राहुल गांधींची केरळस्वारी; अमेठीसह वायनाडमधूनही लढणारच केरळ काँग्रेसमध्ये जल्लोष, डावे पक्ष नाराज

Apr 01,2019 11:46:00 AM IST

वायनाड,विजयवाडा, बिजनौर - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळमधील वायनाड येथूनही निवडणूक लढवतील. काँग्रेस नेते ए.के. अँटनी यांनी रविवारी नवी दिल्लीत ही घोषणा केली. राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी येथूनही निवडणूक लढवतील. सध्या ते अमेठीचे खासदार आहेत. या घोषणेनंतर केरळसह कर्नाटक आणि तामिळनाडू येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. वायनाडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले आणि पेढे वाटले. केरळातील काँग्रेसच्या सहयोगी पक्षांनी राहुल गांधी यांच्या वायनाड येथून लढण्याच्या घोषणेचे स्वागत केले आणि मिरवणूक काढली.

केरळ युवक काँग्रेसचे नेते टी. सिद्दिकी म्हणाले, राहुल गांधी यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याची घोषणा करून भाजपच्या कारस्थानावर सर्जिकल स्ट्राइक केला आहे. केरळातील एकूण २० लोकसभा जागांपैकी काँग्रेस १६ जागा लढवत आहे. काँग्रेसने यापूर्वीच १४ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. वायनाड आणि वडकारा येथे उमेदवाराची प्रतीक्षा होती.

डाव्यांचा विरोध, काँग्रेसकडून डाव्या पक्षांना लक्ष्य केले जात आहे
राहुल गांधी यांच्या वायनाड येथून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर माकप आणि भाकपसारखे डावे पक्ष नाखुश दिसले. माकपचे नेते प्रकाश करात म्हणाले, केरळात काँग्रेसकडून डाव्या पक्षांना लक्ष्य केले जात असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. राष्ट्रीय स्तरावर भाजपला विरोध करण्याच्या भूमिकेच्या विरोधात काँग्रेसचे हे वागणे आहे. भाकपचे नेते डी. राजा यांनी काँग्रेसच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला, ते म्हणाले, काँग्रेस हे कसले राजकारण करते आहे, हे मला समजत नाही. केरळात भाजपचे अस्तित्व नाही. येथून राहुल यांना उमेदवारी देण्यामुळे काँग्रेस देशाला काय संदेश देत आहे. तर प्रचारासाठी तिरुवनंतपुरम येथे अालेले सीताराम येचुरी म्हणाले, उमेदवार निश्चित करणे ही राजकीय पक्षांची अंतर्गत बाब आहे आणि इतर पक्षांनी त्यात नाक खुपसण्याची गरज नाही.

अमित शहांचे टीकास्त्र; कोठेही जा, जनता हिशेब मागणार
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या केरळमधील वायनाड येथून निवडणूक लढवण्याच्या निर्णयाबाबत भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले, मला माहिती आहे की, राहुल गांधींनी केरळकडे धाव घेतली आहे, अमेठीकडे नव्हे. अमेठीत या वेळी हिशेब चुकता होणार आहे, हे सर्वांना माहिती आहे. केरळात ध्रुवीकरणाचे राजकारण आहे. त्यामुळे ते तेथे गेले आहेत. आपल्या मतपेटीच्या राजकारणासाठी देशाच्या सुरक्षिततेशी खेळ केला आहे. तुम्ही कोठेही जा, देशातील जनता तुमच्याकडे हिशेब मागेल.

X