आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मोदी स्वत:च्या जाहिरातींमुळे भारावलेले, द्वेषाच्या राजकारणामुळे लक्षात राहतील’ - राहूल गांधींची विशेष मुलाखत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणुकीचा महासंग्राम सुरू झाला आहे. १० मार्चला लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपासून आतापर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी १२ राज्यांचा दौरा केला आहे. देशाची नाडी तपासून पाहण्याचा त्यांचा प्रयत्न तर आहेच, शिवाय पक्षाची प्रचार मोहीम जास्त धारदार करण्यावर त्यांचा भर आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या हिंदी भाषक तीन राज्यांत काँग्रेस सत्तेत परतल्यानंतर राहुल यांनी प्रथमच एखाद्या वृत्तपत्र समूहाशी चर्चा केली. राहुल गांधी यांनी आमचे राजकीय संपादक हेमंत अत्री यांच्याशी केलेल्या चर्चेतील प्रमुख मुद्दे....  

 

 

भास्कर : काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप होतात. प्रियंकांना दिलेल्या जबाबदारीमुळे त्या जास्त शक्तिशाली झाल्या आहेत का?  
राहुल : प्रियंकांना त्यांची योग्यता, क्षमता आणि अनुभवाच्या आधारावर सरचिटणीस केले. त्या आपल्या पदाला पूर्ण न्याय देतील. त्या चांगल्या वक्त्या आहेत. सर्वांचे एेकतात. कार्यकर्त्यांशी थेट जोडलेल्या आहेत.  

 

भास्कर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक किती जागा मिळतील? जागा कमी मिळाल्या तर एखाद्या मित्रपक्षाच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून स्वीकाराल का?  
राहुल : आम्ही केलेली आघाडी फक्त निवडणूक जिंकण्यासाठी नाही. ती सध्याच्या लोकविरोधी, लोकशाहीविरोधी, फॅसिस्ट धोरणांना पराभूत करण्यासाठी आहे. पीएमपदाचा निर्णय निवडणुकीनंतर होईल.  

 

भास्कर : पंतप्रधान स्वत:ला चौकीदार म्हणत देशव्यापी मोहीम चालवत आहेत.  
राहुल : ‘चौकीदार चोर आहे’ ही आमची घोषणा लोकांपर्यंत पोहोचली याचा हा सर्वात मोठा पुरावा. मोदींना अपराधी वाटते. त्यामुळेच भाजपला त्याला विरोध करावा असे वाटले. नावाच्या पुढे चौकीदार लिहिणाऱ्यांची नावे किती घोटाळ्यांत आहेत हे रोज समोर येत आहे. पीएमपासून अमित शहा, पीयूष गोयल, अरुण जेटली, जय शहा यांच्यासारखे लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या देशाला लुटणाऱ्यांना मदत करत आहेत किंवा स्वत: आरोपी आहेत.  

 

 

भास्कर : सर्जिकल स्ट्राइकवर होणाऱ्या राजकारणाकडे आपण कसे पाहता?  
राहुल : हा हल्ला राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांच्या अपयशाचा पुरावा आहे. आम्ही सगळे लष्कर आणि सरकारसोबत उभे राहिलो, पण मोदींनी राजकारण करून आमच्यावर निशाणा साधला.  

 

 

भास्कर : पंतप्रधानांचे सकारात्मक पैलू कोणते? त्यांच्या उणिवा कोणत्या? पीएम म्हणून ते तुमच्या स्मरणात कसे राहतील?  
राहुल : पंतप्रधान सतत खोटे बोलतात. स्वत:च्या जाहिराती आणि मार्केटिंगमुळे  भारावलेले आहेत. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला प्रचारमंत्री कार्यालय बनवले आहे. ते स्वत:च्या कार्यक्रमांवर जनतेचा पैसा खर्च करत आहेत. त्यांना टीका नको, प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. पाच वर्षांत पत्रकार परिषद न घेणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. द्वेष आणि ध्रुवीकरणाचे राजकारण केलेले पंतप्रधान अशा रूपात मला मोदीजी आठवणीत राहतील.  

 

भास्कर : तुम्ही सत्तेत आल्यावर राममंदिर बांधाल का?  
राहुल : हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. कोर्टाचा निकाल सर्व पक्षांनी मान्य करावा आणि तो लागू करावा, असे मला वाटते.

 

केंद्र सरकार जाहिरातबाजीवर हजारो कोटी खर्चून दाखवत आहे की, देशात सर्वकाही आलबेल आहे अन् प्रत्येकाने आनंदीच राहायला हवे

> या निवडणुकीत तुमच्याकडे विजयाचा काय फॉर्म्युला आहे? 
- निवडणूक हा काही खेळ नव्हे, की फाॅर्म्युल्याने ती जिंकता येईल. भाजप व नरेंद्र मोदी राष्ट्रवादाच्या नावावर देशाचे लक्ष विचलित करू पाहत आहेत. मात्र देशाचे नागरिक मूर्ख नाहीत. त्यांना त्यातील फोलपणा कळलेला आहे. मोदीजींनी २०१४ ची निवडणूक जिंकण्यासाठी  प्रत्येकाच्या खात्यात १५-१५ लाख रुपये, दरवर्षी २ कोटी रोजगारांसारखी आश्वासने दिली. मात्र एकही पूर्ण केले नाही. सरकार आकडेवारीचा घोळ करून ५ हजार कोटी रुपयांच्या खोट्या जाहिराती खर्चून देशात सर्वकाही आलबेल आहे अन् प्रत्येक नागरिकाने आनंदीच राहायला हवे, असे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. 

 

> तुम्ही शेतकरी कर्जमाफीचे मॉडेल संपूर्ण देशभरात लागू कराल का?
- माझ्या मते, शेती ही देशाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. मात्र भाजप या विचाराशी सहमत नाही. त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला दरडोई दररोज साडेतीन रुपये थेट खात्यात हस्तांतरित करण्याची घोषणा करून शेती व शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. कर्जमाफी हे पहिले पाऊल आहे.  आम्ही शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व जागतिक बाजारपेठेशी जोडू. देशात दुसऱ्या हरितक्रांतीची गरज आहे. 

 

>गांधी-वाड्रा परिवारावर भ्रष्टाचार केल्याचा आरोपांवर काय म्हणाल? 
- सरकारने वाड्रांची चौकशी करावी... काही अडचण नाही. मात्र ते रफालची चौकशी करत नाही आहेत.  त्यात खुद्द पंतप्रधान सहभागी असल्याचे पुरावे आहेत. तपास संस्थांचे काम ‘वििशष्ट’ का आहे? दुसरा देश असता तर तेथील पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला असता. उलट भारतात पंतप्रधानांना वाचवण्यासाठी माेठ्या पातळीवर ‘ऑपरेशन कव्हरअप’ होत आहे. 

 

> तुम्ही केंद्रात सत्तेत आल्यास  रफाल कराराचे काय कराल? 
- पंतप्रधानांनी उद्योगपती मित्राचा ३० हजार कोटींचा फायदा करून देण्यासाठी देशाची सुरक्षा वाऱ्यावर सोडली. संरक्षण मंत्रालयाच्या टीमला मागे सारून थेट पंतप्रधानांच्या वाटाघाटीचे पुरावे सार्वजनिक आहेत. फ्रान्सच्या तत्कालीन राष्ट्रपतींनीही म्हटले की, मोदीजींच्या साांगण्यावरूनच अनिल अंबानींचा करारात समावेश झाला. १२६ ऐवजी ३६ विमानेच का खरेदी केली? कॅगनुसार, नव्या करारात विमाने येण्यासाठी १० वर्षांचाही विलंब होऊ शकतो. आम्ही सत्तेत आलो तर कराराची चौकशी केली जाईल. दोषींना शिक्षा केली जाईल.

 

> रोजगाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी  किती पास-किती फेल?
- दरवर्षी २ कोटी राेजगाराचे आश्वासन देत मोदी सत्तेत आले. आज बेरोजगारी दर ४५ वर्षांच्या उच्चांकावर आहे. चीनमध्ये रोज ५० हजार रोजगार निर्माण होत असताना भारतात रोज २७ हजार रोजगार घटत आहेत. पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये आमच्या सरकारांनी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीचा मार्ग प्रशस्त केला आहे. मध्य प्रदेशने आधीच १०० दिवस रोजगार हमी योजना लागू केली आहे. मोदीजी म्हणतात, रोजगार निर्मिती होत आहे. मात्र तरुणाई विचारतेय की रोजगार निर्मिती होत आहे तर मग आम्ही रिकामे का फिरत आहोत? 

> आज भारतातील राजकारणाकडे तुम्ही कसे बघता?
- हा देश दोन समाजांत विभागला गेला आहे. एक आहे १५-२० लोकांचा धनाढ्य भारत; तर दुसरा आहे बेरोजगार तरुण, आत्महत्या करणारे शेतकरी, त्रस्त दुकानदारांचा गरीब भारत. पहिल्यासाठी बँकांनी लाल गालिचे अंथरलेले आहेत. धनाढ्य त्यांच्यासाठी बंधू आहेत. जसे की, मेहुलभाई, अनिलभाई, नीरवभाई. जनता मात्र ‘मित्रों’च्या श्रेणीत येते.

 

> काँग्रेस सत्तेत आल्यास अयोध्येत तुम्ही राम मंदिर उभारणार का?
- मी आधीही म्हटलो आहे अन् आताही सांगतो की हे प्रकरण सुप्रीम कोर्टात विचाराधीन आहे. कोर्टाचा निकाल सर्वांनी मानावा व लागू करावा. 

 

> मसूद अझहरवर चीन व सरकारच्या परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाल?
- चीनबाबत मोदींचे धोरण दुबळे आहे. आधी डोकलाम व आता मसूदला आंतरराष्ट्रीय अतिरेकी घाेषित करण्यास अाडकाठी हे त्याचे पुरावे आहेत. पंतप्रधान चीनच्या राष्ट्रपतींची गळाभेट घेतात, झोपाळ्यावर झुलतात, मात्र चीनविरुद्ध कधीही काहीही बोलत नाहीत.  
 

> मी भावी पीएमसोबत बोलताेय का? 
- मी देशाचा पंतप्रधान होईन असे म्हणणे माझ्यासाठी गौरवाची बाब असेल. देशाचा पंतप्रधान कोण होईल, 
याचा निर्णय निवडणुकीनंतर लागेल. काँग्रेस किती जागा जिंकते त्यावरही हे अवलंबून असेल.