आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रापानुई बेटाची गोष्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रापानुई हे एकाच वेळी माणसांच्या सफलतेचे आणि विफलतेचे विशाल थडगे आहे. बेटावर हजारो दगडी पुतळे अजूनही इतस्ततः विखुरलेले आहेत, काहींची पुनर्स्थापना करण्यात आलेली आहे, तर असेंब्ली लाइनवर अडकून पडलेल्या अर्धवट पुतळ्यांना आता कुंपण घालण्यात आले आहे. भूतकाळातली ही गोष्ट वर्तमानकाळाशी पडताळताना दैवाच्या भरवशावर राहून निसर्गाची चाललेली हानी आणि प्रखर राष्ट्रवादाने भारलेले देश पाहता त्यांचे रापानुईसारख्या बेटांत रूपांतर होते आहे, असे काही समाजशास्त्रज्ञांचे म्हणणेे आहे. 

 

रापानुई खाऊनपिऊन सुखी असली तरी तिच्या सुखाचा शोध संपत नव्हता. शेती भरघोस उत्पन्न देत असली तरी तेच तेच अन्न खाऊन लोक कंटाळले होते. भर समुद्रात असूनही रापानुईच्या किनाऱ्यालगतचे पाणी त्या मानाने तसे थंड होते, त्यात प्रवाळ नव्हते. त्यामुळे विशेष मासेही नव्हते. 

 

आटपाट नगर होते. तिथे मारीरंगा नावाचा राजा राज्य करीत असे. त्याच्या नवप्रधान मंडळात होटुमाटू नावाचा प्रधान होता आणि टुकूल्हो नावाचा सेनापती. आटपाट नगराच्या शेजारी आणखी तीन नगरे होती, तिथेही काही राजे राज्य करीत होते आणि येता-जाता मारीरंगाच्या राज्यावर आक्रमण करीत होते. त्यांच्या या रोजच्या कटकटीला कंटाळून मारीरंगाने आपले नगर सोडून दुसऱ्या कुठल्या ठिकाणी आपले राज्य वसवण्याचे ठरवले. होटुमाटू आणि टुकूल्होच्या साहाय्याने मारीरंगा नव्या राज्याच्या शोधात समुद्रसफरीवर निघाला. काही दिवसांत सापडेल सापडेल असे म्हणत असताना त्यांना नवी भूमी शोधायला कैक महिने लागले, पण अखेरीस जुन्या नगरापासून हजार मैल दूर थेट महासागराच्या मधोमध, कुठल्याही प्रकारच्या आक्रमणापासून दूर असे बेट त्यांना सापडले. त्याला त्यांनी रापानुई असे नाव दिले. सुमारे आठशे वर्षांपूर्वी मारीरंगा जेव्हा या रापानुईला पोहोचला तेव्हा साक्षात इंद्रालाही लाजवेल असे राज्य त्याने ह्या बेटावर वसवण्याचे ठरवले. रापानुई हे बेट समुद्राच्या मधोमध असलेल्या ज्वालामुखीच्या विस्फोटातून बनलेले होते. त्याच्या मृत ज्वालामुखीच्या तोंडावर आता तीन तळी उगवून आली होती ज्यावर गोडे पाणी होते. कधीकाळी ज्वालामुखीतून बाहेर आलेल्या सुपिक मातीत मोठमोठी झाडे, अनेक झुडपे आणि गवत उगवून आलेले होते. पूर्णतः जंगलाने आच्छादलेल्या त्या बेटावर झाडावर खोपे बांधून जगणाऱ्या पक्ष्यांच्या पंचवीस प्रजाती होत्या, जमिनीवर राहणाऱ्या पक्ष्यांच्या सहा प्रजाती होत्या, किनाऱ्यावर सील मासे होते आणि असंख्य खेकडे आणि जिवंत शिंपल्यांनी रापानुईचा समुद्रकिनारा व्यापून गेला होता. 


इथे राज्य वसविण्याचे ठरवल्यानंतर सर्वप्रथम होटुमाटूने रापानुईच्या एका भागातली जंगले सपाट करून तिथे शेतीयोग्य जमीन बनवली, मग टूकूल्होने त्या जमिनीवर काम करण्यासाठी मजूर आणले. सुरुवातीला मजुरांना खाण्यासाठी तिथे खुप सारे प्राणी-पक्षी उपलब्ध असल्याने ते आनंदात होते. डोंगरमाथ्यावर असलेल्या तळ्यांमधून कालव्याने पाणी खाली आणून शेतीची भरभराट सुरु झाली होती. समुद्रावरून येणारा वाहता वारा सोबत अनेक क्षार आणून त्याची छानशी दुलई ह्या शेतांवर अंथरत होता. क्षार मिळाल्याने शेतीतली पिके जोमाने वाढत होती, वाढत्या उत्पादनाने रापानुईच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवला होता. मारीरंगाच्या पुढच्या पिढ्या रापानुईवर सुखनैव राज्य करीत होत्या. लवकरच शेतीत आणखी प्रगती झाली. तिथे रताळी आणि कंदमुळाच्या शेतीखेरीज केळीच्या बागाही फुलू लागल्या. ह्या बागांसाठी जंगलांचा आणखी काही भाग तोडला गेला. जंगले तोडण्यात होटूमाटूच्या वारसांनी पुढाकार घेतला. रताळ्याचा आसट शिरा आणि केळीची शिकरणे खाऊन लोक सुखावले, लेकरबाळं आनंदात राहू लागली. 


आणखी काही दिवस गेले आणि लवकरच यशस्वीरित्या इथे हळदीचेही उत्पादन शक्य झाले. एकदा असा मसाल्याचा पदार्थ आहारात आल्यानंतर जेवण अधिक रुचकर झाले, कंदमुळांची लोणची घातली जाऊ लागली, जंगलातून पकडून आणलेल्या प्राण्यांचे मांस शिजतांना त्यात घातलेल्या हळकुंडामुळे येणारा घमघमाट संपूर्ण बेटावर पसरु लागला. मग एकदा कुणीतरी बेटावर ऊस आणला. सुरुवातीला कमी पाण्यामुळे ऊसाची शेती तशी व्यवस्थीत चालली नाही. त्यासाठी जमीनीतून वाहाणाऱ्या जिवंत झऱ्यांजवळची जमीन निवडण्यात आली, जंगलाला फुकट जाणारे पाणी वळवून ते ऊसासाठी वापरले जाऊ लागले. पाण्याविना तहानेने जंगलातली झाडे रोडावली, पाणी पिऊन ऊस फोफावला. ऊसाचा रस रताळ्याच्या शिऱ्याला गोडवा देऊ लागला, लोक खाऊन सुखावले, ऊसाच्या रसाला आंबवून छान दारु बनू लागली, लोक पिऊन सुखावले. लवकरच रापानुई एक खातेपिते आणि संपन्न फाईव्हस्टार राष्ट्र बनले. त्याच्या किनारपट्टीवर, डोंगरावर आणि पठारांवर हजारो लोकांनी घरे बांधली. मारीरंगाच्या वंशजांनी आपल्या आद्यपुरुषाचे स्वर्ग वसविण्याचे स्वप्न पूरे केले होते, त्यासाठी होटुमाटूच्या वंशजांनी दिर्घकालीन योजना आखल्या होत्या आणि टुकूल्होच्या वंशजांनी मजुरांवर आपला वचक ठेवून त्यांच्याकडून इमानदारीने चाकरी करवून घेतली होती.


रापानुई खाऊनपिऊन सुखी असली तरी तिच्या सुखाचा शोध संपत नव्हता. शेती भरघोस उत्पन्न देत असली तरी तेच तेच अन्न खाऊन लोक कंटाळले होते. भर समुद्रात असूनही रापानुईच्या किनाऱ्यालगतचे पाणी त्या मानाने तसे थंड होते, त्यात प्रवाळ नव्हते त्यामुळे विशेष मासेही नव्हते. मासे पकडण्यासाठी होडीत बसून बेटापासुन बरेच दुर खोल समुद्रात जाणे आवश्यक होते, एरव्ही असे साहस कुणी करते ना, पण रापानुईचे लोकं कधीकाळी ह्या बेटावर होडीतच बसून आले होते अशी कुणीतरी कथा सांगितली. ज्या होडीत ते बसून आले होते ती पाम झाडांच्या बुंध्यापासून बनविली जाते अशीही माहिती समोर आली. तोपावेतो जंगले सपाट झाली असली तरी पामची बरीच झाडे शिल्लक होती. माणसे इथे येण्यापूर्वीपासून ती तिथेच उगवून येत होती. मुख्य भूमीपासून हजारो मैल दूर असल्याने इथली विशाल पाम झाडे जगात इतरत्र कुठे कधी उगवली नव्हती. ती इथेच जन्माला आली, इथेच मोठी झाली आणि इथेच आता आपल्या भवितव्याचा विचार करीत उभी होती. ही झाडे तोडण्यासाठी रापानुईच्या नागरिकांनी नवनवीन अवजारे बनविली, लाकुडतोड्यांनी अवजारांच्या सहाय्याने झाड तोडल्यानंतर दुसऱ्या  अवजारांच्या साहाय्यांने त्यापासून होडी बनविणारे सुतार तयार झाले, ह्या होड्यांसाठी वेलींचे दोरखंड बनविणारे तयार झाले, ह्या होड्या समुद्रात नऊन मासेमारी करणारे कोळी तयार झाले. लवकरच ह्या होड्या खोल समुद्रात जाऊन परत येताना भरभरुन मासे घेऊन येऊ लागल्या. चविष्ट अन्नाच्या शोधात असलेल्या श्रीमंतांच्या अन्नांत वैविध्य आले. मासे, लॉबस्टर्स, शिंपले, कासवे, आणि इतर असंख्य प्रकारचे जलचर लोक मिटक्या मारीत खाऊ लागले. पाम झाडांच्या बुंध्यापासून होड्या बनवेपर्यंतही तसे व्यवस्थित सुरू होते, पण प्रत्येकवेळी समुद्रात जाणारी होडी मासे घेऊनच येईल असे नव्हते. कित्येकदा कोळ्यांना रिकाम्या हाती परत यावे लागे. कधी मासे जास्त मिळणे, कधी कमी मिळणे किंवा अजिबातच न मिळणे हा नशिबाचा भाग आहे असे काहींना वाटले. आता नशिब आले म्हणजे दैव आले आणि दैव आले म्हणजे देव आला. वरचेवर डोंगरात जाउन तिथल्या खडकांमध्ये फिरणाऱ्या रापानुईच्या लोकांना त्या खडकात देव दिसू लागले. माणसांसारखाच चेहरा पण विशाल आकार असणारे देव. हे महान देव त्या खडकांतून कोरुन मग किनाऱ्यालगतच्या गावात आणून त्यांचे पुतळे उभारले जावे अशी शक्कल कुणीतरी मांडली. मारीरंगाचा थेट वंशज असलेल्या राजाचे हे प्रथमकर्तव्य आहे असे नागरिकांचे म्हणणेे पडले, दगडांचे हे विशाल देव रापानुईचे आद्यदैवत आहे, असा होटुमाटूच्या वंशजानी शोध लावला आणि हे पुतळे उभारण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण कार्यरत राहू अशी प्रतिज्ञा टुकूल्होच्या वंशजांनी आणि त्याच्या सैन्यानी केली. यथावकाश पुतळ्यांचे निर्माणकार्य सुरु झाले. डोंगर फोडून त्यातून छिन्नी हतोड्याच्या मदतीने विशाल कातळशिल्पे बाहेर काढली जाऊ लागली, जाड बुंध्याची झाडे तोडून त्यांच्या गोल ओंडक्यांवर ही शिल्पे खाली आणली जाऊ लागली, किनाऱ्यालगतच्या गावांत चबुतऱ्यांवर त्यांची प्रतिष्ठापना होउ लागली. 
पुतळे बनविण्याची ही अ‍ॅसेम्ब्ली लाईन सुरु झाली आणि असंख्य रिकाम्या हातांना काम मिळाले. सुतार, कोळ्यांसोबतच आता दगडकाम करणारे आणि दगड वाहून आणणारे मजुरांचे नविन प्रकार तयार झाले. पुतळ्यांचे कार्य सुरु झाल्यापासून माशांचीही आवक वाढली, वाढती आवक पाहून देव आपल्याला खरोखर प्रसन्न झाला अशी रापानुईच्या लोकांची खात्री झाली. ह्या देवांना भरपूर गुळ टाकलेला रताळी आणि केळ्यांचा शिरा, माशांचे शेलके तुकडे आणि कोंबड्यांचे मास नैवेद्यात देण्याची पद्धत सुरु झाली. लोक चविष्ट खाण्याला, ऊसाची दारु पिण्याला आणि पुतळ्यांसमोर रोज रात्री नाचगाणी करायला चटावले. काही वर्षे अशी गेली आणि पुन्हा एकदा माशांचा तुटवडा जाणवू लागला, समुद्रात वरचेवर बदल होत रहातात आणि त्यामुळे त्यातल्या जलचरांचे अधिवास बदलत रहातात हे रापानुईच्या लोकांना माहिती नव्हते. त्यांनी ह्या समस्येसाठी पुतळ्यांना कौल लावले, भजने म्हंटली आणि तरीही माश्यांची आवक काही वाढेना. राजा आणि त्याच्या नवप्रधान मंडळीनी मिटींग बोलावली. माशांच्या प्रत्येक बोटीचे उत्पन्न कमी होत असल्याने बोटींची संख्या वाढविण्याचे ठरले, बोटींची संख्या वाढवायची म्हटले तर उरलीसुरली पाम झाडे तोडावी लागणार होती, आपण असे करु नये आणि निदान आता थोडी झाडे तरी राहू द्यावीत असे काही लोकांचे म्हणने होते पण नवप्रधानांतल्या टुकूल्होच्या वंशजाना ते काही पटेना. त्यांना माशांच्या उत्पन्नात वृद्धी हवी होती. 
 

लवकरच आदेश निघाला आणि बेटावरची शक्य तितकी पाम झाडे तोडून त्यापासून होड्या बनविल्या गेल्या, होड्यांची संख्या वाढली तशी माशांची आवक वाढली, देव प्रसन्न झाला म्हणून नगरवासी आनंदीत झाले आणि त्यांनी पुतळ्यांचे निर्माणकार्य आणखी जोमाने सुरु केले. गरज पडल्यास बाहेरुन माणसे आणली गेली, पुतळ्यांची अ‍ॅसेंम्ब्ली लाईन दर अमावस्येला एक नवा पुतळा उभारु लागली. दरम्याने बेटावर नव्याने दाखल झालेल्या लोकांसोबत आणखी एक जीव दाखल झाला, तो म्हणजे पॉलेनेशियन उंदीर. 

 

रापानुईवर दाखल झाल्यानंतर पॉलेनिशयन उंदराला खाणारा कुठलाही नैसर्गिक शिकारीप्राणी शिल्लक नसल्याने उंदरांची संख्या जोमाने वाढू लागली, लवकरच ही संख्या काही लाखांच्या घरात गेली. उंदरांनी उरलीसुरली पाम झाडे खाऊन संपविली आणि नंतर आपला मोर्चा अन्नधान्यांकडे वळवला. शेतातल्या उभ्या पिकावर उंदरांचा हल्ला होउन मोठी नासाडी होऊ लागली. ह्या संकटामुळे देवाचा मोठा कोप झाला आहे असे वाटून रापानुईच्या राजाने पुतळ्यांचे निर्माणकार्य आणखी जोरात सुरु केले पण त्याचा उपयोग झाला नाही. लवकरच रापानुईवरचे एकुण एक झाड नष्ट होऊन तीचे एका सपाट पण हिरव्या वाळवंटात रुपांतर होऊ लागले, समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्याने सोबत आणलेल्या क्षारांमुळे जमीन आता खारट आणि नापिक होऊ लागली होती. पाण्याची पातळी कमी झाल्याने सर्व जमिनीवर धुळ साचू लागली.  झाडे शिल्लक नसल्याने लाकूडतोड्यांचा रोजगार गेला तसा होड्या बनविणाऱ्या सुतारांचाही गेला. दरम्यान माशांची आवक पुन्हा घटली, शेतीतून पुरेसे उत्पन्न येत नसल्याने लोक भुकेने तडफडू लागले, भूकेपोटी उंदीर खाऊ लागले. मारीरंगाच्या वंशजाचा देवांना प्रसन्न करता येईल हा विश्वास कायम होता त्यामुळे पुतळ्यांचे निर्माण कार्य व्यवस्थित सुरू रहाण्यासाठी होटुमोटूचे वंशज पूर्ण काळजी घेत होते, भुकेने व्याकुळ लोकांनी जेंव्हा राजाची आज्ञा माणण्याला नकार दिला तेंव्हा होटूमोटूच्या वंशजांच्या सैन्यांनी त्यांची कत्तल सुरु केली. सर्वत्र अराजक पसरू लागले, राजाला राज्य चालविणे अवघड होऊ लागले आणि पुतळ्यांचे निर्माणकार्य बंद पडले. डोंगरात अर्धवटच खोदलेले काही पुतळे तसेच पडून राहिले, काही उतारावरच्या रस्त्यावर पडून राहिले तर काही नगराच्या वेशीवरती. लोकांचा राजावरुन, देवावरुन विश्वास उडाला, पुतळ्यांसमोर जाउन लोक हा ‘देव नाही, दगड आहे दगड’ असे जोरजोराने म्हणू लागले. सतत उंदीर खाल्ल्याने त्यांचा स्वभाव बदलू लागला, त्यांच्यात भांडणे होऊ लागली, पुढेपुढे एकेकट्या माणसांवर इतर लोक टोळ्यांनी हल्ले करु लागले आणि त्यांना मारुन त्यांचे मांसही खाऊ लागले. रापानुई एक जिताजागता नरक झाला. बाह्यजगापासून हजारो मैल दूर असल्याने त्यांच्या मदतीसाठी कुणीही आले नाही आणि बरेचसे लोक बेटावरच अडकून पडले, दिवस ढकलीत जगत राहिले.


तिथल्या किनाऱ्यावर आतल्या बाजूने तोंड असलेले एक हजार पुतळे आजही उभे होते, पण त्या पुतळ्यांचे दैवत्व नाकारुन लोकांनी एक नवा देव निर्माण केला. हा देव माणसांसारखाच दिसत असला तरी त्याला उडण्याचे सामर्थ्य लाभले आहे असा लोकांचा समज होता. तंगाता मनू म्हणजेच पक्षीमानव ह्या देवावर लवरच रापानुईचे लोक विश्वास ठेवू लागले. पुतळ्यांचे दैवत्च नाकारुन लोक आता नव्या देवाला भजू लागले होते. पक्षीमानव हा तिथल्या लोकांच्या आकांक्षाचे प्रतिक बनला. इथून निघणे कुणाला सहजशक्य नव्हते त्यामुळे इथून उडून जाता आले तर किती बरे होईल अशा कल्पनेत लोक जगू लागले. बर्डमॅनवर त्यांची श्रद्धा होती. दरम्यान बाहेरच्या जगात एकोणिसावे शतक सुरु झाले होते. युरोपातले अनेक लोक साम्राज्यविस्तारासाठी नवनवे प्रदेश शोधत होते, अशाच एका शोधमोहीमेत डच दर्यावर्दी जेकब रोग्गेवीनला  उगवत्या काळातल्या रापानुई बेटाचा शोध लागला होता. त्यावेळी रापानुईची लोकसंख्या तीन एक हजाराच्या आसपास होती, तो युरोपात परत जाऊन त्याच्या माहितीतून प्रेरीत होऊन पन्नास वर्षांनंतर १७७० साली फिलीप गोन्झेलीज डे अहेडो ह्या स्पेनीश नाविकाने रापानुईला भेट दिली. ह्यावेळी रापानुईच्या लोकांनी पुतळ्यांकडे पुर्णतः दुर्लक्ष केले होते, जणू त्यांचा देव आता मेला होता. पुढे दोन वर्षानंतर कॅप्टन कुक ह्या प्रसिद्ध ब्रिटीश दर्यावादीने रापानुईला भेट दिली तोवर बेटाच्या व्यवस्थेची बरीच वाताहत झालेली होती.  


जगभर वसाहतवाद वाढत होता आणि ह्या वसाहतीच्या उत्पादनांचा वेग वाढविण्यासाठी अकुशल पण गुरांसारखे काम करण्याऱ्या गुलामांची गरज होती. जगभर पसरत चाललेल्या साम्राज्यवाद १८६० साली इथे दाखल झाला. रापानुईवरच्या माणसांना गुलाम करण्यासाठी त्यांना पहिल्यांदा वसाहतीच्या धर्म समजावण्याची आणि त्याला विरोध करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची पद्धती इथेही अवलंबिण्यात आली. शेकडोंच्या कत्तली केल्या गेल्या आणि उरलेल्यांना मुख्यभूमीतल्या नारळांच्या बागांमध्ये काम करण्यासाठी नेण्यात आले. वसाहतीने जगाला दिलेल्या सिफीलीस आणि देवीचा आजारांनी ह्या लोकांना ग्रासले आणि उरल्यासुरल्या लोकसंख्येचा त्यात अंत झाला. यथावकाश गुलामीची पद्धती बंद झाली खरी पण तोवर रापानुईची लोकसंख्या अवघी एकशे अकरा लोकांवर आली होती. ते बेट प्रशांत महासागराच्या मधोमध आजही उभे आहे, रापानुई हे स्थानिक नाव असलेल्या बेटाला जगभर इस्टर आयलंड्स म्हटले जाते. चिली देशाच्या मुख्य भूमीपासून साडेतीन हजार किलोमीटर दूर असलेल्या ह्या बेटावर असंख्य मानववंशशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवाद्यांचा राबता असतो. रापानुई हे एकाच वेळी माणसांच्या सफलतेचे आणि विफलतेचे विशाल थडगे आहे. बेटावर हजारो दगडी पुतळे अजूनही इतस्तहः विखुरलेले आहेत, काहींची पुनर्स्थापना करण्यात आलेली आहे तर अ‍ॅसेंब्ली लाईनवर अडकून पडलेल्या अर्धवट पुतळ्यांना आता कुंपण घालण्यात आले आहे. देव मरतो म्हणजे नेमके काय होते? हे कळण्यासाठी जगभरातले लोक इस्टर आयलंडला भेट देत असतात. लोक हिंसक होतात तेंव्हा काय करतात, पर्यावरणाचा र्‍हास होतो म्हणजे काय होते? व्यवस्था कोसळते म्हणजे नेमके काय होते? ह्या प्रश्नांचीही उत्तर काही लोक इथे येऊन शोधत असतात. भुतकाळातली ही गोष्ट वर्तमानकाळाशी पडताळतांना दैवाच्या भरवश्यावर राहून निसर्गाची चाललेली हानी आणि प्रखर राष्ट्रवादाने भारलेले देश पाहाता त्यांचे रापानुईसारख्या बेटांत रुपांतर होते आहे असे काही समाजशास्त्रज्ञांचे म्हणणेे आहे. त्यांचे म्हणणे कितपत खरे कितपत खोटे हे आता येणारा काळच ठरवेलच. साठा उत्तरांची ही कहाणी पाचा उत्तरी निष्फळ आणि अपूर्ण ठेवायची की सुफळसंपूर्ण करायची हे आता आपल्याला ठरवावे लागेल.

 

संदर्भ :
कोलॅप्स - जेरेड डायमंड - पेंग्विन प्रकाशन
द मिस्टरी ऑफ ईस्टर्न आयलंड - कॅथरीन राउटलेज
रिथिंकिंग फॉल ऑफ इस्टर्न आयलंड - टेरी हंट - अमेरिकन सायंटिस्ट
ब्रिटीश म्युझीयम प्रेस
रापा नुई नॅशनल पार्क - संयुक्त राष्ट्रे
इंटरनॅशन ऑब्झर्वर्स मिशन ऑफ रापानुई
 

लेखकाचा संपर्क - ९८९०९२०२९९
 

बातम्या आणखी आहेत...