कोरेगाव-भीमा दंगल: मुलाचे / कोरेगाव-भीमा दंगल: मुलाचे वर्षश्राद्ध आले तरी मुख्य आरोपी मोकटाच, मृत राहुल फटांगडेच्या आईने व्यक्त केली भावना

प्रतिनिधी

Dec 31,2018 05:49:00 PM IST

पुणे- कोरेगाव-भीमा येथे मागील वर्षी एक जानेवारी रोजी दोन गटात दंगल उसळल्यानंतर, एका जमावाच्या हल्लयात सणसवाडी येथील तरुण राहुल फटांगडे याचा बेदम मारहाण झाल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आत्तापर्यंत पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अहमदनगर जिल्हयातून तीन आरोपी तर सीआयडीने एक आरोपी जेरबंद केला आहे. मात्र, या गंभीर खुनाच्या गुन्हयातील मुख्य दोन आरोपी अद्याप मोकाट असून त्यांना मुलाचे वर्षश्राद्ध आले तरी अटक करण्यात आली नाही ही तपास यंत्रणांच्या दृष्टीने शरमेची बाब असल्याची प्रतिक्रिया राहुल याची आर्इ जनाबार्इ फटांगडे यांनी व्यक्त केली आहे.

फटांगडे म्हणाल्या, माझ्या मुलाला न्याय मिळणे गरजेचे असून त्याला विनाकारण मारणाऱ्या लोकांना जेरबंद केले पाहिजे. राहुल याच्या खुनाच्या संर्दभात व्हिडिओ पोलिसांना मिळाला असून त्यामध्ये त्यास मारणाऱ्या लोकांचे चेहरे दिसून आले आहेत. त्याआधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना किमान वर्षभरात अटक करणे गरजेचे होते. सरकारने आत्तापर्यंत आम्हाला 15 लाखांची मदत दिली आहे, मात्र पैशांपेक्षा मुलाचा जीव महत्त्वपूर्ण होता. प्रतिकूल परिस्थितीत कष्टाने त्याने गॅरेजचा धंदा सुरु केला होता मात्र, अचानक त्याचा खून झाल्याने सर्व काही ठप्प झाले आहे. माझा दुसरा मुलगा पोलिस खात्यात काम करत आहे.

कोरेगाव-भिमात सात-आठ वर्षातच गर्दी
कोरेगाव भिमा येथील जयस्तंभाची देखभाल करणाऱ्या निवृत्त कॅप्टन बाळासाहेब जमादार (माळवदकर) यांनी सांगितले की, जयस्तंभाची माझे वडील आनंदराव माळवदकर अनेक वर्षे देखभाल करत होते. त्यांच्या निधनानंतर आणि 32 वर्षे लष्करात सेवा करुन निवृत्त झाल्यावर मी त्यांचा काम पाहत आहे. सन 2000 पर्यंत जयस्तंभ येथे कधी अभिवादन कार्यक्रमास गर्दी होत नव्हती. मात्र, हळुहळु छोटया प्रमाणावरुन लाखोच्या संख्येत गर्दी वाढत गेली आहे.

स्तंभाबाबतचा खरा इतिहास वेगळा असून त्याबाबतची माहिती लष्कराच्या युनिटकडून जमा करुन ती चौकशी आयोग व न्यायालयात मी सादर केली आहे. लष्कराचे कोणतेही युनिट एका जातीचे असू शकत नाही ते सर्वजातीधर्माचे असते. कोरेगाव भीमाची लढार्इ ही अचानक झालेली छोटया तुकडीची मोठया तुकडी सोबतची लढार्इ होती व त्यात दोन्ही बाजूचे सैनिक मारले गेले होते. इंग्रजाच्या बाजूने फर्स्ट बॉम्बे नेटिव्ह इंन्फट्री बटालियनचे 500 जण, पुणे ऑकझिलरीचे 300 सैनिक तर मद्रास अर्टिलरची 25 जण आणि नऊ ब्रिटिश अधिकारी असे एकूण 834 जण लढले आहेत. त्यामध्ये सर्व जातीधर्माचे लोक होते.

जयस्तंभावरच खरा इतिहास असून त्यावर 314 जणांची नावे आपणास दिसून येतील. माझा न्यायालयावर विश्वास असून लवकरच खरा इतिहास समाजा समोर यावा अशी इच्छा आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांनी येऊन मानवंदना दिली पाहिजे मात्र, प्रत्येकजण सोयीनुसार इतिहासाचा वेगळा अर्थ लावत आहे.

X
COMMENT