आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होय, मी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय! अधिकृत घोषणेतून राहुल गांधींनी चर्चांना लावला विराम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधींनी राजीनामा दिला की नाही अशा चर्चांना आता कायमचा विराम लागला आहे. राहुल गांधींनी बुधवारी स्वतः पत्रकारांशी संवाद साधताना होय, आपण राजीनामा दिला अशी अधिकृत घोषणा केली आहे. याबरोबरच लवकरच काँग्रेस पक्षाच्या नवीन अध्यक्षाची घोषणा केली जाईल असे राहुल यांनी स्पष्ट केले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधींच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा येत्या एका आठवड्यात केली जाऊ शकते. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नाव सर्वात पुढे मानले जात आहे. विशेष म्हणजे, अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानंतर राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून काँग्रेस अध्यक्ष असा उल्लेखही मिटवला आहे. 

 

 


नवीन अध्यक्ष निवडीत माझा संबंध नाही...
राहुल गांधींनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानंतर आता पुढे कोण असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, नवीन काँग्रेस अध्यक्षाचे नाव लवकरच समोर येईल. ते नाव कुणाचे असेल याचा निर्णय काँग्रेस घेणार आहे. या प्रक्रियेत आपला कुठेही सहभाग नाही असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे. वायनाड येथून खासदार असलेले राहुल गांधी यांना 2017 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष पद मिळाले होते. परंतु, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी 25 मे रोजीच आपले पद सोडले होते. आता केवळ त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.


काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर सुशील कुमार शिंदे?
काँग्रेस अध्यक्ष पदावर सुशील कुमार शिंदे यांची वर्णी लागणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गांधी कुटुंबियांसह काँग्रेसने एकमताने सुशील कुमार यांना अध्यक्ष पद देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, अधिकृत घोषणेसाठी आणखी काही वेळ लागू शकतो. राहुल गांधींचे उत्तराधिकारी होण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद, अशोक गलहोत, जनार्दन द्विवेदी आणि मुकुल वासनिक यांच्यासह माजी संरक्षण मंत्री ए.के. अॅण्टोनी यांच्या नावांचा प्रस्ताव होता. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ओबीसी नेते सुशील कुमार शिंदे यांचा देखील पराभव झाला.

बातम्या आणखी आहेत...