आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी अमेठीत हरले, मग बारामतीतून पवार का नाही?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती : 'बारामती अन् पुण्याचा विकास शरद पवार आणि अजित पवारांनी केल्याचा दावा खोटा आहे. येथे ब्रिटिश काळापासून सिंचनाच्या सोयी आहेत. काका-पुतण्यांना शेतकरी, शेतमजूर, कामगारांचे शोषण केल्याचे श्रेयच घेता येईल. यंदा मात्र यांची घराणेशाही संपवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही,' असा निर्धार बारामतीतील भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना व्यक्त केला. आधी संभाजी भिडेंसोबत काम, मग अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'चे शिलेदार व आता भाजपचे उमेदवार अशा वेगवेगळ्या भूमिकांविषयी त्यांच्याशी झालेला संवाद...

प्रश्न : संभाजी भिडेंच्या संपर्कात कसे आलात..?
पडळकर : संभाजी भिडे वाईट माणूस नाहीये. नवरात्रीत ते सांगलीत दुर्गा दौड काढतात. या दौडच्या निमित्ताने मी त्यांच्या संपर्कात आलो होतो. गुरुजींच्या दौडला शरद पवार, आर. आर. पाटील, जयंत पाटील यांच्यासह राज्यातील सर्व नेत्यांनीही हजेरी लावलेली आहे.

प्रश्न : बरं वंचित आघाडी का साेडली?
पडळकर : मी आधी भाजप कार्यकर्ता हाेताे. लाेकसभेवेळी भाजप उमेदवार जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी 'वंचित'कडून अर्ज भरला. इतकाच 'वंचित'शी संबंधित हाेताे. दीर्घकाळ तिथे राहणे अशक्य होते म्हणून पुन्हा भाजपत आलो.

प्रश्न : प्रकाश आंबेडकर म्हणतात, 'मुख्यमंत्री पडळकरांंचा वापर करून घेत आहेत?'
पडळकर : अॅड. आंबेडकरांचा मी आदर करतो. त्यांच्याशी माझे मतभेद नाहीत. त्यांनी आत्मघात म्हटले असले तरी मी येथून विजयी होणार आहे. अन् मुख्यमंत्री माझा का वापर करून घेतील? उलट त्यांनी बारामतीत मला लढवण्यालायक समजले हाच गौरव आहे.

प्रश्न : पराभव झाला तर पुनर्वसनाचा काही शब्द?
पडळकर : मी विजयी होणारच. मी बिनशर्त भाजपत अलाेय. खरे तर खानापूर-जतसारखे मतदारसंघ घेऊ शकलो असतो, पण माझे लक्ष्य बारामतीत विजयाचे आहे. येथील जनता पवार घराण्याला कंटाळलेली आहे.

प्रश्न : पवारांना तर तिथे 'जाणता राजा' म्हणतात?
पडळकर : कसला जाणता राजा, हा शोषण करणारा राजा आहे. इथे ब्रिटिश काळापासूनच सिंचनाच्या सोयी आहेत. औद्योगिकीकरण १९५४ पासून आहे. अनेक गावांत आजही टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. निवडणुकीच्या काळात पाणी बंद करण्याची धमकी देऊन मते लाटली जातात. यामध्ये मला बदल करायचा आहे. एखाद्या व्यक्तीला कंपनीत कामाला लावून फक्त ६ हजार रुपये वेतन दिले जाते. माळेगावच्या कारखान्यात उसाला ३४०० रुपये, जवळच सोमेश्वरला ३ हजार रुपये भाव कसा..? हे शोषण नाहीये का..?

प्रश्न : 'भाजपकडून माझ्या कुुटुंबातीलही जर कुणी उभे राहिले तर मतदान करू नका,' अशी शपथ तुम्ही मतदारांना दिली हाेती, विसरलात का?
पडळकर : १६ नोव्हेंबर २०१८ रोजी महाडच्या चवदार तळ्यापासून धनगर आरक्षणासाठी यात्रा काढली होती. २७ फेब्रुवारीला २०१९ रोजी मुंबईत यात्रा पाेहाेचली. आरेवाडीतील माझे भाषण व्हायरल झाले. 'धनगड' आणि 'धनगर' दोन्ही जाती एकच आहेत. बिरोबा वनाच्या प्रांगणात झालेल्या भाषणात मी सरकारला धारेवर धरले होते. त्यात सरकार शपथपत्र सादर करत नव्हते म्हणून तसे बोललो होतो. आता ७० टक्के काम झाले आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा आता न्यायालयात आहे. त्यामुळे आताच्या परिस्थितीत माझे विधान लागू होत नाही.

प्रश्न : पवारांच्या राजकीय तंत्राविरुद्ध कसे लढणार?
पडळकर : राहुल गांधी अमेठीतून पराभूत होऊ शकतात, मग बारामतीतून अजित पवार का नाही.... त्यांच्याकडे पैशाची ताकद असली तरीही माझ्याकडे लोकवर्गणीचा पैसा आहे. माझ्या अंगावरील कपडेदेखील लोकांनी घेऊन दिलेले आहेत. लोकांनी मला वर्गणीतून ३५ लाखांची फाॅर्च्युनर गाडी दिली आहे. आताही लोकांच्या प्रेमातूनच मी त्यांचा पराभव करेल.

पडळकरांनी आजवर चार निवडणुका लढल्या, सर्व पराभूत
पडळकर यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली, पण पराभूत झाले. २००९ मध्ये रासपकडून खानापूर विधानसभा लढवली, १९ हजार मते मिळाली. २०१४ मध्ये भाजपकडून याच मतदारसंघात लढले, फक्त ४७ हजार मते घेऊन पराभूत झाले. २०१९ मध्ये सांगली लाेकसभेत वंचितकडून लढले. पराभूत झाले, मात्र ३ लाखांवर मते घेतल्याने चर्चेत आले.

बातम्या आणखी आहेत...