political / राजीनाम्यावर दोन दिवसांत निर्णय घेणार राहुल गांधी; लाेकसभा निवडणुकीतील पराभवानंतर दिला होता राजीनामा

...तर सुशीलकुमार शिंदे काँग्रेस अध्यक्षपदी

दिव्य मराठी

Jul 02,2019 07:41:00 AM IST

नवी दिल्ली - गेल्या सव्वा महिन्यापासून काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्यावर ठाम असलेले राहुल गांधी येत्या दोन दिवसांत आपल्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेतील. राहुल यांनी राजीनामा माघारी घेतला नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे यांच्या नावावर गांभीर्याने विचार सुरू आहे. सोनिया गांधी यांनीही फोनवर त्यांच्याशी चर्चा केली आहे. सूत्रांच्या मते, संसदेच्या अधिवेशनानंतर काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत अध्यक्षपदाची औपचारिक घोषणा शक्य आहे. लाेकसभा निवडणुकीतील पराभवानंतर २५ मे रोजी राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस कार्यकारिणीने तो नामंजूर केला होता.

सोमवारी काँग्रेसशासित पाच राज्यांतील मुख्यमंत्र्यांनीही राहुल यांची भेट घेत राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. राहुल यांच्या निवासस्थानी सुमारे दोन तास झालेल्या या बैठकीत काय झाले याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या भेटीत काही मुख्यमंत्र्यांनीही राजीनाम्यांचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा होती, मात्र सूत्रांनी याचा इन्कार केला. राहुल यांच्या भेटीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले की, पक्षातील नेते, कार्यकर्त्यांच्या भावना राहुल यांच्यापर्यंत पोहोचवल्या. या भावनानुसार योग्य निर्णय घेऊ, असे राहुल यांनी सांगितले आहे.

X