आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीतील मलीकपुऱ्यात गोदामावर छापा; वीस लाखांचा गुटखा जप्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी : तालुक्यातील धर्मापुरी येथे पाच दिवसांपूर्वीच गुटखा पकडल्याचा प्रकार ताजा असतानाच सोमवारी पहाटे पोलिसांनी परळी शहरातील मलिकपुरा भागात कंटेनर पकडत गोदामातील साठ्यांवर छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी २० लाखांचा गुटखा जप्त केला आहे. परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे गुरुवारी (दि.५) गुटख्याने भरलेले दोन टेम्पो पोलिसांनी पकडून ५० हजारांचा गुटखा जप्त केला होता. त्यानंतर टोकवाडीतील पत्त्याच्या क्लबवर छापा मारून ९ लाख ९१ हजार रुपयांचा एेवज जप्त केला. या कारवाया ताज्या असतानाच सोमवारी पहाटे पाच वाजता पोलिस उपनिरीक्षक चांद मेंडके, सहायक पोलिस निरीक्षक सुरेखा धस, पोलिस जमादार बाबासाहेब बांगर, माधव तोटेवाड, सुंदर केंद्रे यांनी मलिकपुरा भागात कंटनेर (एमएच १४ ईएम ९७७३ ) मधून गुटख्याच्या गोण्या उतरून त्या गोदामात साठा करत असताना पकडण्यात आल्या अाहेत. हा गुटखा २० लाख रुपयांचा आहे. आठ दिवसांत पकडलेल्या गुटख्याची मोजणी अन्न औषध प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परळीत हैदराबाद, कर्नाटकमधून येतो गुटखा : परळीच्या बाजारपेठेत हैदराबाद, कर्नाटक राज्यातून सोलापूरमार्गे गुटखा परळी शहरात येत आहे.

सोलापूर येथून आयात
सोमवारी पहाटे पकडलेला गुटखा सोलापूर येथून आयात करण्यात आलेला होता. टेम्पोचालक व्यंकट लक्ष्मण फड (२४, रा. उखळी, ता. गंगाखेड) यास पकडले.गुटखा कोणत्या वितरकाचा आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. राहुल धस यांनी अंबाजोगाई पोलिस उपअधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच तालुक्यातील अवैध धंद्यांवर धाडसत्र सुरू केले आहे.

परळी बनतेय गुटख्याचे आगार
परळी पोलिसांनी काही दिवसांत पकडलेला गुटखा व मटक्याचे साहित्य एक कोटीच्या घरात आहे. राज्यात गुटखा व मटक्यावर बंदी असताना परळी शहरात हे प्रकार सुरू आहेत. अनेक ठिकाणी पत्त्याचे क्लब सुरू अाहेत. यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. पोलिसांनी ८ दिवसांत केलेल्या अनेक कारवायांमुळे परळी शहर हे गुटख्याचे आगार बनू लागले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...