आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोभी नजरेचे इशारे आणि संस्कृतीचे आदिम बाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म व्यवस्था, राज्य व्यवस्था आणि भांडवलशाहीप्रणीत बाजारव्यवस्था हे तीन घटक परस्पर हितसंबंधांच्या जपणुकीसाठी एकत्र येतात. त्यासाठी बनाव रचून युद्ध पुकारतात, देशांच्या सीमारेषा आखतात, देश-जमिनी, समूह ताब्यात घेतात. कुणी धर्मवेडा अमेरिकी तरुण निकोबार बेटांवर हजारो वर्षांपासून वस्ती करून असलेल्या सेंटिनलिज जमातीला धर्माच्या जाळ्यात ओढण्यासाठी जातो आणि आपले प्राण गमावतो, त्यामागे याच शक्ती कार्यरत असतात. नागरी समाजाच्या अमर्याद स्वार्थ आणि लोभाचे बीभत्स रूपच यानिमित्ताने पुढे आलेले असते. त्याचाच हा लेखाजोखा...

 

सेंटिनलिज  बेटांवरचा मानवसमूह आजही अश्मयुगात जगतोय. हे लोक धर्मसंकल्पना मानत नाहीत, त्यामुळे त्यांच्या बेटांवर धार्मिक स्थळांवरून भांडणे होत नसावीत. हे लोक राष्ट्रसंकल्पना मानत नाहीत, त्यामुळे पोटची भाकर कमी करून त्यांना युद्धसामग्रीवर खर्च करावा लागत नाही...


रताच्या मुख्य भूमीपासून दूर अंदमान बेटांच्या समूहातल्या एका उत्तरीय बेटावर सेंटिनलिज (मानववंशशास्त्रज्ञांनी बेटाच्या नावावरून दिलेली ओळख) जमातीची वस्ती आहे. हे लोक तिथे साठ हजार वर्षांहून अधिक काळापासून राहत असावेत, असा कयास आहे. या मोठ्या कालखंडात सेंटिनलिज लोकांची जीवनपद्धती ही बरीचशी अश्मयुगीन कालखंडाप्रमाणेच राहिली आहे. त्यांना धातुंचे उत्पादन वा त्यांच्या वापराचे ज्ञान नाही. हजारो वर्षे मुख्य भूमीपासून दूर राहिल्या नागरी वस्तीत असलेल्या आजाराशी त्यांची जनुकीय ओळख नाही, त्यामुळे या आजारांप्रती त्यांची रोगप्रतिकारक शक्ती शून्य आहे.  त्यांच्याशी बाह्यजगातला माणूस संपर्कात आल्यास त्यांना कांजण्या व गोवरसारखे आजार झाल्याने त्यांचा पूर्ण समूह नष्ट होऊ शकतो, हा धोका ओळखून भारत सरकारने त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क करण्यास मज्जाव केला आहे. सेंटिनलिज  लोकांचे बेट हे सगळ्यांसाठीच प्रतिबंधित असून तिथे कुणालाही जाण्याची परवानगी नाही. 
जगभरातल्या अशा दूरस्थ कोपऱ्यांमध्ये एकाकी जीवनपद्धतीत जगणाऱ्या समूहांच्या प्राकृतिक आवासांचे आणि बाह्यजगापासून होणाऱ्या हस्तक्षेपापासून संरक्षण करण्याचे काम ‘सर्व्हायव्हल इंटरनॅशनल’ ही संस्था करते. या संस्थेने वेळोवेळी जाहीर केलेल्या आर्जवांना न जुमानता आणि भारतीय सरकारचे नियम डावलून जॉन अ‍ॅलन चाऊ या अमेरिकी युवकाने सेंटिनलिज  बेटावर जाऊन चौदा नोव्हेंबर रोजी तिथल्या माणसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जॉन चाऊच्या दिशेने बाण मारला, ज्यातून जॉन थोडक्यात बचावला. हल्ला होऊनही शहाणपण न आलेल्या जॉनने पुन्हा अगोचरपणा केला आणि पंधरा नोव्हेंबर रोजी सेंटिनलिज लोकांकडून त्याला जिवे मारण्यात आले. त्याचा मृतदेह त्याच बेटावर जमिनीत पुरण्यात आला. 
जॉन चाऊच्या मृत्यूनंतर आंतराष्ट्रीय माध्यमांत त्याचे पडसाद उमटले, सेंटिनलिज  मानव समूहाच्या बातम्या आणि त्यांच्या जीवनपद्धतीविषयी बरीच चर्चा झाली आणि एका क्षणानंतर ही घटना विस्मृतीत गेली. आंतरराष्ट्रीय माध्यमांकरिता पुढची मोठी बातमी ही "नासा'ने मंगळ ग्रहावर पाठवलेल्या ‘इनसाइट' या लँडिंग रोबोटची होती. या आठवड्याच्या सुरुवातीला इनसाइट मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले आणि काही तासांतच मंगळावरच्या जमिनीचे फोटो पाठवायला सुरुवात केली.


अंदमान-निकोबारच्या सेंटिनलिज मानवसमूहांच्या मानसिकतेत आणि मंगळावर वस्ती करू पाहणाऱ्या मानवसमूहांच्या मानसिकतेत डोकावून पाहिले तर एक समान धागा आपल्याला निश्चित दिसून येतो. तो म्हणजे, नवनव्या जागा पादाक्रांत करून तिथे माणसाची वस्ती वसवण्याचा. अवघ्या दोन लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत जन्माला आलेल्या या प्राण्याच्या प्रजातीने थेट मंगळावर वस्ती बनवण्याचे स्वप्न पाहावे, हा या ग्रहाच्या पंचेचाळीस कोटी वर्षांच्या इतिहासातला सर्वात मोठा चमत्कार म्हणायला हवा.


मुळात माणूस इतका सामर्थ्यशाली झालाच कसा, या प्रश्नाचे उत्तर शोधायचे झाल्यास त्याचे श्रेय माणसाच्या कल्पनाशक्तीला द्यावे लागेल.
माणसे आपल्या कल्पनाशक्तीने कथासंकल्पना रचतात आणि त्यांचा वापर करून या कथासंकल्पनांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा समूह निर्माण करतात. एकदा असा समूह निर्माण करणे शक्य झाले म्हणजे मग एकट्या माणसाला कधीच शक्य झाल्या नसत्या, अशा असंख्य गोष्टींची मानवाला निर्मिती करणे शक्य होते. या जन्मात पाप केल्यास पुढचा जन्म वाईट मिळतो किंवा परमेश्वर निवाडा करताना पापी माणसाला नरकात टाकतो, अशा कथेतून धर्मसंकल्पनेची निर्मिती होते. धर्मसंकल्पनांमध्ये नीती आणि अनीतीचे नियम आणि ते न पाळल्यास देवाकडून मिळणाऱ्या शिक्षेविषयी बरेच काही सांगितलेले असते. धर्मसंकल्पना ही किमान दहा हजार वर्षे तरी जुनी आहे. या संकल्पनेसोबत दुसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे राष्ट्रसंकल्पना होय. एका कागदावर जमिनीचा भौगोलिक नकाशा काढून त्यावर काल्पनिक रेषा आखल्यानंतर राष्ट्रांची निर्मिती होते. ठराविक लोक सोडल्यास एकमेकांना अजिबात न ओळखणाऱ्या कोट्यवधी लोकांना एकत्र आणण्याचे काम राष्ट्रसंकल्पना करते. धर्मसंकल्पना आणि राष्ट्रसंकल्पना या दोन महत्त्वाच्या संकल्पनांपेक्षाही मोठी संकल्पना कुठली असेल तर ती आहे पैशांची संकल्पना. पैशांची संकल्पना ही धर्माच्या आणि राष्ट्रांच्या संकल्पनेपेक्षाही जास्त यशस्वी आहे. ती समजावून घ्यायची असल्यास आपल्याजवळची एक शंभर रुपयांची नोट वा दहा डॉलरची नोट घेऊन तिला काड्यापेटीने जाळून टाकावे. पैसा जाळण्याची नुसती कल्पनाही अनेकांना डिस्टर्ब करू शकते. शंभर रुपयांऐवजी दहा रुपयांची नोट जाळण्यासही माणसाचे मन सुखासुखी तयार होणार नाही. आपण पैशांच्या संकल्पनेत किती खोलवर बुडालेले आहोत, याचा प्रत्यय इथे यावा.


आधुनिक धर्मसंकल्पनांचा शोध जास्तीत जास्त दहा हजार वर्षे जुना आहे, पैशांची संकल्पना आणि त्याचा विस्तृत वापरही, फार अलीकडचा आहे. कोट्यवधी माणसांचे बळी आणि दोन महायुद्धे लढल्यानंतर आज तिसऱ्या महायुद्धाची तयारी करणाऱ्या राष्ट्रांच्या संकल्पनाही काही हजार वर्षेच जुन्या आहेत, त्यातल्या काही तर शंभर वर्षांहूनही कमी वयाच्या आहेत. या तिन्ही संकल्पना कथात्मक असल्या तरी आज जगातल्या कोट्यवधी लोकांचे दैनंदिन आयुष्य त्यावर आधारित आहे, कित्येकांचे जगणे-मरणेसुद्धा फक्त या तीन संकल्पनांनुसार चालते. वर्तमान काळातल्या माणसाच्या सुखाच्या विविध व्याख्या या तीन संकल्पनांच्या अवतीभोवती गुंफलेल्या आहेत. या सुखाच्या व्याख्येत काही कमतरता आल्यास वा चुका झाल्यास माणूस दु:खी होतो, त्यामुळे वर्तमान काळात दु:खासाठीही याच संकल्पना मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असतात.


एकीकडे हजारो वर्षांपासून सुखाच्या शोधात माणूस अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला, परंतु त्याला अजूनही सार्वकालिक सुखाचा शोध लागलेला नाही. सुखाच्या शोधात सामर्थ्यवान झाल्याने माणसांनी पृथ्वीचे मात्र मोठे नुकसान करून ठेवले आहे. लाखो वर्षांपासून अगदी व्यवस्थित जगलेल्या अनेक प्रजातींना माणसाच्या सुखाच्या लालसेने या पृथ्वीवरून कायमचे नष्ट केले आहे. संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत पृथ्वीवरचे साठ टक्क्यांहून अधिक जीवन नष्ट झाले असून उरलेले जीवनही लवकरच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सतत सुखाच्या शोधात राहण्याच्या अट्टहासातून या ग्रहावरचे प्रदूषण वाढल्याने इथले अवघे जीवनच धोक्यात आले आहे. या विनाशाची जबाबदारी संकल्पनांच्या आधाराने जगणाऱ्या प्रत्येक माणसावर येऊन पडते, पण याला सेंटिनलिज  समूहाचे लोक नक्की अपवाद आहेत.
संकल्पनांच्या आधारे सुखाचा शोध घेत विध्वंसाच्या वाटेवर येऊन पोहोचलेल्यांना ही परिस्थिती बदलणे अधिकाधिक अवघड होत असताना सेंटिनलिज  बेटांवरचा मानवसमूह आजही अश्मयुगात जगतोय. हे लोक धर्मसंकल्पना मानत नाहीत, त्यामुळे त्यांच्या बेटांवर धार्मिक स्थळांवरून भांडणे होत नसावीत. हे लोक राष्ट्रसंकल्पना मानत नाहीत, त्यामुळे पोटची भाकर कमी करून त्यांना युद्धसामग्रीवर खर्च करावा लागत नाही. हे लोक पैशांची संकल्पनाही मानत नाहीत, त्यामुळे या इन्क्रिमेंटला बॉस नेमका किती पगार वाढवेल, यासाठी त्यांना रात्र- रात्र जागून काढावी लागत नाही. या बेटांवर बाहेरच्या जगातला माणूस अद्याप पोहोचलेला नसल्याने तिथे संपर्काचे कुठलेही माध्यम उपलब्ध नाही, त्यामुळे लोक तोंडानेच संवाद करत असावेत आणि त्यामुळे इतरांनाही त्यांच्या भावना समजावून घेता येत असाव्यात. अंदमानच्या सेंटिनलिज समूहाची संख्या अवघी दोनशे वा त्यापेक्षा कमी असावी, असा कयास आहे. प्रख्यात मानवंशशास्त्रज्ञ रुबीन डन्बार यांनी केलेल्या एका संशोधनानुसार एका वेळी माणूस जास्तीत जास्त १५० लोकांशी मैत्रीपूर्ण वा नात्यांतून येणारे संबध प्रस्थापित करू शकतो. म्हणजे, नात्यांमध्ये ओलावा व मैत्रीत शाश्वती हवी असेल तर अशा माणसांची नाती दीडशे लोकांच्या पलीकडे जायला नको. हे संशोधन ग्राह्य मानायचे ठरल्यास सेंटिनलिज  लोकांमध्ये अंतर्गत नातेसंबध कमालीचे मजबूत असले पाहिजेत, त्यांच्यात घटस्फोटांचे प्रमाण हे जवळजवळ शून्य असेल आणि त्यांना पाच हजार फ्रेंड्स वा दहा हजार काँटॅक्ट्सची नावे लक्षात ठेवावी लागत नसल्याने त्यांचा इतर माणसांबरोबरचा संवाद बराचसा अर्थपूर्ण असणार.


त्या बेटावर गेलेले कुणीही आजपर्यंत जिवंत परत आलेले नाही, हे वास्तव ठाऊक असूनही जॉन अ‍ॅलन चाऊ या अमेरिकी तरुणाने काही मासेमारांच्या साहाय्याने या बेटावर जाण्याचा प्रयत्न केला. जगातल्या केवळ या भागात अजूनही देवाचे वचन पोहोचलेले नाही आणि अजूनही सैतानाचेच राज्य आहे, त्यामुळे या लोकांना परमेश्वरासंबंधी व धर्मासंबंधी सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असा जॉन चाऊ याला विश्वास होता. या बेटावर गेल्यानंतर सेंटिनलिज लोकांनी त्याच्यावर हल्ला केला, ज्यातून जॉन  बचावला. हल्ल्यानंतरही त्याने मागे न फिरता सेंटिनलिज लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्याने देवाची भजने आणि वचने म्हणून दाखवली. त्याच्या तिथे येण्याला पूर्णतः विरोध करून सेंटिनलिज  जमातीने त्याला जिवे मारले आणि त्याचा मृतदेह तिथेच दफन केला.


जॉन चाऊच्या हत्येनंतर माध्यमांनी या बातमीचे अनेक अंगांनी विश्लेषण केले. अनेकांनी या बेटावर कुणीही हस्तक्षेप करू नये, असे पुन्हा एकवार सांगितले, तर काहींनी या लोकांना मुख्य धारेत आणून त्यांचा विकास घडवावा असेही ‘उदारमतवादी’ वक्तव्य केले. माणसाच्या एकूण इतिहासाकडे नजर टाकता जॉन चाऊ हा धर्मसंकल्पनेने भारावून गेलेला माणूस होता हे निश्चित. त्याच्या मारल्या जाण्यानंतरच्या विश्लेषणात सेंटिनलिज  लोकांनाही आधुनिक विकासाच्या कक्षेत आणावे, असे म्हणणारे लोक राष्ट्रसंकल्पनेने भारावलेले (खरं तर पछाडलेले) आहेत, हेही निश्चित. या प्रसंगाची बातमी बनवून, ती पुन्हा पुन्हा प्रसारमाध्यमांत चालवणारे लोक पैशांच्या संकल्पनेत व्यग्र आहेत, हेही निश्चित.


त्यामुळेच या घटनेकडे वस्तुनिष्ठतेने पाहिल्यास सेंटिनलिज मानवसमूह आणि मंगळावर वस्ती करू इच्छिणारा मानवसमूह यात कमालीचे साम्य दिसून येते. कुठल्याही संकल्पनेच्या भ्रमात न पडता आपला ‘आवास’ बनवणे आणि त्याचे रक्षण करणे, हा माणसाचा आदिम गुणधर्म आहे. धर्म आणि राष्ट्रसंकल्पनांच्या मिथकात जगताना आपल्या वास्तवातल्या आवासातली झाडे तोडणाऱ्यांना, तिथे प्रदूषण पसरवणाऱ्यांना आणि प्लास्टिकचा कचरा करणाऱ्यांना यातून बरेच नव्हे खूप काही शिकण्यासारखे आहे...


(संदर्भ : सेपियन्स - युवाल नोह हरारी, गन्स जर्म्स अँड स्टील - जेरेड डायमंड)

बातम्या आणखी आहेत...