आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची नोंद झाली. औरंगाबाद, नगर, जालना, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, नागपूर, वर्धा, गोंदिया, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांत पावसाची नोंद झाली. विदर्भ व मराठवाड्यात वेगवेगळ्या घटनेत वीज कोसळून सहा ठार झाले. ऐन जुलैमध्ये पावसाची तूट वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पुणे वेधशाळेने २० ते २३ जुलै हे चार दिवस राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्यात यंदा उशिराने दाखल झालेल्या पावसाने जूनच्या शेवटच्या आठवड्यात सर्वदूर हजेरी लावत दिलासा दिला होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती. गुरुवारपासून राज्यातील काही भागात पावसाने पुनरागमन करत हजेरी लावली. शुक्रवारीही नगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
विदर्भात विजेचे दोन बळी
> धोतरखेडा (जि. अमरावती) येथे शेतात काम करताना वीज कोसळून मंगलाय नंदराम राजने (५० ) यांचा मृत्यू झाला.
> आलमपूर (जि. बुलडाणा) येथे शेतातील झोपडीवर वीज कोसळली. यात सारजाबाई भगत (७०) यांचा मृत्यू झाला तर इतर तीन महिला जखमी झाल्या.
विहिरीचे पाणी पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर कोसळली वीज
जाफराबाद - शेतातील विहिरीचे पाणी पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडून एक ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील रास्तळ येथे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. एकनाथ नारायण डव्हळे (३६) असे मृत तर जगदेव शेषराव कदम जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. गावच्या विहिरीला किती पाणी आले हे पाहण्यासाठी दोघेजण सोबत गेले होते. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी वरुड येथील रुग्णालयात नेले होते. एकनाथ डव्हळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर कदम हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वसमत तालुक्यात शेतात काम करणाऱ्या दोन महिलांवर कोसळली वीज
हिंगोली - वसमत तालुक्यातील फाटा गावात शेतात काम करणाऱ्या एक महिला व एक युवती अशा दोघी अंगावर वीज कोसळून जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. गयाबाई प्रकाश काकडे (५०) व लोचना नारायण काकडे (१६) या दोघी शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. दोघी गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी करून दोघींनाही मृत घोषित केले.
> उंडा (ता. वसमत) येथे वीज कोसळून बाबूराव गंगाराम चव्हाण (६२) हे ठार झाले.
पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार राज्यात २० ते २३ जुलै या काळात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२० व २१ जुलै : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
२२ व २३ जुलै : मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात अनेक ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
२७ जिल्ह्यांत तूट
ऐन जुलै महिन्यात राज्यातील २७ जिल्ह्यांत पावसाची तूट पडली आहे. मराठवाडा,विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत कमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूर, सातारा वगळता जिल्ह्यांत पावसाची तूट आहे.
मराठवाड्यात ३६ %, तर विदर्भात ३८% कमी पाऊस
१९ जुलैअखेर मराठवाड्यात ३६ टक्के, तर विदर्भात ३८ टक्के कमी पाऊस झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांत यंदा अपेक्षित सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.