आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात मी एकटा लढत होतो : राहुल गांधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षपदावरून गेल्या ३९ दिवसांपासून सुरू असलेली संभ्रमाची स्थिती बुधवारी दूर झाली. आपण पक्षाचे अध्यक्ष नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. त्यासाठी चार पानांचा राजीनामा ट्वीट करून लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली. पंतप्रधान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, व सरकारी यंत्रणेच्या विरोधात मला अनेक वेळा एकट्यानेच लढावे लागले. निवडणुकीतील पराभवाची अनेक लोकांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी अनेक कडक निर्णय घ्यावे लागतील, असे राहुल यांनी म्हटले आहे. 


काँग्रेसच्या कार्यकारी समितीने लवकरात लवकर अध्यक्ष निवडावा, असे आवाहन राहुल यांनी केले. तथापि कार्यसमिती मंजूर करत नाही तोपर्यंत राहुल हेच पक्षाच्या अध्यक्षपदावर असतील, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. मोतीलाल व्होरा यांना हंगामी अध्यक्ष बनवण्यात आलेले नाही. अध्यक्षाची निवड करण्यासाठी कार्यसमितीची बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता नाही. ५ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. याच दिवशी सायंकाळी सोनिया गांधी व राहुल यांची इंग्लंडला जाण्याची योजना आहे.रॉबर्ट वढेरा यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. प्रियंका गांधी आधीपासूनच इंग्लंडमध्ये आहेत. तिन्ही नेते पुढल्या आठवड्यात परततील. त्यानंतर कार्यसमितीची बैठक होणे अपेक्षित आहे. दरम्यान, काँग्रेसच्या नेतृत्वाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर केला आहे. 


मतदान आैपचारिकता : देशातील संस्थात्मक तटस्थता संपुष्टात आली आहे. आता निवडणूक केवळ आैपचारिकता ठरेल. लोकसभेतील पराभवासाठी इतरांना दोषी ठरवणे योग्य नाही. माझी जबाबदारी स्वीकारतो. परंतु भविष्यात पक्षवाढीसाठी सर्वांनी पुढाकार घेऊन जबाबदारी निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. २०१९ मधील पराभवासाठी इतरांची जबाबदारी ठरवावी लागेल. अध्यक्ष म्हणून स्वत:च्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करून इतरांना दोषी ठरवणे योग्य वाटत नाही. 


आमची मोहीम भारतातील सर्व लोक, धर्म व समुदायातील बंधुभाव, सहिष्णुता, सन्मानासाठी होती. मी वैयक्तिक स्वरूपात पंतप्रधान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्या संस्थांशी लढा दिला. मी भारतावर प्रेम करतो. त्यामुळेच संघर्ष केला. अनेक वेळा पूर्णपणे एकटा लढलो. त्याचा मला अभिमान आहे. 


माध्यमे स्वतंत्र असावीत : स्वतंत्र व नि:पक्ष निवडणुकीसाठी संस्था नि:पक्ष असली पाहिजे. स्वतंत्र माध्यमे, न्यायपालिका व निवडणूक आयोग पारदर्शक हवे. आर्थिक संस्थांवर एखाद्या पक्षाचा एकाधिकार असेल तर निवडणूक नि:पक्ष होऊ शकत नाही. २०१९ मध्ये आमची लढाई एका पक्षाशी नव्हे तर संपूर्ण सरकारी यंत्रणेच्या विरोधात होती. यंत्रणेतील प्रत्येक संस्था विरोधकांच्या विरोधात होती. प्रत्येक संस्था संघाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी काम करू लागली आहे. आता निवडणुकीतून भारताचे भवितव्य नाही, असे राहुल म्हणाले. 


भाजपविषयी : त्यांना द्वेष दिसतो, मला प्रेम दिसते
माझी लढाई केवळ सत्तेसाठी नव्हती. भाजपविषयी माझ्या मनात द्वेषभावना नाही. परंतु माझ्या शरीराचा कणन॰कण त्यांच्या देशाविषयीच्या विचाराला विरोध करतो. हे युद्ध याच मातीत हजारो वर्षांपासून चालत आले आहे. मतभेद असलेल्या ठिकाणी समानतेला पाहू शकतो. तेथे प्रेम पाहू शकतो. ज्या गोष्टींना ते घाबरतात त्यांची मी गळाभेट घेऊ शकतो. हे भारताचे तत्त्वज्ञान आहे. मी या लढाईतून माघार घेतलेली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत भारताची सेवा करीन. 

बातम्या आणखी आहेत...