आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरमध्ये नरेंद्र मोदींच्या तुलनेत राहुल गांधींची सभा ‘फेल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची बुधवारी लातूरच्या क्रीडा संकुलावर भव्य सभा झाली, त्याच ठिकाणी सोमवारी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेऊन भाजपच्या शक्तिप्रदर्शनाला प्रत्युत्तर देण्याचा स्थानिक काँग्रेसचा मनसुबा होता. मात्र, मोदी यांच्या सभेच्या जमलेल्या लाख ते सव्वा लाखाच्या उत्स्फूर्त गर्दीच्या तुलनेत राहुल गांधींच्या सभेला जमलेली गर्दी तोकडी होती. कमाल 30 हजार लोकच कॉँग्रेस जमवू शकले. त्यामुळे मोदींच्या तुलनेत राहूल यांची सभा फेल झाल्याचीच शहरात चर्चा होती. दुसरीकडे राहुल यांचे इतरत्र होणार्‍या सभेतील भाषणांच्या तुलनेत लातूरमधील भाषण मात्र मुद्देसूद झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

नरेंद्र मोदींनी मागील आठवड्यात घेतलेल्या सभेने लातूरमधील गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत काढल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, मोदींच्या क्रेझमुळे त्यांच्या सभेला उत्स्फूर्त गर्दी झाली होती. त्यामुळे राहुल गांधींच्या सभेला गर्दी कशी जमवणार, असा प्रश्न काँग्रेससमोर होता. काँग्रेसच्या नेत्यांनी यावर एक नामी उपाय शोधून काढला. राहुल यांच्या सभेसाठी मैदानावर खुर्च्या टाकण्यात आल्या. त्यामुळे जमिनीवर जिथे दोन-तीन माणसे सहजपणे बसू शकतात, तिथे ती जागा एका खुर्चीतच सामावून गेली. निम्म्या मैदानात खुर्च्या अंथरण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत मोदींच्या सभेत केवळ पत्रकारांसाठीचा अपवाद सोडला तर व्हीआयपीदेखील भारतीय बैठकीत बसवण्यात आले होते. त्याचबरोबर मैदानात अगोदरच असलेले स्टेज मोदींसाठी वापरण्यात आले होते, तर राहुलसाठी त्याच्या पुढे शंभर फुटावर नवे स्टेज तयार करण्यात आले. तेथून पुढे डी संरक्षक कठड्यामुळेही बरीच जागा व्यापली गेली.

उन्हाचा तीव्रतेमुळे गर्दी कमी
राहुल गांधी यांची सभा भर दुपारी होती. सोमवारी लातूरचे तापमान 39 अंशांपर्यंत होते. उन्हाच्या चटक्यामुळे गर्दी जमली नाही, असे काँग्रेस नेते सांगत आहेत. पाण्याचे पाऊच ठेवण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी ते मैदानात नेण्यास मनाई केली. त्यामुळे लोकांचे हाल झाले. दुसरीकडे मोदींच्या सभेत काही काळ ऊन आणि त्यानंतर पंधरा मिनिटे जोराचा पाऊस झाला. लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या. मात्र, मैदानातील गर्दी हटली नव्हती.

महिलांची संख्या मात्र जास्त
मोदींच्या सभेला महिलांची फारशी नव्हती. त्या तुलनेत राहुलच्या सभेमध्ये महिलांची गर्दी जास्त होती, हे उल्लेखनीय. शहरातील प्रत्येक नगरसेवकांना किमान 500 जण आणण्याचे टार्गेट देण्यात आले होते. त्यातही महिलांची संख्या जास्त राहावी, असे सांगण्यात आले होते, असे एका काँग्रेस नगरसेवकाने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. राहुलचे आगमन झाले तेव्हा पासधारक महिलांसाठीच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे सभा सुरू झाल्यावर मागील महिलांना कठडे ओलांडून पुढे बसण्यास सांगण्यात आले.

तुलना तर होणारच...!
राहुल गांधींची सभा संपल्यानंतर सोशल मीडियावर दोन्ही सभांची तुलना करणारे फोटो शेअर करण्यात आले. काही जणांनी मोदींच्या सभेचा गर्दीचा फोटो आणि राहुल गांधीच्या सभेच्या गर्दीचा त्याच ठिकाणाहून काढलेला फोटो एकत्रित करून शेअर केला. दोन्ही बाजूंनी त्यावर कॉमेंट पडल्या. ‘चर्चा तर होणारच’च्या धर्तीवर ‘तुलना तर होणारच..’ असा मजकूर पडला. काँग्रेसच्या बाजूनेही गर्दीचे फोटो शेअर करण्यात आले.