आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनपीआर, एनआरसी हा गरिबांवरील नाेटबंदीसारखा हल्ला : राहुल गांधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर / नवी दिल्ली - राष्ट्रीय लाेकसंख्या नाेंदणी (एनपीआर) व राष्ट्रीय नागरिकत्व नाेंदणी (एनआरसी) हा गरिबांवरील नाेटबंदीसारखा हल्ला आहे. अशा प्रकारचे निर्णय म्हणजे गरिबांना कर लावण्यासारखेच असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. रायपूरमधील जाहीर सभेत त्यांनी हा आरोप केला. राहुल यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांना ‘झूठा ऑफ द इयर’ असे संबोधले.  राष्ट्रीय आदिवासी नृत्य समारंभात सहभागी झालेले राहुल गांधी पुढे म्हणाले, नोटबंदी गरिबांवरील कर होता. तुमचा सर्व पैसा बँकेकडे सोपवा. परंतु तुम्ही हक्काचा पैसा बँकेतून काढू शकत नाही. सर्व पैसा १५ ते २० धनाढ्यांच्या खिशात गेला. एनपीआर-एनआरसीदेखील अशीच गोष्ट आहे. गरिबांना अधिकाऱ्यांकडे जाऊन कागदपत्रे दाखवावी लागतील. नावात काही त्रुटी असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी लाच द्यावी लागेल. गरिबांच्या खिशातील कोट्यवधी रुपये काढून त्याच १५ जणांना दिले जातील. हा लोकांवरील एक प्रकारचा हल्ला आहे. भारतात हिंसाचार होत असल्याची जगभरात चर्चा होत आहे. महिलांना रस्त्यावर फिरण्याचे स्वातंत्र्य नाही. बेरोजगारीचा दर ४५ वर्षांत सर्वाधिक आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे काय आणि कसे घडू लागलेय, हे कळायलाच मार्ग नाही. पंतप्रधान आपले काम करू शकत नाहीत. सर्व धर्म-जातीच्या लोकांना सोबत घेतल्याशिवाय अर्थव्यवस्थेचा गाडा चालवता येणार नाही, असे राहुल यांनी सांगितले. लोक देतील तीच माहिती एनपीआरमध्ये नोंदवली जाईल. त्यात कर कुठे आला? राहुल सातत्याने खोटे बोलत आहेत. तथ्यहीन वक्तव्यांपेक्षा त्यांनी राज्यांतील आपल्या सरकारच्या कामांत सुधारणा करण्यावर भर द्यावा. काँग्रेसने खोटे बोलणे बंद करावे, असे जावडेकर यांनी म्हटले.

नागरिकत्व काढून घेतल्याचे काँग्रेसने सिद्ध करावे : शहा 
सिमला । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिमल्यातील एका जाहीर सभेत नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. कुणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही. काँग्रेस अँड कंपनी अफवा पसरवण्याचे काम करत आहे. नागरिकत्व काढून घेतले जाणार असल्याची तरतूद कायद्यात असल्याचे दाखवून द्यावे. माझे राहुल यांना आव्हान आहे. त्यांनी तशी तरतूद दाखवावी. म्हणूनच देशातील शांतता भंग करू नये, असे शहा यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...