आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, पीएमसी बँक घोटाळ्यावर मोदी- फडणवीस गप्प का?', चांदिवलीच्या सभेत राहुल गांधींचा युती सरकारवर हल्लाबोल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शेतकरी आत्महत्या, वाढलेली बेरोजगारी, पंजाब-महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का? असा सवाल उपस्थित करून भाजप महत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी इतर मुद्दे पुढे करून जनतेची दिशाभूल करत असल्याची घणाघाती टीका राहुल गांधींनी केली. 
विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधी यांनी रविवारी लातूर जिल्ह्यातील औसा आणि मुंबईतील चांदिवली व धारावी येथे प्रचारसभा घेतल्या.

चांदिवलीच्या प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, 70 वर्षात काँग्रेसने काय केले असा प्रश्न भाजप वारंवार विचारत आहे. 70 वर्षात देश उभा करण्याचे काम काँग्रेसने केले. डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था मजबूत होती. परंतु पाच वर्षात मोदींनी देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढली. गुंतवणूक करण्यात कोणी धजावत नाही. नोटाबंदी, जीएसटीमुळे छोटे व्यापारी उद्धवस्थ झाले आहेत. पुणे येथील वाहन उद्योगही बंद पडत आहेत. मारूतीनेही उत्पादन कमी केले आहे. हजारो कामगार बेरोजगार होत आहेत. 40 वर्षांतील सर्वात मोठी बेरोजगारी झाली आहे. तरुणांच्या हाताला काम नाही आणि नरेंद्र मोदी मात्र त्यांना चांद्रयान दाखवत आहेत. 
पंजाब आणि महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्याच्या मुद्द्यावरही राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला. राहुल म्हणाले की, बँकेचे संचालक कोण होते? हे संचालक कोणाचे नातेवाईक आहेत? यावर मोदी फडणवीस का बोलत नाहीत ? मोठ्या उद्योगपतींचा 1.25 लाख कोटींचा कार्पोरेट टॅक्स मोदींनी माफ केला. परंतु, गरिबांचे किती पैसे माफ केले? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशाची अधोगती होत असल्याचा आरोप करुन पुन्हा काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी चांदिवली मतदारसंघातील उमेदवार आरिफ मोहमद नसीम खान यांना विजयी करा, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले. भाजप-शिवसेना दुतोंडी आहे- मल्लिकार्जून खर्गे
भाजप शिवसेना दुतोंडी असून पर्यावरण रक्षणाचा दावा करत रातोरात आरेतील झाडांची कत्तल करतात, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लीकार्जून खर्गे यांनी करुन पाच वर्षातील युती सरकारच्या कारभारावर तोफ डागली. या सभेत बोलताना काँग्रेसचे उमेदवार नसीम खान म्हणाले की, भाजप शिवसेना सरकारने विकासाच्या नावावर फक्त थापा मारल्या आहेत. काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यानंतर राहुल गांधी यांनी गरिबांना 500 चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन दिले आहे, ते पूर्ण करू. युती सरकारच्या काळात 3 हजार कंपन्या बंद पडल्या असून कामगार देशोधडीला लागला असल्याची टीकाही नसीम खान यांनी केली आहे. सभेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त यांच्यासह मुंबईतील काँग्रेस उमेदवार उपस्थित होते.