आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलाॅन मांजा विक्रेत्यांवर छापे; दाेन लाखाचा घातक मांजा जप्त 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- रविवार कारंजा व पाथर्डी फाटा परिसरात एकापाठाेपाठ एक सुमारे ५ लाखांचा घातक मांजाचा साठा जप्त करण्याची कारवाई ताजी असतानाच रविवारी दुपारच्या सुमारास भद्रकाली परिसरात वेगवेगळ्या दाेन ठिकाणी छापे टाकत २ लाखांचा घातक समजला जाणारा 'क्युम्प्यु पांडा आणि फायटर पांडा' नावाचा नायलॉन मांजा विक्री करताना दोघांना अटक करण्यात आली. संक्रातीच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलिसांनी रविवारी (दि. १३) विशेष कोंबिग ऑपरेशन राबवत ही धडक कारवाई केली. 

 

संक्रातीच्या सुरूवातीलाच आठवडाभरापासून शहरात पतंग उडविले जातात. यासाठी नायलाॅन मांजाचाच जास्त प्रमाणात वापर केला जाताे. मात्र नायलाॅन मांजा अतिशय घातक असल्याने शासनाने त्यावर बंदी घातली आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने नायलाॅन मांजा विक्रेते व उर्वरित. खेळणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले असून त्याच्या अंमलबजावणीसाठी पाेलिस आयुक्तांनी सर्वच पाेलिस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नायलॉन मांजा विरोधात धडक शोध मोहिम सुरु आहे. रविवारी सकाळी भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत नायलॉन मांजाविरोधात विशेष कोंबिग ऑपरेशन राबवण्यात आले. पथकाने तलावाडी येथे साध्या वेशात जात सापळा रचला. तेथे नायलॉन मांजा विक्री करत असल्याचे आढळले. संशयित पलाश विवेक दंडगव्हाळ (रा. बुधवार पेठ) आणि एक अल्पवयीन मुलास पथकाने ताब्यात घेतले. संशयिताकडून क्युम्प्यु पांडा नावाच्या नायलाॅन मांजाचे ६ हजारांचे ६ गट्टू जप्त केले. ही कारवाई सुरू असतानाच तेथून थाेड्याच अंतरावर कानडे मारुती लेन येथे अंतरा काईट हाऊस येथे नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथेही छापा टाकत मंदार भगवान बर्वे (रा. वासुदेव संकुल, कानडे मारुती लेन) यास अटक केली. त्याच्या दुकानातून तब्बल १ लाख ८ हजाराचा फायटर पांडा नावाचा घातक नायलॉन मांजाचे ९० गट्टू जप्त केले. संशयितांच्या विरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात पर्यावरण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. भद्रकाली पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल मुळे, सोमनाथ सातपुते, रवींद्र मोहिते, उत्तम पाटील, एजाज पठाण, दीपक शिलावट, गणेश निंबाळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

 

३१ जानेवारीपर्यत मोहीम 
घातक नायलॉन मांजा विरोधात पोलिसांकडून ३१ जानेवारी पर्यन्त धडक शोध मोहिम सुरुच राहणार आहे.नायलॉन मांजा विक्री करणे आणि वापरणे हा आता फौजदारी गुन्हा दाखल असल्याने नागरिकांकडून नायलॉन मांजा वापर करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. शहर व परिसरात कुठेही नायलॉन मांजा विक्री अथवा वापर होत असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपआयुक्त विजयकुमार मगर (गुन्हे) लक्ष्मीकांत पाटील परिमंडळ १ श्रीकृष्ण कोकाटे परिमंडळ २ यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याची नाव गोपनीय ठेवले जाणार आहे. 

 

दहा दिवसांत आठ लाखांचा मांजा जप्त, ९ अटकेत 
घातक नायलाॅन मांजाविरोधातील कारवाईला नागरिकांकडून समर्थन मिळत असल्याने पोलिस यंत्रणेकडून पाठोपाठ धडक कारवाई सुरू आहे. गुन्हे शाखा आणि भद्रकाली, अंबड पोलिसांनी विविध ठिकाणी नायलॉन मांजा जप्त केला. ४ जानेवारीपासून शहरात दहा ठिकाणी पथकाने छापे टाकले. यामध्ये कुमावतनगर येथे मनोज कुमावत याच्याकडून ३० हजारांचा, अशोक स्तंभ येथ सागर धनगर या विक्रेत्याकडून २० हजार, मालेगाव स्टॅण्ड येथील सुमित महाले याच्याकडून २० हजार, चुंचाळे येथील गोरख शिंदे याच्याकडून ५ हजार, मधुबन कॉलनी येथील अतुल आहेर याच्याकडून १२ हजार, आणि सैलानी बाबा येथील बाळासाहेब राहिंज याच्याकडून २५ हजार व रविवार कारंजा येथील होलसेल विक्रेता दिलीप सोनवणे याच्याकडून ३ लाखांचा मांजा जप्त केला. संक्रातीच्या पार्श्वभूमीवर शहरात ही कारवाई सुरुच राहणार आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...