आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबमध्ये प्रचाराचे सारथ्य राहुलकडे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबच्या सत्तेसाठी कसरत करणार्‍या काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रचाराची सूत्रे सरचिटणीस राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. या रणधुमाळीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग हे उतरणार असले तरी राज्याच्या कानाकोपर्‍यात राहुल हेच सक्रिय दिसून येतील.
निवडणुकीची रणनिती तयार करणार्‍या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मते, पंजाब राज्यातील वेगवेगळ्या भागात एकूण नऊ जाहीर सभा घेतल्या जाणार आहेत. या सभांना राहुल हे मार्गदर्शन करणार आहेत. या सभा तीन ते चार दिवसांत आयोजित केल्या जाणार आहेत. त्यात ब्रॅण्ड राहुलच्या नावावर मोठय़ा प्रमाणात तरूणांना जमवण्याची तयारी केली जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सध्या तरी चार व पंतप्रधान तीन सभांना संबोधित करण्याची पक्षाची योजना आहे. या सभा मालवा, मांझा, दोआबा येथे होणार आहेत. सभेचे ठिकाण, वेळ या गोष्टी एक-दोन दिवसांत निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी अगोदर दिग्गजांची बैठक होणार आहे. त्यात या विषयीचा निर्णय घेतला जाईल. 16 जानेवारी रोजी नाम निर्देशनपत्र मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतरच या तीन स्टार प्रचारकांनी प्रचार मैदानात उतरण्याचे ठरवले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुड्डा, केंद्रिय मंत्री विरभद्र सिंह, गुलाम नबी आझाद यांनाही या प्रचारात उतरवण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. मुकुल वासनिक, राज बब्बर यांनाही पंजाबमध्ये प्रचारासाठी पाठवले जाणार आहे. निवडणूक आयोगाने 19 हजार 700 हून अधिक निवडणूक केंद्रांच्या सुरक्षिततेच्या योजनेला अंतिम रूप देण्यास सुरवात केली आहे.