारतातले राजकारण अमुलाग्र बदलण्यास सुरुवात झाली. याकाळात उदारमतवादी मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार करताना भारतीय बाजारात फक्त परदेशी वस्तू वा भांडवलशाहीच येणार नव्हती, तर त्या भांडवलशाहीच्या मुळाशी असणारे लैंगिक स्वातंत्र्यही प्रवेश करणार होते. अर्थव्यवस्थेचे गाडे मार्गी लागणार असले तरी एका परीने भारताने पॅण्डोरा बॉक्स उघडण्याची तयारी केली होती, ज्यामुळे समकालिन संस्कृतीवर आणि आधुनिक भारताच्या इतिहासावर दुरगामी परिणाम होणार होते. याच टप्प्यावर दूरदर्शनची मक्तेदारी संपुष्टात येऊन खासगी चॅनेल सुरू झाले होते. व्हीसीआर, व्हीसीपीचा पर्याय उपलब्ध होऊ लागला होता. व्हिसीआरने तयार केलेल्या या नव्या बाजारपेठेत कधीकाळी थिएटरला लागलेल्या मुख्यधारेतल्या चित्रपटांचा समावेश होता, तसाच तिकीटबारीवर फ्लॉप गेलेल्या किंवा थिएटरमध्ये रिलीजही न झालेल्या सॉफ्टपोर्न चित्रपटांचाही समावेश होता. सॉफ्टपोर्न चित्रपटात थेट समागमांची दृश्ये दाखविण्याऐवजी कलाकार अंतर्वस्त्रांमधले प्रणय करतानाच्या दृश्यांचा समावेश असे. ज्या जोडप्यांनी आगोदरच्या काळात दूरदर्शनवर रात्री उशीराने इंग्रजी चित्रपट आवडीने पाहिले होते, त्या जोडप्यांनी पहिले दोन चित्रपट पाहून कुटुंबातले इतर सदस्य झोपल्यानंतर तिसऱ्या कॅसेटमधले हे सॉफ्टपोर्न चित्रपटही आवडीने पाहिले होते. सॅटेलाईट केबल सुरु होण्यापूर्वी एखाद्या व्हीसीआरला अ‍ॅम्प्लिफायर बसवून त्यातून आजूबाजूच्या शंभर -दीडशे घरांत जुगाड केबल टीव्हीची एक नवी व्यवस्था आकारास आली होती. व्हीसीआरच्या या प्रस्थाचा फायदा घेत लवकरच डायरेक्ट टु व्हीडीओ या तंत्राचा प्रसार होऊ लागला. चित्रपट प्रदर्शनासाठी थिएटरची अनिवार्यता कमी होऊ लागल्यानंतर लो बजेटचे हॉरर आणि सॉफ्टकोअर चित्रपटांची एक मोठी लाट भारतात आली. या चित्रपटांत माफक अंगप्रदर्शन, बाथरुम वा स्विमिंग पुलमधले अंघोळीचे सीन आणि शक्य होईल तितके सरळ कथानक ठेवण्याचा प्रयत्न केला जायचा. पण लवकरच झी टीव्ही आणि एटीएन या वाहिन्यांनी भारतातल्या सर्व शहरांमध्ये आपले जाळे विणायला सुरुवात केली आणि व्हीसीआर अडगळीत गेले, व्हीडीओ पार्लरधारकांचा धंदा बंद झाला.


१९९५ च्या सुमारास माध्यमसम्राट रुपर्ट मरडॉकच्या मालकीची स्टार प्लस ही वाहिनीदेखील भारतात पाहिली जाऊ लागली. ज्यात शुक्रवारी ‘द बोल्ड अँड द ब्युटिफुल' ही अमेरिकेत गाजलेली सिरियल आणि शनिवारी ‘बेवॉच' ही पामेला अँडरसन आदी नट्यांच्या उत्तान दृश्यांसाठी गाजलेली दुसरी सिरियल दाखविली जात असे. या तीनही प्रकारच्या मनोरंजनाने समाजाची स्वतःच्या सेक्शुअ‍ॅलिटीकडे पहाण्याची समज मात्र अधिकाधिक वाढू लागली होती. हे काम बरेचसे सूक्ष्म पातळीवर चाललेले असले तरी भांडवलशाहीच्या एका मोठ्या बाजारपेठेसाठी लागणारा लालसेचा मेंदू हळुहळू आकार घेऊ लागला होता. बाजारपेठने उच्चकोटीच्या जाहिरात तंत्राचा वापर करत कित्येक प्रसंगी माणसांच्या लैंगिकतेच्या आकर्षणाला थेट आवाहन करण्यास सुरूवात केली होती. ही लैंगिक स्वातंत्र्याच्या एका नव्या पर्वाची सुरुवात होती.


लैंगिक भावनांभोवती गुंफलेली बाजारपेठ
सन २००० मध्ये सहस्त्रक बदलताना लैंगिक भावनांभोवती गुंफलेले बाजारपेठेचे वातावरण हळुहळू बदलायला सुरुवात झाली ,तशी अनेक जागतिक कंपन्यांनी भारतात आपला विस्तार वेगाने वाढवायला सुरुवात केली. २००१ मध्ये ‘अमेरिकन देसी’ या चित्रपटाने भारतीयांना मुक्त सेक्स स्वातंत्र्याच्या जगात भारतीयही जगू शकतात आणि अशा संस्कृतीत जगणे, हे वाईट नसते, याचा वस्तुपाठच घालून दिला. अर्थात, सॅटेलाइट टीव्ही पाहणाऱ्या भारतीयांचा वर्ग हळूहळू आंग्लाळत चालला असला, तरी तो लहानपणापासून झालेल्या भारतीय संस्कार आणि सेक्सविषयीच्या संकुचित धारणांमधून पूर्णतः बाहेर येण्यास तयार नव्हता. पूर्ण लैंगिक स्वातंत्र्य वा लैंगिक स्वातंत्र्याची वैयक्तिक पातळीवरची नेमकी व्याख्या काय हे अद्यापही भारतीयांच्या आकलनात आले नव्हते. ही शेवटचा भिंत तोडण्याचे काम केले, ते एचबीओ वर प्रसारित झालेल्या ‘सेक्स अँड द सिटी'(ऑक्टोबर २००३) या गाजलेल्या मालिकेने. यामध्ये हाताळलेल्या विषयांची विविधता आणि त्यातल्या सेक्सच्या बहुविध अर्थांची रचना पाहाता ही सिरियल मनापासून आवडलेले आणि त्यातली परिस्थिती आवडीने मान्य करणारे जवळपास पंधरा लाख लोक त्या वेळी भारतात अस्तित्वात होते. माध्यमाच्या लाटेतून येऊ पहाणाऱ्या सेक्शुअल स्वातंत्र्यातले हे पहिले पंधरा लाख स्वतंत्र लोक होते. त्यामुळेच भारतीय लैंगिक स्वातंत्र्याच्या इतिहासात माध्यमे या फिनॉमिनाला ‘सेक्स अँड द सिटी इफेक्ट' म्हणतात. "सेक्स अँड द सिटी'च्या प्रसारणानंतर भारतीय टेलीव्हीजनवर तशा स्वरुपाचे वा प्रभावाचे काहीही प्रसारित झाले नाही. या पंधरा लाख लोकांच्या अनलॉक झालेल्या जाणिवांना इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे नवी वाट मात्र लवकरच मिळाली.

इंटरनेट आणि लैंगिक स्वातंत्र्य
इंटरनेटच्या आगमनानंतर भारतात पोर्नोग्राफीची स्वत:ची अशी बाजारपेठ उभी राहू पाहात होती, पण त्याचा एकट्या पुरुषाला वा जोडीदार नसलेल्या नवयुवकाला हस्तमैथुन करण्यासाठी जास्त उपयोग होत असे. यामुळेच की काय पोर्नोग्राफीच्या विकासाला समानतेच्या पातळीवरच्या लैंगिक स्वातंत्र्याच्या इतिहासात थेट जोडून घेता येत नाही. ‘टोरेंट’साइटच्या प्रारंभिक वापराच्या दिवसांत त्याचा उपयोग भारतीयांनी बरेचदा पोर्न डाऊनलोड करण्यासाठीच केला. यथावकाश पुरेसे पोर्न पाहून आणि साठवून झाल्यानंतर लोकांनी आपला मोर्चा टोरेंटवर उपलब्ध असलेल्या इतर गोष्टींकडे वळविला. ऑफिसात आपला आवडता सिनेमा डाऊनलोड करुन तो घरच्या बेडरुममध्ये स्वतःच्या प्रायव्हसीत हेडफोन लाऊन पहाण्याची सोय काहींना उपलब्ध झाली. वरवर हे सरळसोपे वाटत असले तरी सॉफ्टवेअर आणि इतर कॉर्पोरेट क्षेत्रांत काम करुन मोठा पगार मिळविणाऱ्या अनेक अविवाहित तरुण-तरुणींसाठी घरातल्या घरात पालकांना कळू न देता खाजगीत व्हीडिओ पहाता येणे ही व्यक्तीस्वातंत्र्याची आणि पर्यायाने लैंगिग स्वातंत्र्याचीही पुढची पायरी होती. लवकरच येऊ घातलेल्या मोबाइल क्रांतीसमोर मात्र हे पाऊल फारच छोटे ठरले.


भारतात मोबाईल सेवेची सुरुवात १९९५ मध्ये झाली, तरी ती जास्त लोकांना परवडण्याच्या पातळीवर येण्यासाठी २००२ साल उजाडावे लागले. व्यापक तत्त्वावर ही एक संपर्कक्रांती होती, पण या संपर्कात सहभाग घेणारी माणसांच्या निरनिराळ्या नात्यांसाठी त्याचा अर्थ वेगवेगळा होता. विवाहापूर्वी लैंगिकतेच्या कितीतरी गोष्टी ज्या भारतीय स्त्रीने शेकडो वर्षे बोलून दाखविल्या नव्हत्या त्या, ती फोनवर व्यक्त करु लागली होती. याचदरम्यान अशी संभाषणे इंटरनेटवरही लिक होऊ झाली. ती ऐकण्यासाठी पुरुष जसे उत्सुक होते तसे क्वचित स्त्रियाही उत्सुक होत्या. याच काळात ‘फोनसेक्स म्हणजे काय याचा शोध अनेकांना लागला. पलिकडच्या व्यक्तीशी फोनवर संवाद साधून त्याच्याशी कामूक स्वरुपाच्या गप्पा मारीत हस्तमैथून करणे वा फक्त गप्पांमधूनच इंटिमसीचा अनुभव घेत स्खलनाचे सुख मिळविणे, हा काहींचा नित्यछंद झाला. याकडे सामाजिक नजरेतून बघताना या प्रकाराला नैतिकतेच्या कुठल्या चौकटीत बसवायचे हा प्रश्न आजही पडू शकतो. पण स्वस्त कॉलरेटमुळे अस्तित्वात आलेला हा प्रकार विविध पातळ्यांवर पाहिला गेला पाहिजे. फोनसेक्समुळे प्रत्यक्ष लग्नापूर्वी कितीतरी मुलींना मोकळीक अनुभवता आली, किमान पातळीवर सेक्स काय असतो, याचा अनुभव घेता आला आणि यात कित्येकदा प्रत्यक्ष भेट घेणे टाळता येत असल्याने, प्रत्यक्ष सेक्समुळे होणारे तोटेही टाळता आले.


फोनसेक्सशिवाय या काळात उदयाला आलेली दुसरी गोष्ट म्हणजे सेक्स्टिंग. सेक्स्टिंग म्हणजे सेक्सशी निगडीत असलेला कुठलाही लघुसंदेश जो शक्यतो विनोदाच्या स्वरुपात असे किंवा मग व्यक्तीगत पातळीवरही असे. लवकरच ‘ऑर्कुट’ नावाचे सोशल नेटवर्क आल्यानंतर संवाद फक्त एकास एक न रहाता तो सामाजिक होऊ लागला आणि चॅटरुममध्ये केवळ अपरिचित लोकांशीच संपर्कात न येता पूर्वायुष्यातल्या सुपरिचित लोकांनाही शोधणे शक्य झाले. परिचितांशी संदेश देवाणघेवाण वाढल्याने जाणता-अजाणता भारतीयांचे मेंदू आपसूकच पुन्हा नैतिकतेच्या संकल्पनामध्ये गुरफटू लागले.


२००२ मध्ये सुरु झालेल्या प्रारंभिक क्रांतीचे दुसरे पाऊल पडता पडता आणखी एक दशक जावे लागले. २०१३ सालच्या दिवाळीत काही कंपन्यांनी माफक दरात स्मार्टफोन्स उपलब्ध करुन दिले, ज्यामुळे आगोदर वापरात असलेले पण जुने स्मार्टफोन आपोआपच सेकंड हँड मार्केटमध्ये विकले गेले आणि स्मार्टफोन्सची संख्या एकदमच दुप्पट झाली. साधारण एक वर्षानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये गुगलने स्पाइस, कार्बन आणि मायक्रोमॅक्स या कंपन्यांच्या सहकार्याने अ‍ॅन्ड्रॉइड वन या योजनेत अवघ्या चार ते पाच हजार रुपायांत मिळतील, असे स्वस्त स्मार्टफोन बाजारात उतरविले.


लवकरच २०१५ साल उजाडले आणि भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या संख्येने दहा कोटींचा आकडा पार केला. आता तरुण-वृद्ध असे मिळून फक्त पुरुषच नाही तर स्त्रियाही, आपला मानसिक अवकाश मोबाइलमध्ये शोधू शकत होत्या. एरवी अॅक्टिव्ह सेक्समधून रिटायर्ड झालेल्या पण डोक्यात आणि भावनांत अजूनही सेक्स शिल्लक असलेल्या पॅसिव्ह नववयोवृद्धांचीही संख्या या काळात वाढत होती. यात १९६० ते १९७० सालात जन्माला आलेल्या आणि मासिक पाळी बंद होऊन काही वर्षेच झालेल्या, पण अजूनही सेक्स डोक्यात असलेल्या स्त्रियांचीही संख्या मोठी होती. सेक्शुअ‍ॅलिटीचा अधूनमधून सुप्त असुप्तपणे विचार करणारी कोट्यावधींची एक मोठी लोकसंख्या आपल्या हातात फोन घेऊन उभी होती, ज्यांचे आयुष्य पूर्णतः बदलून टाकण्यासाठी एकमेवक गोष्टीची गरज होती ती म्हणजे स्वस्त डेटा.
स्वस्त डेटाने अनेक भारतीयांच्या सुप्त लैंगिक भावनांना वाट करुन दिली. ही वाट मिळाल्यानंतर भारतीयांच्या नैतिकतेचे नेमके अर्थ काय आहेत, हे मनोरंजन क्षेत्रांतल्या कंपन्यांना समजले. वरवर भारतीय समाज सार्वजनिक पातळीवर सेक्स बाबतीत बराचसा सभ्य वाटत असला, तरी त्याच्या वैयक्तिक पातळीवर सेक्सविषयी धारणा काय आहेत, याचा मोठ्या प्रमाणात डेटा बाहेर येऊ लागला होता. इंटरनेट पोर्नच्या बाजारात सर्वात मोठी कंपनी ‘पोर्नहब’च्या २०१७ सालच्या सर्वेक्षणानुसार भारत हा सर्वाधिक पोर्न पहाणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानी होता, त्यात पोर्न पहाणाऱ्यांत स्त्रियांची संख्या एकूण दर्शकांच्या तीस टक्क्यांपेक्षा अधिक नोंदली गेली. भारतीयांच्या पोर्न पहाण्याच्या आणि लैंगिकतेच्या इतर सवयींचा नेमका अभ्यास केल्यानंतर त्याचा परिणाम इतर माध्यमांमध्ये लवकरच पडू लागला होता. याच दरम्यान मुख्य धारेतल्या अनेक वर्तमानपंत्रांच्या ऑनलाइन एडिशन्सनी सेक्स या विषयाला वाहिलेल्या कंटेंटची निर्मिती सुरु केली, व्हीडिओ कॅसेट आणि सीडीच्या जमान्यात सॉफ्टकोअर चित्रपट बनविणारेआता ती बनविल्यानंतर सरळ युट्युबवर टाकू लागले. एकीकडे अ‍ॅडल्ट सर्टिफिकेटची पर्वा न करता मुख्य धारेतल्या अनेक चित्रपटांनी कामूक अथवा सेन्सेशनल विषयांना वाहिलेल्या चित्रपटांची निर्मिती सुरु केली, उच्चमध्यमवर्गीय कुटुंबातल्या काही स्त्री- पुरुषांनी आपले अंतर्वस्त्रातील फोटो बेधडक इन्स्टाग्रामवर टाकायला सुरुवात केली. फेसबुकवर अनेक स्त्रिया लैंगिक विषयावर लिहू लागल्या, ज्याचे पडसाद कालांतराने छापील वर्तमानपत्रे आणि पुस्तकांतही दिसू लागले.


आपल्या व्यक्तिगत फोनवर कामूक कंटेट पाहून सरसावलेले कितीतरी प्रौढ लोक आता टीव्हीच्या मोठ्या पडद्यावर आपल्या जोडीदारासोबत सेक्शुअ‍ल कंटेट एकत्र बसून पहाण्यास सरावली आहेत. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कुठलाही आडपडदा न रहाता या जोडप्याला एकत्र बसून आनंद घेता येईल ,अशा नव्या कुटुंबप्रधान पोर्नची निर्मिती भारतात सुरु झाली अाहे. त्याचे विविध प्रकार या वर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय स्मार्ट टिव्हीवर दिसू लागले आहेत. इंटरनेटवर सेन्सॉरशिपचे बंधन नसल्याने आणि नवा टीव्ही या इंटरनेटवर चालणारा असल्याने आगोदर सेन्सॉरशीपमुळे शक्य नसलेल्या, कितीतरी कल्पनांना मूर्त रुप देण्यासाठी निरनिराळे प्रॉडक्शन हाऊसेस पुढे सरसावले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला "नेटफ्लिक्स'ने भारतात आपला विस्तार वाढवायला सुरुवात केली. लैंगिकता हिंसा वा नैतिकतेची कुठलीही तमा न बाळगणाऱ्या आंतराष्ट्रीय सिरियल्स भारतीयांना दिवाणखाण्यात उपलब्ध करुन दिल्या. अनुराग कश्यप या दिग्दर्शकाने बनविलेली ‘सेक्रेड गेम्स’ ही सिरियल देशभर चर्चेचा विषय ठरली. हिंसा वा सामाजिकता विचारात न घेता फक्त सेक्स या विषयाला वाहिलेली "अल्ट बालाजी'च्या ‘ट्रिपल एक्स अनसेन्सर्ड’ या मालिकेने दर्शकांचा नवा उच्चांक गाठला.


सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ‘कामसूत्र’ लिहून वात्सायनाने सुरु केलेली सेक्सक्रांती आता स्मार्टफोन आणि आर्टिफिशीयल इंटेलिजेन्सच्या नव्या युगात प्रवेश करीत आहे. या आभासी पण पूर्णतः मुक्त लैंगिक स्वातंत्र्यात माणसाच्या लैंगिक भावनांचे नेमके काय होणार आहे हा प्रश्न अनेकांना पडतो आहे. बाजारात माणसासारखे हुबेहूब सेक्स रोबोटस आले आहेत. त्यातले काही रोबोटस मर्यादित प्रमाणात का होईना, पण माणसांप्रमाणे संवाद साधू लागले आहेत. लैंगिक स्वातंत्र्याच्या समांतर काळात स्त्रीस्वातंत्र्याचा लढा काही ठिकाणी पुरुषांचे अस्तित्व आणि गरज पूर्णतः नाकारु लागला आहे. एकाच वेळी आभासी लैंगिक स्वातंत्र्य वाढत राहिल्यास, आणि समांतर काळात स्त्री आणि पुरुषांमधली दरीही मोठी होत राहिल्यास पुरुष आपल्या शारीरीक सुखांसाठी स्त्रियांसारख्या रोबोटसवर अवलंबून रहातील आणि स्त्रिया शारिरीक सुखांसाठी कदाचित पुरुषांसारख्या दिसणाऱ्या रोबोटसला जवळ करतील. या वर्तमान काळाचे कामसूत्र लिहिणे माणसाला शक्य नसले, तरी ते यंत्राला सहजशक्य आहे. येऊ घातलेल्या रोबोयुगाच्या कामसूत्रात नेमका कुठल्या गोष्टींचा समावेश असावा, याबाबत वात्स्यायनाचा वारसा सांगणाऱ्या भारताने अजून व्यापक विचार सुरु केलेला नाही. अशा प्रसंगी मन, मेंदू आणि भावनांची कामरत झालेल्या स्त्री-पुरुषांनी साधलेली एकतानता ही सर्वोच्च लैंगिक सुखाची वात्स्यायनकृत व्याख्या आहे. त्या व्याख्येचा कालसुसंगत विस्तार घडवून लैंगिक स्वातंत्र्याचा नवा जाहीरनामा भारताला लिहावा लागणार आहे.

X