आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi, Who Had Been Missing For Nearly Five Months, Appeared Directly In The Ausa

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तब्बल पाच महिन्यांपासून गायब असलेले काँग्रेसचे राहुल गांधी थेट औश्यात दिसले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या काँग्रेस पक्षाचे तत्कालीन सेनापती युद्ध हरल्यानंतर पाच महिने गायब होते. गेल्या दहा दिवसांपासून ते परदेशात असल्याची टीका होत असतानाच ते थेट अवतरले ते लातूर जिल्ह्यातील औश्यात. राज्यातील काँग्रेस नेत्यांनीही जिल्ह्यातील सहा जागांपैकी किमान दोन मतदार संघात विजयाची खात्री असलेल्या लातूरमध्येच त्यांची सभा घेतली. आणि सभेला गर्दी जमवण्याचा प्रयत्न यशस्वी करुन दाखवला.

लातूर जिल्ह्यात सहा मतदार संघ आहेत. सध्या लातूर शहर, लातूर ग्रामीण आणि औश्यात काँग्रेसचे अनुक्रमे अमित देशमुख, त्र्यंबक भिसे आणि बसवराज पाटील हे आमदार आहेत. या तीनही जागा मागील दहा वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहेत. या वेळी देशमुखांचे दोन पुत्र अमित आणि धीरज हे लातूर शहर व ग्रामीण येथून उमेदवार आहेत, तर काँग्रेसचेच प्रदेश कार्याध्यक्ष असलेले बसवराज पाटील हे औश्यातून तिसऱ्यांदा नशीब अाजमावत आहेत. या तीनही जागा आपल्याकडेच राखण्यात काँग्रेस यशस्वी होईल, असा अहवाल राज्यातील नेत्यांनी दिल्लीला पाठवल्यामुळे राहुल गांधी यांच्या सभेसाठी २८८ मतदारसंघापैकी औश्याचीच निवड करण्यात आल्याची चर्चा आहे.

मराठवाड्यासाठी शक्तिप्रदर्शन
गलीतगात्र झालेल्या आपल्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी काँग्रेसने या सभेसाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. लातूर, उस्मानाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांना गर्दी करण्याच्या सूचना होत्या. राहुल गांधी हे नांदेडपर्यंत विमानाने आणि तेथून हेलिकॉप्टरने थेट औश्यात उतरले. सभेला असलेली गर्दी पाहून राहुल यांचा चेहरा खुलला होता. स्थानिक उमेदवारही आत्मविश्वासाने वावरताना दिसले.

औश्यात रणसंग्राम
लातूर जिल्ह्यातील दुर्लक्षित मतदार संघ यावेळी चांगलाच चर्चेला आला आहे. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीमुळे. पवार हे फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक आहेत. शिवसेनेकडून हा मतदार संघ खास मुख्यमंत्र्यांनी सोडवून घेतला. एवढेच नाही तर या मतदार संघात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सभा देखील झाली. त्यापाठोपाठ काँग्रेसनेही राहुल गांधी यांना आणले आता अभिमन्यू पवार फडणवीस यांच्या सभेची तयारी करीत आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...