आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेंत आता स्मार्ट कोच, चढणाऱ्यांचे चेहरे गुन्हेगारांच्या फोटोशी पडताळणार, संशयितांची माहिती थेट नियंत्रण कक्षाला देणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरामदायी प्रवासासाठी रेल्वेत कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआय) प्रणालीयुक्त कोच जोडण्यात येणार आहेत. ही प्रणाली संशयितांचे चेहरे ओळखून त्याची माहिती थेट नियंत्रण कक्षाला देईल. याशिवाय कोचमधील पाणी संपणे, चाके गरम होणे आणि कोचमधील कोणताही बिघाड झाल्यास त्याबाबतची माहिती पुढील रेल्वेस्थानकाला देईल. यामुळे वेळ तर वाचेलच आणि सुविधांसाठी प्रवाशांना अडचण येणार नाही. उत्तर रेल्वे येत्या तीन महिन्यांत १०० रेल्वेंत असे कोच जोडणार आहे. 


दिल्ली ते आझमगडदरम्यान धावणाऱ्या कैफियत एक्स्प्रेसमध्ये याची चाचणी सुरू आहे. हे कोच पॅसेंजर इन्फर्मेशन अँड कोच कॉम्प्युटर युनिटने सज्ज आहेत. या प्रणालीत देशातील गुन्हेगारांची माहिती आणि फोटो क्लाउड इंटरनेटच्या मदतीने जोडण्यात आले आहेत. कोचमध्ये रात्री दिसण्यासाठी ४ मेगापिक्सलचे कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे डब्यात चढणाऱ्या प्रवाशांचे फोटो प्रणालीतील उपलब्ध गुन्हेगारांच्या माहितीशी पडताळणी झाल्यानंतर थेट आरपीएफच्या नियंत्रण कक्ष आणि पुढील स्थानकावर माहिती देतात. एवढेच नव्हे तर डब्यात चढणाऱ्या एखाद्या प्रवाशाकडे काही शस्त्र असल्यास त्याचीही माहिती नियंत्रण कक्षाला देतात. एआय प्रणालीचे कोच प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात. कोचच्या चाकांना व्हायब्रेशन सेन्सर लावले आहेत. चाक गरम झाल्यास किंवा काही तांत्रिक बिघाड असल्यास त्याची माहिती पुढील स्टेशनला देतात.

 

कोचमधील पाणी संपल्याचीही माहिती देते ही प्रणाली 

> संशयित चेहरे ओळखणार 
> कोचमधील पाणी संपल्याची माहिती मिळते
> चाकात बिघाड झाल्याचे कळते
> रेल्वेतील कॅमेऱ्यांमुळे लाइव्ह स्टेटसची माहिती मिळते
> गुगल क्लाउडवर होईल याची रेकॉर्डिंग
> अधिकाऱ्यांना मोबाइलवरही दिसणार 
> जीपीएस लोकेशनची माहिती मिळते
> संकटकाळात तत्काळ मदत मिळेल