आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट ओळखपत्राच्या आधारे रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, 528 जणांना अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या सणांच्या हंगामात बनावट ओळखपत्राच्या (आयडी) आधारावर तिकीट बुकिंग करून रेल्वेला आर्थिक फटका बसवणाऱ्या लोकांच्या विरोधात एक व्यापक मोहीम हाती घेऊन ५२८ जणांना अटक केली आहे. जवळपास सव्वातीन कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यात आला आहे. आरपीएफचे महासंचालक अरुणकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आणि एजंटकडून तिकीट बुक करताना सावधगिरी बाळगावी तसेच वैध आयडीद्वारेच तिकिटे बुक करावीत, असे आवाहन सामान्य नागरिकांना केले. कुमार म्हणाले की, २४ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर यादरम्यान हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेत गेल्या तीन महिन्यांदरम्यान १४ पेक्षा जास्त तिकीट बुकिंग करणाऱ्या लोकांचे आयडी आणि त्यांच्या सिस्टिमच्या आयपी पत्त्याच्या माध्यमाद्वारे ठिकाणांची माहिती घेऊन छापे टाकण्यात आले. अटक केलेल्या ५२८ जणांमध्ये ६५ विभागीय अधिकृत विक्रेत्यांचा (आरएसपी) समावेश आहे. त्यांनी रेल्वेला कमिशन दिले नाही आणि बनावट ईमेल आयडी तयार करून मोठ्या प्रमाणात तिकिटे बुक केली आणि रेल्वेचे आर्थिक नुकसान केले. या ६५ विक्रेत्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. इतरांवर कारवाई केली जात आहे. ४८३ लोक अधिकृत तिकीट बुकिंग एजंटच नाहीत, ते खासगी आयडी तयार करून आॅनलाइन तिकीट बुकिंगचा व्यवसाय करत होते याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. एकूण घोटाळा ३ कोटी २२ लाख रुपयांचा आहे. आतापर्यंत ५२८ आरोपींना अटक झाली असून इतर ३७ जण फरार आहेत. या प्रकरणात ५१९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर रेल्वे अधिनियमाच्या कलम १४३ अंतर्गत कारवाई केली जाईल. 

मध्य रेल्वेअंतर्गत ४९० तिकिटे झाली होती बुक
या मोहिमेत २७२० खासगी आयडीमध्ये अनियमितता आढळली. सर्वाधिक १२१ आयडी दक्षिण रेल्वेअंतर्गत ब्लाॅक करण्यात आले, तर सर्वाधिक ४९० तिकिटे मध्य रेल्वेअंतर्गत बुक करण्यात आली होती. सर्वाधिक १७ आरएसपींना उत्तर रेल्वेत काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.