आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rail Over bridge Pending For Rs 2.13 Crore, Government Wakes Up After Modi's Tour

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२.१३ कोटींसाठी रखडला रेल्वे ओव्हरब्रिज, मोदींच्या दौऱ्याने शासनाला जाग

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देशातील पहिली स्मार्ट औद्योगिक सिटी "ऑरिक'ला मुख्य रस्त्याशी जाेडणारा रेल्वे उड्डाणपूल २.१३ कोेटी रुपये जमा न केल्यामुळे वर्षभरापासून रखडला अाहे. यामुळे अत्याधुनिक सुखसोयींनी नटलेल्या ऑरिकपर्यंत पोहोचण्याचा मार्ग  अजूनही खडतरच आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या दोन दिवस आधी ऑरिकला जाग आली असून गुरुवारी ही रक्कम रेल्वेकडे जमा करण्यात आली. आता सप्टेंबरअखेरपर्यंत हे काम पूर्ण हाेऊन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होईल.

ऑरिकमध्ये जाण्यासाठी जालना रोडवरून दोन रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. पैकी एक शेंद्र्यात तर दुसरा करमाडजवळ जालना रस्त्याला मिळतो. शेंद्रा येथील रेल्वे उड्डाणपुलावरूनच ऑरिकचे मुख्य प्रवेशद्वार आहे. हा पूल तब्बल वर्षभरापासून तयार आहे. मात्र, रेल्वे  रुळावरील जोडणीचे काम रखडले आहे. जून २०१८ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आॅरिक प्रशासनातर्फे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात वर्ष उलटले तरी तो सुरू झालेला नाही. यामुळे सध्या तरी शेंद्रा एमआयडीसीतून अॉरिकमध्ये जावे लागत आहे.
 

दोन दिवस आधी भरले डिपाॅझिट
पुलाचा १०० टक्के खर्च राज्य शासनाच्या औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड म्हणजेच एआयटीएल कंपनीने केला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या नियमानुसार  रेल्वे ओव्हरब्रिजच्या आजीवन देखभालीसाठी रेल्वे खात्याकडे एकूण पुलाच्या खर्चाच्या ३० टक्के रक्कम जमा करावी लागते. एआयटीएलने ही रक्कम जमा न केल्याने वर्षभरापासून उड्डाणपुलाचे काम बंद पडले होते. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या दोन दिवस आधी म्हणजे ५ सप्टेंबरला ऑरिक प्रशासनाने २.१३ कोटी रुपयांचा धनादेश रेल्वेच्या नांदेड कार्यालयात जमा केल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी दिव्य मराठीला दिली.
 

महिनाअखेरपर्यंत तयार
दरम्यान, ही रक्कम जमा होताच रेल्वेची यंत्रणा कामाला लागली. शुक्रवारी याबाबत बैठक होऊन शक्यतो २४ सप्टेंबरपासून उड्डाणपुलाच्या जोडणीचे काम करण्याचे निश्चित झाले. रेल्वेचे वेळापत्रक पाहून प्रवाशांना त्रास होणार नाही, अशा वेळेत सहा दिवस दररोज ३ तास मेगाब्लॉक लावण्यात येणार  आहे. महिनाअखेरपर्यंत हे काम होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असे राजेश शिंदे यांनी सांगितले. एकदा पूल वाहतुकीला खुला  झाल्यावर उद्योजक वर्गाला त्याचा अधिक फायदा होणार आहे.
 

समृद्धी मार्गाला डीएमआयसीशी जोडणाऱ्या रस्त्याचे नियोजनही नाही
मालाची वाहतूक करण्यासाठी समृद्धी आणि डीएमआयसीच्या रस्त्यावर करमाड, दौलताबाद आणि हर्सूल येथे इंटरचेंज नियोजित आहे. एका इंटरचेंजसाठी सुमारे १०० एकर जागा लागणार आहे. सुरुवातीला करमाड येथे असा इंटरचंेज होणे गरजेचे आहे. पण डीएमआयसी आणि रस्ते विकास महामंडळातील समन्वयामुळे हे काम रखडले आहे.
 

२३ लाखांची जमीन २ कोटीत दर गगनाला भिडवण्याची खेळी
डीएमआयसीसाठी शेतकऱ्यांना एकरी २३ लाख रुपये दिले गेले. आता हीच जागा उद्याेजकांना २ कोटी रुपयांच्या दराने  दिली जात आहे. आतापर्यंत केवळ सेक्टर १,५,८ सेक्टर ११ मधलेच प्लॉट बोली पद्धतीने विकले जात आहेत. यामुळे प्लॉटचे दर ३२०० रुपये चाैरस मीटरपर्यंत पोहोचले आहेत. एकरी २ कोटींच्या पुढे दर चालले आहेत.
 
> वर्षभरापासून रुळाच्या दोन्ही बाजूंचे काम पूर्ण
> ऑरिकने रेल्वेचे डिपॉझिट जमा न केल्याने अडकली आहे जोडणी, आता २४ सप्टेंबरपासून सुरू होणार काम