आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत प्राप्तिकरचे व्यावसायिकांवर छापे; पाच ठिकाणी केली कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुगलकिशाेर तापडिया यांच्या घरासमाेर प्राप्तिकर खात्याची वाहने उभी हाेती. मात्र नेमकी काय कारवाई झाली याबद्दल माहिती देण्यात अाली नाही. - Divya Marathi
जुगलकिशाेर तापडिया यांच्या घरासमाेर प्राप्तिकर खात्याची वाहने उभी हाेती. मात्र नेमकी काय कारवाई झाली याबद्दल माहिती देण्यात अाली नाही.

औरंगाबाद- औरंगाबादेत मंगळवारी प्राप्तिकर विभागाने मोठी कारवाई केली. शहरात व्यावसायिकांच्या पाच ठिकाणांवर छापे मारून मालमत्तेचे मोजमाप करण्यात आले. छाप्यात २ बांधकाम व्यावसायिक व एका उद्योगसमूहाच्या मालकासह इतरांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईबद्दल प्राप्तिकर विभागाने गुप्तता बाळगली आहे. लवकरच पत्रकाद्वारे कळवले जाईल, असे सांगण्यात आले. घरातील संपूर्ण मालमत्तेचे मोजमाप होईपर्यंत ही कारवाई सुरू राहिली. ज्या दागिन्यांचा, पैशांचा व इतर मालमत्तेचा हिशेब संबधितांना देता येईल ती मालमत्ता तत्काळ परत मिळते. इतर मालमत्ता मात्र जप्त करण्यात येते. 


प्राप्तिकर विभागाचे नाशिक, नागपूर, मालेगाव, पुणे, कल्याण, ठाणे, जळगाव व औरंगाबाद या ८ जिल्ह्यांतील ५० पुरुष व ६ महिला अधिकाऱ्यांसह १०० वर अधिक जण कारवाईत सहभागी झाले.नाशिक प्राप्तिकरचे अतिरिक्त आयुक्त अमित सिंग यांनी यांनी छाप्यांचे नेतृत्व केले. अतिरिक्त आयुक्त अशोक मोरार यांचाही सहभाग होता. निराला बाजारमधील जुगलकिशोर तापडिया यांच्या घरापुढे प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या उभ्या होत्या. बाहेरील माणसाला आत व आतील व्यक्तीस बाहेर जाण्यास मनाई केलेली होती. 


२०१६ मध्ये झाली होती कारवाई: 
२०१६ मध्ये मराठवाड्यातून ५७० कोटी काळे धन जप्त करण्यात आले होते. त्यापैकी २५० कोटी जालना, १२० कोटी औरंगाबाद आणि उर्वरित २०० कोटी मराठवाड्यातून जप्त केले होते.  त्या नंतर मराठवाड्यातील कोचिंग क्लास, बिल्डर आणि सुवर्ण व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे लक्ष होते. दरमहा २० लाखांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायिकांचीही माहितीदेखील मागवली होती. यासाठी १६० बँकांशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्या नंतर ही कारवाई करण्यात आली.

 

८ जिल्ह्यांतील अधिकारी नगरला जमले होते एकत्र 
सोमवारी रात्रीच आठ जिल्ह्यांतील प्राप्तिकर खात्याचे अधिकारी अहमदनगर येथे जमले होते. मात्र कुठल्या जिल्ह्यात कारवाई करायची आहे, हे त्यांनाही माहीत नव्हते. पहाटे ४ वाजता विविध पथके तयार करून औरंगाबादला पाठवण्यात आली. कुणाकडे छापा मारायचा आहे, हे त्याच्या घरी जाईपर्यंतही माहीत नव्हते. 

बातम्या आणखी आहेत...